Anemia : शरीरातील रक्ताचे म्हणजेच हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, याला ॲनिमिया असे म्हणतात. लोहाची कमतरता किंवा बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता या दोन कारणांमुळे ॲनिमिया होऊ शकतो. अनेकदा ॲनिमिया झालेल्या रुग्णाला औषधी नको वाटतात. अशावेळी डॉक्टर त्यांना बीटरुट्स आणि डाळिंब खाण्याचा सल्ला देतात, पण तुम्हाला जर बीटरुट्स किंवा डाळिंब आवडत नसेल तर तुम्ही आवळा आणि खजूरसुद्धा खाऊ शकता.

डिजिटल क्रिएटर डॉ. सलीम झैदी सांगतात, दररोज चार खजूर आणि आवळा खाणे हे रक्तवाहिन्यातील रक्ताची कमतरता दूर करू शकते. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला.

एमजीएम हेल्थकेअर (MGM Healthcare)च्या प्रमुख आहारतज्ज्ञ विजयश्री एन सांगतात, “आवळा हा व्हिटॅमिन सीचा चांगला स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते आणि आपली त्वचा आणि दातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सी लोह शोषून घेण्यास मदत करते आणि शरीरातील हिमोग्लोबिन वाढवते.”

त्या पुढे सांगतात, “विशेषत: शाकाहारी लोकांना आवळा हा ॲनिमियाचा सामना करण्यास खूप मदत करतो. १०० ग्रॅम आवळा हा २५२ मिलिग्रॅम व्हिटॅमिन सी देतो. एका सामान्य व्यक्तीला दिवसाला ८० एमजी व्हिटॅमिन सीची गरज भासते.”

हेही वाचा : पोटभर जेवल्यानंतर लगेच झोपू नका! पाठदुखी टाळण्यासाठी सदगुरुनी दिला सल्ला, जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात?

“खजुरामध्ये लोहाचे भरपूर प्रमाण असते. १०० ग्रॅम खजुरामध्ये ४.७ मिलीग्रॅम लोह असते. सामान्य प्रौढ व्यक्तीला नियमित १९ ते २९ मिलीग्राम लोहाची आवश्यकता असते”, असे विजयश्री सांगतात.

त्या पुढे सांगतात, “शरीरात हिमोग्लोबिनची पातळी संतुलित ठेवणे गरजेचे आहे, पण चार खजूर (१५ ते २० ग्रॅम) खाल्ल्याने फक्त एक मिलीग्रॅम लोह मिळते. त्यामुळे ॲनिमियाचा सामना करताना हे प्रमाण पुरेसे ठरत नाही. त्यामुळे लोहयुक्त पदार्थांसह प्रोटिन्स खा, ज्यामुळे शरीरातील रक्ताची मात्रा वाढेल.”

लोहयुक्त पदार्थ जसे हिरव्या पालेभाज्या, पुदिना, धणे, शेवग्याच्या शेंगा, तांदूळ, बाजरी, चणा डाळ, सोयाबीन, मसूर, सुका मेवा आणि फळे इत्यादींचा आहारात समावेश करा. जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंड्यातील बलक (पिवळा भाग), पोल्ट्री मीट आणि ऑर्गन मीट खाऊ शकता. हे लोहाचे चांगले स्रोत आहे, ज्याचा तुम्ही आहारात नियमितपणे समावेश करू शकता.

हेही वाचा : Monkeypox Virus: मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री! गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी? ऐका डॉक्टर काय सांगतात

“लहान मुले, किशोरवयीन मुली, गरोदर आणि स्तनदा महिला, यकृत आणि किडनीचे आजार असलेले रुग्ण, लठ्ठपणा असलेले लोक, शरीरात लोहाचे प्रमाण कमी असलेले लोक आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी असलेल्या लोकांना ॲनिमिया होण्याचा धोका जास्त असतो”, असे डॉ. विजयश्री सांगतात.

त्यांच्या मते, हिमोग्लोबिन सर्व अवयवांना ऑक्सिजन आणि शरीरात पोषक घटक वाहून नेण्यास मदत करते. जेव्हा हिमोग्लोबिनचे प्रमाण शरीरात कमी होते, तेव्हा हृदय, फुफ्फुसासह सर्व अवयवांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो; ज्यामुळे थकवा जाणवणे, सतत श्वास लागणे इत्यादी लक्षणे दिसू शकतात.