अलीकडच्या वर्षांत बीटाचा रस हा एक सुपरफूड म्हणून लोकप्रिय झाला आहे, जो यकृताला “डिटॉक्स” करण्यास आणि रक्तातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. बीट हे यकृताच्या आरोग्यासाठी कसे चांगले आहे आणि रोज आहारात बीट का आवश्यक आहे, याबाबत नवी दिल्ली इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सुदीप खन्ना यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली. डॉ. सुदीप खन्ना सांगतात की, “अनेकदा रुग्ण मला विचारतात की, फॅटी लिव्हर बरा करण्यासाठी बीट खाणे आवश्यक आहे का? सत्य हे आहे की, बीटाचा रस खरोखरच यकृताचे रक्षण करतो.”

यकृत हे शरीराचे नैसर्गिक विषारी द्रव्य नष्ट करते. ते विषारी पदार्थांचे विघटन करते, औषधे अशा स्वरूपात रूपांतरित करते जे शरीराला वापरता येऊ शकेल किंवा त्यातील विषारी घटक काढून टाकले जाऊ शकतात. तसेच सेवन केलेल्या मद्यावर प्रक्रिया करते आणि त्याचे विघटन करते. रक्तप्रवाहातून विषारी पदार्थ आणि हानिकारक पदार्थ काढून टाकते आणि पचनास मदत करण्यासाठी पित्त तयार करते. सामान्य परिस्थितीत, यकृताला त्याचे काम करण्यासाठी कोणत्याही मदतीची आवश्यकता नसते.

एखादे अन्न किंवा पेय यकृत स्वच्छ करते किंवा विषारी पदार्थ काढून टाकते, याबद्दलचे दावे कदाचित अतिशयोक्तीपूर्ण किंवा दिशाभूल करणारे आहेत. यकृताची जटिल कार्ये एकाच अन्न किंवा पेयाने लक्षणीयरीत्या वाढवता येत नाहीत किंवा समर्थित करता येत नाहीत. पण, काही पोषक तत्वे आणि संयुगे यकृताच्या आरोग्यास समर्थन देऊ शकतात आणि त्याचे कार्य सुधारण्यास मदत करू शकतात. हे विशेषतः पर्यावरणातील विषारी पदार्थांच्या संपर्कात येतात, मद्यपान करतात, फॅट्सयुक्त पदार्थ खातात किंवा नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) सारख्या यकृताच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

बीटचा रस का फायदेशीर आहे?

बीटाच्या रसामध्ये नायट्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात आणि रक्तप्रवाह सुधारतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, विशेषतः बीटालेन्स या अँटीऑक्सिडंट्समुळे बीटाचा रंग गडद लाल होतो. व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम आणि फोलेट अवयवांच्या आरोग्यास मदत करते. पॉलीफेनॉल दाहकता कमी करते. एकत्रितपणे या सर्व घटकांमुळे बीटाचा रस हे एक पौष्टिक पेय ठरते, हे यकृताबरोबर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

अनेक प्राण्यांवर आणि इन विट्रो (टेस्ट ट्यूब) अभ्यासांमध्ये बीटाचा अर्क आणि रसामध्ये यकृत-संरक्षणात्मक परिणामांवर संशोधन केले आहे. मानवी अभ्यास मर्यादित असले तरी काही आशादायक निष्कर्ष आहेत.

  • अँटीऑक्सिडंट यकृताच्या कार्याला मदत करते (Antioxidant helps liver function): बीटरूटमध्ये बीटालेन्स आणि पॉलीफेनॉल हे अँटीऑक्सिडंट असतात, जे यकृतातील ऑक्सिडेटिव्ह ताण किंवा पेशींचे नुकसान आणि दाहकता कमी करतात, हे संशोधनातून समोर आले आहे.
  • दाहक-विरोधी प्रभाव (Anti-inflammatory effects) : उंदरांवर केलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बीटाचा अर्क यकृताची दाहकता कमी करू शकतो. यावरून असे सूचित होते की, बीट हे NAFLD सारख्या दीर्घकालीन यकृताच्या आजारांचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याबाबत मानवांमध्ये क्लिनिकल चाचण्या करणे अजूनही आवश्यक आहेत.
  • यकृतातील एंजाइममध्ये घट (Reduction in liver enzymes) : काही मानवी अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बीटा रस, अर्क, कॅप्सूल किंवा पावडर कोणत्याही प्रकारे सेवन केल्यास यकृतातील एंजाइमची [जसे की ALT (Alanine Transaminase) आणि AST (Aspartate Transaminase) ] पातळी कमी होण्यास मदत होऊ शकते. यकृतामध्ये (ALT व AST) एंजाइमची पातळी जास्त असणे हे यकृतावर येणारा ताण आणि यकृत खराब झाल्याचे लक्षण आहे. या अभ्यासांमध्ये बहुतेकदा बीटाच्या रसाऐवजी कॅप्सूल स्वरूपात बीटाचा अर्क वापरला जातो.
  • फॅट्सचे चयापचय (Fat Metabolism) : बीटामधील नैसर्गिक नायट्रेट्स रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करू शकतात आणि इन्सुलिन संवेदनशीलता आणि चयापचय कार्य सुधारून अप्रत्यक्षपणे यकृतामध्ये फॅट्स जमा होणे कमी करू शकतात..

मर्यादा आणि गैरसमज(Limitations and Myths)

बीटाचा रस म्हणजे जादुची गोळी नाही हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ते विषारी पदार्थ “बाहेर काढू” शकते किंवा स्वतःहून यकृताचे नुकसान बरे करू शकते, या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही मजबूत पुरावे नाहीत. हिपॅटायटीस, सिरोसिस किंवा प्रगत NAFLD सारख्या यकृताच्या आजारांना वैद्यकीय उपचार आणि व्यापक जीवनशैलीत बदल आवश्यक असतात, फक्त बीटाचा रस घेऊन हे बरे होत नाही. शिवाय, जास्त प्रमाणात बीटाचा रस पिण्याचे तोटे असू शकतात. यामुळे बीटुरिया (गुलाबी किंवा लाल मूत्र) नावाची त्रासदायक नसलेली स्थिती उद्भवू शकते आणि काही प्रकरणांमध्ये, त्यात ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो.

बीटचा रस प्यायल्याने कोणाला फायदा होऊ शकतो?(Who can benefit from beetroot juice?)

ज्यांचा फॅटी लिव्हर आजार सुरुवातीच्या टप्प्यात आहे, जास्त फॅट्सयुक्त आहार घेणारे लोक आणि इन्सुलिन प्रतिरोधक (insulin resistance) किंवा मेटोबॉलिक सिंड्रोम (metabolic syndrome) असलेल्या लोकांना बीटाचा रस पिण्याचा फायदा होऊ शकतो. पण, या सर्व प्रकरणांमध्ये, बीटाचा ज्यूस कमी सॅच्युरेडेट फॅट्स आणि शुद्ध साखर असलेल्या आहारासह एकत्र करून प्यायला पाहिजे; त्यामुळे संतुलित, यकृत-अनुकूल आहाराचा भाग म्हणून बीटाचा रस पिण्याचा आनंद घ्या. पण नियमित व्यायाम करा, मद्यपान मर्यादित करा आणि पुरेशा प्रमाणात पाणी प्या.