Child Eating Mud: मुलांना बाहेर खेळायला खूप आवडतं आणि त्यांना निसर्गातील रंग आणि वेगवेगळ्या वस्तू नेहमीच आकर्षित करतात. त्यामुळे काही वेळा मुलं माती उचलून तोंडात घालतात, हे फारच सामान्य आहे. पण असं माती चुकून खाल्ल्यावर नक्की काय होतं? यावर इंडियन एक्स्प्रेसने एका आरोग्य तज्ज्ञाशी बोलून अधिक माहिती घेतली.
डॉ. श्रीनिवास मूर्ती सी. एल., लीड पेडियाट्रिक्स, अॅस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटल, बेंगळुरू येथील बालरोग तज्ज्ञ म्हणाले की, जेव्हा मुलं चुकून माती खातात, तेव्हा शरीर त्या परक्या पदार्थाला समजून घेण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे थोडं उलटीसारखं वाटणं किंवा हलकी मळमळ असा त्रास होऊ शकतो. शरीराची रोगप्रतिकार शक्ती माती शरीरातून बाहेर टाकण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यामुळे उलटी किंवा जुलाब होण्याची शक्यता असते.
अशा वेळेस बहुतांश मुलांना काही गंभीर त्रास होत नाही; पण डॉ. मूर्ती म्हणाले की, मातीसोबत जीवाणू, परजीवी किंवा विषारी घटक पोटात जाण्याचा धोका असतो, जे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. त्यामुळे पालकांनी लक्ष ठेवायला हवं की, मुलामध्ये काही त्रासदायक लक्षणं दिसत आहेत का आणि ती लक्षणं काही वेळानंतरही कमी झाली नाहीत, तर ताबडतोब डॉक्टरांची मदत घ्यावी.
यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते का? (Eating Mud improve immunity?)
डॉ. मूर्ती म्हणाले की, थोडी माती किंवा घाण खाल्ल्याने मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याची शक्यता असते. या विचाराला “हायजीन हायपोथिसिस” असे म्हणतात. त्यामध्ये असं सांगितलं जातं की, लहान वयात सूक्ष्मजंतूंशी संपर्क आल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे विकसित होते.
“जेव्हा मुलांचा नैसर्गिकरीत्या अशा परक्या घटकांशी संपर्क येतो, तेव्हा त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या आणि वाईट घटकांमधला फरक ओळखायला शिकते. त्यामुळे पुढील आयुष्यात मुलांना अॅलर्जी किंवा त्यांना होऊ शकणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो,” असं त्यांनी सांगितलं.
यामुळे आरोग्याचे काय धोके होऊ शकतात? (Child Eating Mud Health Risk)
चुकून माती खाल्ल्यामुळे होणारे आरोग्याचे धोके वेगवेगळ्या प्रकारची माती आणि तिच्या दूषितपणाची पातळी यांवर अवलंबून असतात. डॉ. मूर्ती म्हणाले, “यातला एक मोठा धोका म्हणजे मातीमध्ये दडलेले हानिकारक जंतू जसे की ई. कोलाई (E. Coli) किंवा सॅल्मोनेला हे पोटाचे आजार (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन) होऊ शकतात. त्याशिवाय मातीमध्ये असणारा ‘जियार्डिया’ नावाचा परजीवी पचनतंत्रात बिघाड करू शकतो आणि त्यामुळे शरीरातून पाणी कमी होण्याची शक्यता असते.”
मातीमध्ये कधी कधी कीटकनाशके, जड धातू आणि कारखान्यांमधून आलेली हानिकारक रसायनेही असू शकतात, जे दीर्घकाळ आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. काही संवेदनशील मुलांना मातीत असलेल्या घटकांमुळे अॅलर्जीचीही प्रतिक्रिया होऊ शकते.
खरं तर, डॉ. मूर्तींनी सांगितलं की नैसर्गिकरीत्या मातीशी येणारा थोडासा संपर्क मुलांची रोगप्रतिकार शक्ती सुधारू शकतो. पण पालकांनी याकडे लक्ष ठेवायला हवं की, मुलांकडून जास्त प्रमाणात माती खाल्ली जाणार नाही आणि ती खूपच दूषित अशा ठिकाणी जाणार नाहीत. कारण- अशा घाणीशी किंवा मातीशी जास्त किंवा वारंवार संपर्क येणं ही बाब आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यांनी यामध्ये माफकपणा ठेवण्यावर भर दिला, कारण- मुलांकडून जास्त प्रमाणात माती खाल्ली गेल्यास धोका होऊ शकतो.