2 Gulab jamun Calories Burning With Walk: साखरेच्या पाकातुन बाहेर काढलेला वरून थोडा क्रिस्पी आणि आतून लोण्याच्या गोळ्यासारखा वितळणारा गुलाबजाम समोर आला की नाही म्हणणं म्हणजे कठीण काम होऊन बसतं. काही ठिकाणी तर या गुलाबजाम बरोबर वरून थंडगार आईस्क्रीम दिलं जातं किंवा रबडीची जोड केली जाते, म्हणजे एकाच फटक्यात चव, इच्छा आणि वजन सगळंच वाढायची सोय होते. यावर एकवेळ तुम्ही मनाला ब्रेक लावून नाही म्हणालही पण पाहुण्या रावळ्यांकडे गेल्यावर आग्रह का मोडता येतो? अशावेळी स्वतःसह समोरच्याचं मन राखायचं म्हणून आपण गुलाबजाम खाऊन घेतो. गुलाबजाम खाऊन झाला की का माहित नाही पण अचानक मनात अपराधीपणाची भावना येऊ लागते. मग तिला आळा घालण्यासाठी आपण स्वतःला सांगतो आता ना चार पावलं चालावं लागेल म्हणजे पटापट कॅलरीज बर्न होतील. पण तुम्हाला माहित आहे का, गोड खाऊन थोडं चालल्याने पटकन कॅलरीज बर्न होतील हा समजच मुळात चुकीचा आहे. असं आम्ही नाही हैदराबादच्या अपोलो हॉस्पिटलचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार सांगतायत. नेमकं त्यांचं म्हणणं काय, चला पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. कुमार यांनी आपल्या X अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, दोन गुलाबजामांमधून (आकारानुसार) साधारण ३०० कॅलरीज प्राप्त होतात आणि त्या बर्न करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला तब्बल १ तास चालणं गरजेचं असतं.

या ज्वलंत प्रश्नाला उत्तर देताना, डॉ. रोहिणी पाटील, एमबीबीएस आणि पोषणतज्ज्ञ, संस्थापक, न्यूट्रसी लाइफस्टाइल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, चालण्याचे प्रमाण शरीराचे वजन, चयापचयाचा वेग आणि सामान्य शारीरिक हालचाली यासारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते. परंतु सर्वसाधारणपणे सांगायचे तर, सकाळी ३० मिनिटं ते १ तासाचा वेगवान वॉक केल्याने तुम्हाला कॅलरीज बर्न करण्यात आणि दिवसभरात चयापचय वाढवण्यास मदत होऊ शकते.

डॉ. पाटील पुढे सांगतात की, एका गुलाब जामुनमध्ये सुमारे १५० -२०० कॅलरीज असतात. जर तुम्ही दोन गुलाबजाम खाणार असाल तर शरीरात ३०० ते ४०० कॅलरीज वाढतात. ३० मिनिटांच्या संथ वॉकमध्ये एखादी व्यक्ती १२० ते १८० कॅलरीज बर्न करू शकते, तर ३० मिनिटांच्या वेगवान वॉकने २००- ३०० कॅलरीज बर्न होऊ शकतात. म्हणून, दोन गुलाब जामुन खाल्यानंतर कॅलरीजचे प्रमाण संतुलित करण्यासाठी, तुम्हाला सकाळी किमान ३० मिनिटं ते एक तास चालण्याचे उद्दिष्ट ठेवायचे आहे.

अतिरिक्त कॅलरीज जाळण्याशिवाय हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य, मनःस्थितीवर नियंत्रण आणि दिवसभर अधिक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी सुद्धा सकाळच्या चालण्याची मदत होते. परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की व्यायाम हा आरोग्यदायी आहाराला पूरक असला पाहिजे, अति खाल्ल्यावर चालणे किंवा व्यायाम करणे हा काही जादुई उपाय नाही. चालण्याने गोड खाण्याचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात, परंतु संयम आणि आरोग्यदायी पदार्थांची निवड करणे हे महत्त्वाचे आहे.

हे ही वाचा<< प्रियांका चोप्राच्या दिराला त्वचेचा कर्करोग; तीळ व चामखिळाच्या ‘या’ बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, पाहा लक्षणे

डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले की, क्वचित एखाद्या दिवशी गोड पदार्थांचे सेवन करणे ठीक आहे पण त्याची शरीराला सवय लावून घेऊ नका. तसेच व्यायामाच्या बाबतसुद्धा चालणे हा उत्तम व्यायाम असला तरी तुम्ही सक्षम असल्यास केवळ चालण्यावर अवलंबून राहू नका. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने किंवा वेट ट्रेनिंग करून आपण आपले आरोग्य सुधारू शकता.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many steps you need to walk to burn calories of eating 2 gulab jamun health news in marathi weight loss walking 30 mins svs