Can You Drink Orange Juice Daily : आपल्या आरोग्यासाठी सकाळी नाश्ता करणे खूप गरजेचे असते. त्यासाठी प्रत्येक जण आवडी-निवडी आणि सोयीनुसार पदार्थांची निवड करतो. ज्यामध्ये चहा, कॉफी, फळ, फळांचा रस आदींचा समावेश असतो. यातच संत्र्याच्या रसाने नाश्त्यात आरोग्यदायी पर्याय म्हणून स्वतःची जागा तयार केली आहे. शरीरात कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने कमी करण्यासाठी हा एक स्वादिष्ट पर्याय आहे. त्यामुळे फळांचा रस पिण्यावर अनेकदा लक्ष केंद्रित केले जाते. पण, तज्ज्ञ फळांचा रस पिण्याच्या पौष्टिक मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यामुळे लिंबूवर्गीय फळांनी दिवसाची सुरुवात करणे योग्य आहे का याचबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी चर्चा केली.

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजीच्या सल्लागार डॉक्टर सोनाली गौतम यांच्या मते, दररोज सकाळी संत्र्याचा रस पिणे तुमच्या पचनसंस्थेसाठी आणि एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर तसेच हानिकारकसुद्धा असू शकतो. तसेच ही गोष्ट तुम्ही संत्र्याच्या रसाचे नक्की कसे सेवन करता आणि तुम्हाला कोणत्या आरोग्य समस्या आहेत यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असते.

संत्र्याच्या रसात व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. संत्र्याच्या रसात असणारी पोषक तत्वे तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करून शरीरातील जळजळ कमी करतात. तुमच्या पचनसंस्थेतील अनुकूल बॅक्टेरियांना आधार देऊन आतड्यांचे आरोग्य वाढवू शकतात. पण, जर तुम्ही संत्र्याच्या रसाला फायबरयुक्त मॉर्निंग बूस्ट म्हणजे ओट्स किंवा संपूर्ण धान्य टोस्टची जोड दिली तर ते तुमच्या शरीराला लोहासारखे पोषक तत्व शोषण्यास मदत करतात; ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात संतुलित होते.

संत्र्याचा रस प्यायल्यावर आतड्यांवर कसा परिणाम होतो?

डॉक्टर गौतम यांनी सांगितले की, संत्र्याच्या रसाचे pH सुमारे ३.५ असते, म्हणजेच थोडा आम्लयुक्त (आंबट) असतो. त्यामुळे उपाशी पोटी संत्र्याचा रस प्यायल्यावर काही लोकांना ॲसिडिटी होऊ शकते किंवा जठराला सूज येऊ शकते. सतत संत्र्याचा रस प्यायल्याने पोटाच्या आतील आवरणावर जखम होऊ शकते.

त्याचप्रमाणे संत्र्याच्या १०० टक्के प्युअर रसात अंदाजे २० ते २५ ग्रॅम साखर असते. रस पिताना त्यातील फायबर बाहेर पडत असल्याने ती साखर तुमच्या रक्तप्रवाहात जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी जलद वाढते. यामुळे तुमच्या शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला प्रीडायबिटीज किंवा मधुमेह असेल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे…

संत्र्याच्या रसात असणारे आम्ल आणि साखरेचे मिश्रण तुमच्या दातांसाठीसुद्धा अनुकूल नाही, यामुळे दातांचा मुलामा खराब होऊ शकतो; म्हणून रस प्यायल्यानंतर दात लगेच पाण्याने धुवा किंवा चूळ भरा, नाही तर तुम्ही संत्र्याचा रस स्ट्रॉद्वारे पिऊ शकता.

संत्र्याचा रस काढल्यामुळे त्यातील फायबर कमी होते, जो एक मुख्य तोटा आहे. याव्यतिरीक्त तुम्ही रस न काढता संत्र्याचे सेवन केले तर आतड्यांना हालचाल करण्यास मदत होते आणि त्यामध्ये राहणाऱ्या चांगल्या बॅक्टेरियांना पोषणसुद्धा मिळते.

पण, जर तुम्हाला आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी संत्र्याचा रस प्यायचा असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवा…

१. फक्त एक छोटा ग्लास संत्र्याचा रस प्या, साधारणपणे १५० मिलिलिटरपेक्षा कमी.

२. ताजे किंवा कोल्ड प्रेस्ड ज्यूस (cold-pressed) रसाची निवड करा आणि कधीही त्यात साखर घालू नका.

३. जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर सकाळी संत्र्याचा रस पिणे टाळा.

४. फायबर आणि प्रथिने समृद्ध पदार्थांबरोबर संत्र्याचा रस प्या.

५. फायबर टिकवून ठेवण्यासाठी आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी संत्र सालीसकट खाण्याची सवय करा.

कमी प्रमाणात आणि योग्य पदार्थांसह संत्र्याचा रस नाश्त्याला आणखीन आरोग्यदायी बनवू शकतो. पण, जर तुम्ही रोज नाश्त्याला संत्र्याचा रस पिणार असाल तर नीट विचार करा…