चालणे ही सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे. चालण्यासारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. त्यामुळे इतर कुठला व्यायाम केला नाही तरी चालेल. पण, दिवसातून काही वेळ तरी चालायला हवे, हे प्रत्येकालाच माहीत असते. दिवसभरात भरपूर चालल्याने आपल्या सर्वांगाचा व्यायाम होतो. चालणे हे निरोगी शरीर आणि मनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. योग्य पद्धतीने चालण्याचा व्यायाम केल्यास आपल्या शरीराची चयापचयाची क्षमताही सुरळीत सुरू राहते. दररोज जितका वेळ आपण चालतो, तितक्या जलद गतीने कॅलरी घटवण्यास मदत मिळते. चालणे हा असा व्यायाम आहे की, जो कोणीही करू शकतो. या व्यायामामध्ये तुमचे संपूर्ण शरीर सक्रिय राहते आणि तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग वेगाने काम करतो. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, व्यक्तीने दररोज किती पावले चालावे? याविषयी मुर्शिदाबाद येथील केअर हॉस्पिटल्सचे डॉ. मोईनुद्दीन यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्याबाबत जाणून घेऊ…

डॉ. मोईनुद्दीन सांगतात की, चालणे हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे; जो वय किंवा तंदुरुस्तीची पातळी विचारात न घेता, भरपूर फायदे मिळवून देतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, दररोज फक्त ३० मिनिटे मध्यम तीव्रतेचे चालणे आपल्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा करू शकते.

चालण्याचे फायदे

  • वजन कमी करण्यासाठी चालणे हा अतिशय उत्तम उपाय आहे. कोणत्याही वेळेला कितीही वेगाने चालले तरी ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे वजन कमी होते.
  • शरीराचे वजन पायांवर पेलून आपण दिवसभर चालतो. त्यामुळे शरीरातील हाडांची शक्ती वाढते. त्यामुळे हाडे लवकर ठिसूळ होत नाहीत.
  • चालणे स्नायूंची ताकद वाढवण्यास व टिकवून ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे तुमची शारीरिक क्षमता वाढते. चालण्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो. रक्तदाब कमी होण्यास मदत होते. वेगाने चालल्यास हृदय आणि श्वसनक्रियेत फायदा होतो.
  • चालण्याने तणावाची पातळी कमी होते आणि तणाव कमी होतो; ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटते.
  • चालणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करून मधुमेहाचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकते.

(हे ही वाचा : दररोज टरबुजाचा रस प्यायल्यास तुमच्या शरीरावर काय होईल परिणाम? तज्ज्ञांकडून जाणून घ्या… )

दहा हजार पावले चालणे अनेकदा सुवर्ण मानक मानले जाते; परंतु तुमच्या वयानुसार आदर्शत्वाची ही संख्या बदलू शकते, असे डॉ. मोईनुद्दीन म्हणाले.

६० वर्षांखालील इष्टतम आरोग्यदायी फायद्यांसाठी आणि मृत्यूची जोखीम कमी करण्यासाठी दररोज ८,००० ते १०,००० पावले चालण्याचे लक्ष्य ठेवा.
६० पेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींनी एकूण आरोग्य आणि शारीरिक मर्यादा लक्षात घेऊन दररोज ६,००० ते ८,००० पायऱ्यांचे लक्ष्य ठेवणे, अशी शिफारस आहे.

चालण्याची नवीन दिनचर्या सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: जर तुमच्याकडे आधीपासून अस्तित्वात असलेली वैद्यकीय परिस्थिती असेल जसे की:

  • हृदयरोग
  • उच्च रक्तदाब
  • संधिवात
  • अलीकडील जखम
  • मधुमेह
  • श्वसनाच्या समस्या

बैठी जीवनशैली असलेल्यांसाठी लगेच १०,००० पावले उचलण्याचे उद्दिष्ट कठीण असू शकते. डॉ. मोईनुद्दीन यांनी हळूहळू सुरुवात करणे आणि वास्तववादी ध्येये निश्चित करण्याच्या महत्त्वावर भर दिला. पायऱ्यांच्या छोट्या संख्येने सुरुवात करा आणि तुमची फिटनेस सुधारत असताना हळूहळू अंतर आणि तीव्रता वाढवायची हे लक्षात ठेवा. दैनंदिन चालण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या शरीराचे ऐका आणि चालण्याची परिवर्तनीय शक्ती अनलॉक करण्यासाठी तुमची क्रियाकलाप पातळी हळूहळू वाढवा, असेही डाॅ. मोईनुद्दीन सांगतात.