तोंडाच्या स्वच्छतेबद्दल जागरूक असणे खूप महत्त्वाचे आहे. तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण शरीरावर परिणाम होऊ शकतो. आजकाल दातांच्या सुरक्षेसाठी माउथवॉश वापरण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. सामान्यतः लोक दात स्वच्छ करण्यासाठी आणि तोंड जंतुमुक्त राखण्यासाठी वेगवेगळे ओरल केयर प्रॉडक्ट्स वापरतात. लोक आपले दात आणि तोंड स्वच्छ करण्याकरिता विविध ब्रँडच्या माउथवाॅशचा उपयोग करतात. तोंडातील जीवाणूंचा नाश करण्यासाठी माउथवॉशचा उपयोग केला जातो. परंतु, दररोज माउथवॉश वापरण्यापूर्वी एकदा काही गोष्टी नीट समजून घेणे फार गरजेचे आहे, असे गुडगाव येथील दंतचिकित्सक डॉ. पुनित के. मेनन यांनी सांगितले असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉ. पुनित मेनन यांनी सांगितल्यानुसार, “बाजारात अनेक प्रकारचे रसायनयुक्त माउथवॉश उपलब्ध आहेत. माउथवॉश वापरून, आपण दात किडण्यापासून वाचवू शकतो. तसेच माउथवॉश वापरल्याने दात आणि हिरड्यांमध्ये प्लाक जमा होत नाही. त्याशिवाय माउथवॉश तोंडातील जीवाणू नष्ट करण्यासाठीही उपयुक्त आहे. माउथवॉश उत्पादने प्लेक, पोकळी, श्वासाची दुर्गंधी व हिरड्यांना आलेली सूज यांसारखी परिस्थिती कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. द्रव स्वरुपातील या माउथवॉशमुळे त्याच्या माध्यमातून तोंडाच्या कानाकोपऱ्यांचीही स्वच्छता करणे सहज शक्य होते. त्यामुळे एकूणच मौखिक स्वच्छता सुधारते. तथापि, दीर्घकालीन वापरामुळे काही नकारात्मक परिणामही होतात,” असेही ते आवर्जून सांगतात.

(हे ही वाचा : तुम्ही रोज मासे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या…)

“अनेक जण माउथवॉश वापरल्यानंतर तोंडाची चव बिघडते, अशी तक्रार करतात. सतत माउथवॉश वापरल्यानंतर तोंडात कोरडेपणा जाणवतो आणि सतत तहान लागते. तसेच माउथवॉश वापरल्यामुळे काही जणांना ॲलर्जीचाही त्रास होऊ शकतो. माउथवॉशसाठी ज्यांचे मुख्य अँटीसेप्टिक एजंट अल्कोहोल किंवा क्लोरहेक्साइडिन आहे, त्यांनी ते वारंवार वापरल्याने कोरडेपणा, जळजळ, तोंडाच्या उतींना जळजळ किंवा लाळेच्या रचनेत बदल होऊ शकतो. बाजारात मिळणाऱ्या माउथवाॅशमुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणामही होऊ शकतो,” असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

अँटीसेप्टिक माउथवॉश तोंडावाटे मायक्रोबायोममध्ये व्यत्यय आणू शकतात आणि नायट्रिक ऑक्साईडच्या उत्पादनावर परिणाम करतात. डॉ. मेनन म्हणतात, “ओरल मायक्रोबायोम ही एक जटिल परिसंस्था आहे; ज्यामध्ये शरीराद्वारे शोषल्या जाणाऱ्या अन्नाच्या विघटनास मदत करणारे फायदेशीर जीवाणू आणि आपल्या तोंडाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकणारे हानिकारक जीवाणू असतात.”

तथापि, अँटीसेप्टिक माउथवॉशचा वापर या नायट्रेट-उत्पादक जीवाणूंची संख्या कमी करू शकतो, तोंडी pH बदलू शकतो; ज्यामुळे नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन कमी होते आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आरोग्यावर परिणाम होतो. माऊथवॉश वापरण्याच्या वारंवारतेमुळे तोंडातील फायदेशीर आणि हानिकारक जीवाणूंचे संतुलन बिघडू शकते, यावर डॉ. मेनन जोर देतात.

अँटीसेप्टिक माउथवॉशचा दीर्घकाळ वापर केल्यास व्यक्ती-व्यक्तीवर अवलंबून प्रणालीगत परिणाम होऊ शकतात. या प्रभावांमध्ये हायपरटेन्शन, आतड्यांसंबंधीचे आरोग्य आणि कुपोषण यांचा समावेश असू शकतो. डॉ. मेनन स्पष्ट करतात की, दीर्घकाळ आणि वारंवार वापराचे परिणाम कमी स्पष्ट आहेत आणि अनपेक्षित परिणाम होऊ शकतात. माउथवॉशमध्ये काही रसायने असू शकतात; जी तोंड स्वच्छ ठेवण्यास आणि जीवाणू, जंतू इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करतात. पण, त्यांचा अतिवापर आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक ठरू शकतो.