Health Benefits of a Vegan Diet : अलीकडेच इंटरनेट सेन्सेशन बनलेली बॉलीवूड कोरिओग्राफर फराह खान आणि तिचा कूक दिलीप यांनी अभिनेत्री अलाया एफच्या मुंबईच्या घरी भेट दिली. यावेळी ती खास अलायाची आई अर्थात अभिनेत्री पूजा बेदीसाठी रोस्ट चिकन घेऊन गेली. या भेटीदरम्यानचा व्हिडीओ फराह खानने तिच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. ज्यात फराह म्हणतेय की, अलाया सॉरी, मला माहिती आहे तू शाकाहारी आहेस. ज्यावर अलाया उत्तर देते की, फक्त एक महिन्यासाठी शाकाहारी आहे, पुढच्या महिन्यात मी रोस्ट चिकन खाऊ शकते.
याचा अर्थ अलायाने एक महिना मांसाहार खाणं बंद केलं आहे, पण अशाप्रकारे तुम्ही महिनाभर मांसाहारी जेवण सोडून शाकाहारी जेवण घेत असाल तर त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल हे आरोग्यतज्ज्ञांकडून जाणून घेऊ…
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना क्लिनिकल डायटिशियन आणि डायबिटीज एज्युकेटर कनिक्का मल्होत्रा म्हणाल्या की, अनेक जण असे अचानक मांसाहार सोडून शाकाहारी जेवण खाताना दिसतात. यावेळी लोकांना खूप हलकं आणि अधिक ऊर्जावान वाटतं. असे फळे, भाज्या, कडधान्य आणि शेंगदाण्याच्या सेवनामुळे होते. कारण त्यात अधिक प्रमाणात फायबर असते, जे पचनक्रिया नियंत्रित करण्यास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते.
कनिक्का मल्होत्रा यांच्या मते, अचानक शाकाहारी झाल्यास एखाद्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉलच्या पातळीत आणि रक्तदाबातही सुधारणा दिसून येऊ शकते, कारण शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या फॅट्सचे प्रमाण कमी असते. काही लोकांचे वजन थोडे कमी होऊ शकते, कारण शाकाहारी जेवणात कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे पोट जास्तवेळ भरल्यासारखे वाटते, अशाने अधिक खाणं होत नाही.
दुसरीकडे, पचनसंस्थेला शाकाहारी जेवणातील अतिरिक्त फायबरची सवय होत असल्याने सुरुवातीला थोडेसे पोट फुगणे किंवा गॅस होणे यांसारख्या सामान्य समस्या जाणवू शकतात. पण, मांसाहारी अन्नपदार्थांमधून अधिक प्रमाणात मिळणारे पोषक घटकदेखील शरीरासाठी तितकेच महत्त्वाचे असतात. मांसाहारात व्हिटॅमिन बी १२, लोह आणि ओमेगा-३ असे पोषक घटक असतात.
महिनाभर शाकाहारी जेवण खाल्ल्याने शरीरात कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही, पण ते खाताना आहारात फोर्टिफाइड फूड किंवा सप्लिमेंटचा समावेश करावा, असे मल्होत्रा यांनी सांगितले.
शाकाहारी आहार एक महिना खाल्ल्यास तुमचे शरीर चांगल्याप्रकारे रिसेट होते, पण तो आहार संतुलित असणे गरजेचे आहे असे मल्होत्रा यांनी सुचित केले.