Olive Oil Really Prevent a Hangover : कोणाची बर्थ डे पार्टी असो, लग्न असो वा थर्टी फर्स्ट आणि इतर कोणत्या पार्ट्या, यात हल्ली दारू पिणं हे आलचं. काहींना या प्रसंगी दारू प्यायल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण झाला असे वाटतच नाही; यामुळे उत्साहाच्या भरात भरपूर दारू प्यायली जाते. अनेकांना दारूची झिंग चढते आणि दुसऱ्या दिवशीही त्यांचा हँगओव्हर काही केल्या कमी होत नाही. यात दुसऱ्या दिवशी ऑफिस असते, पण आदल्या रात्रीच्या पार्टीचा हँगओव्हर न उतरल्याने डोकेदुखी, मळमळ, उलट्या आणि काहींना पोटदुखी होते. अनेक जण हँगओव्हर उतरवण्यासाठी लिंबू पाणी, कोरा चहा असे अनेक उपाय करतात. यात आता हँगओव्हर उतरवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलच्या सेवन करणं फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

जिमी फॅलनला दिलेल्या मुलाखतीत, संगीत निर्माता बेनी ब्लँको यांनी हँगओव्हर उतरवण्यासाठी एक प्रभावी आणि जलद उपाय सांगितला आहे. ते म्हणाले की, कोणत्याही आवडत्या पेयाचा ग्लास हातात घेण्यापूर्वी ते ऑलिव्ह ऑईलचा एक घोट पितात. पण, खरंच याने हँगओव्हर उतरतो का याविषयी जाणून घेऊ…

ऑलिव्ह ऑईलचे काय फायदे आहेत?

ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटिऑक्सिडेंटचे घटक असतात, त्यामुळे दारू पिण्याआधी ऑलिव्ह ऑईलचे सेवन केल्यास हँगओव्हर कमी होऊ शकतो असा एक समज आहे.

जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुषमा पीएस म्हणाल्या की, ऑलिव्ह ऑईल मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध आहे, ते बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

व्हिटॅमिन ई आणि पॉलीफेनॉलसह त्यातील हाय अँटीऑक्सिडंटचे प्रमाण, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ कमी करण्यास मदत करते. दीर्घकाळापासून तुम्ही या समस्यांनी ग्रस्त असल्यास ऑलिव्ह ऑईल बेस्ट उपाय मानला जातो.

ऑलिव्ह ऑईलमध्ये ओलिओकॅन्थलसारखे दाहक-विरोधी संयुगे असतात, ज्यांचे आयबुप्रोफेनसारखेच परिणाम असू शकतात. ऑलिव्ह ऑईलच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेहग्रस्तांसाठी हे फायदेशीर आहे.

याशिवाय ऑलिव्ह ऑईल मेंदूच्या निरोगी आरोग्यासाठीही फायदेशीर असते. यामुळे अल्झायमर आजाराचा धोका कमी होऊ शकतो. संतुलित आहारात ऑलिव्ह ऑईलचा समावेश केल्यास एकूण आरोग्य आणि दीर्घायुष्य वाढू शकते.

आहारतज्ज्ञ सुषमा सांगतात की, हे हृदय आणि रक्तवाहिन्यांसाठीही खूप फायदेशीर असते. यातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचे समृद्ध प्रमाण एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, तर एचडीएल (चांगले) कोलेस्ट्रॉल पातळी राखण्यास किंवा वाढवण्यासदेखील मदत करते.

दरम्यान आदल्या दिवशी दारू प्यायल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचा हँगओव्हर राहतो. दारूमुळे व्यक्ती शरीरावरील नियंत्रण गमावून बसतो. अशा परिस्थितीत हँगओव्हर उतरून शरीराला पुन्हा नियंत्रणात येण्यासाठी २४ तासांचा कालावधी तरी लागतो. तुम्ही दारूचे सेवन करण्यापूर्वी एक घोट ऑलिव्ह ऑईलचे सेवन करण्याचा प्रयत्न करा, कदाचित यामुळे फरक दिसू शकेल.