आपल्या देशात मासे आवडीने खाणारे अनेक लोक आहेत. विशेषत: कोकणपट्ट्याकडे राहणारे लोक समुद्रातील मासे अगदी आवर्जून खातात. अनेक प्रकारचे मासे बाजारात उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक माशाची चव वेगळी असते. तसंच त्यातून मिळणारे पोषक घटकही वेगळे असतात. माशांमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. जी आपल्या शरीराला गरजेची आहेत. मासे खाण्याचे अनेक फायदे आहेत, हे तुम्हाला माहिती असतीलच. पण तुम्ही दररोज मासे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, हे तुम्हाला माहिती आहे का? याबाबतचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ…

माशांमध्ये लो फॅटचे प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते जे शरीरासाठी आवश्यक असते. माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन्स  D आणि B2 असते. या शिवाय माशांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस आणि झिंक, आर्यन, आयोडीन, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम यांचे योग्य प्रमाण असते. तुम्ही मासे खाल्ल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल, जाणून घ्या…

१. मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर

चरबीयुक्त माशांमध्ये असलेले ओमेगा -३ फॅटी ॲसिड आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉन्सचा विकास स्थिर ठेवण्यास मदत करते. यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि सामर्थ्य वाढू शकते. माशांच्या नियमित सेवनाने मानसिक आरोग्य सुधारण्यास तसेच अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते. रोज मासे खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.

(हे ही वाचा : रक्तातील साखर कमी करून मधुमेहावर नियंत्रण ठेवायचयं? फक्त ‘या’ दोन गोष्टी करा; महिनाभरात दिसेल फरक)

२. निरोगी हृदयासाठी फायदेशीर

मासे खाल्ल्यामुळे हृदयालाही फायदा होतो. माशामध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड असतं. त्यामुळे हृदय रोगाची भीती कमी होते. मासांहारी लोकांनी आहारात नियमित माशाचा समावेश करावा.

३. मजबूत हाडे

मासे हा व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डीची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी माशांमध्ये भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाडं मजबूत करायची असतील, तर मासे नेहमी खावे.

४. डोळ्यांसाठी फायदेशीर

वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. त्यामुळे डोळे चांगले ठेवण्यासाठी मासे खायला हवे. यामुळे नजर चांगली होते.  माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिड डोळ्यांसंबधित आजार दूर ठेवण्यास मदत करतात.

बहुतेक निरोगी व्यक्तींसाठी, आठवड्यातील बहुतेक दिवस आपल्या आहारात माशांचा समावेश करणे हे असंख्य आरोग्य फायदे मिळवण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो, असे डाॅ. बक्षी सांगतात.

तथापि, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी माशांचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा, असेही ते सांगतात.