How Does Sleep Affect Your Cholesterol and diabetes Levels: झोप ही अन्न, पाण्याइतकीच आपली महत्त्वाची गरज आहे. झोपेमध्ये आपल्या शरीरात महत्त्वाचे जैविक बदल होत असतात. चांगली झोप रोगप्रतिकारकशक्ती वाढवते आणि शरीराला रोगांपासून वाचवते. रात्री शांत आणि सलग झोप लागलेली असेल तरच आपला पुढचा दिवस चांगला जातो, नाही तर दिवसभर आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो. आजकालच्या ताणतणावपूर्ण लाइफस्टाइलमुळे काही जणांना झोप न येण्याची समस्या सतावते. कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रित करण्यासाठी तुम्हाला किती झोपेची गरज आहे, याविषयीचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

मधुमेह ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. मधुमेह झाला की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे औषधे आणि डाएट. याबरोबरच व्यायाम, झोप या गोष्टींकडेही पुरेसे लक्ष देणे आवश्यक असते. हार्वर्ड हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे म्हटले आहे की, अल्पकालीन झोपेमुळे तुम्हाला कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह या दोन्हींचा धोका होऊ शकतो.

(हे ही वाचा : Blood Sugar वाढण्याआधी शरीर देते ‘हे’ सात संकेत; तज्ज्ञांनी सांगितलं कसं ओळखावं? दुर्लक्ष केल्यास पडू शकते महागात )

झोप तुमच्या शरीराला आणि मनाला रिचार्ज करण्यास मदत करते. झोपेच्या वेळी मेलाटोनिन नावाचे हार्मोन सक्रिय होत असल्याने तुम्हाला आराम मिळतो, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदय गती नियंत्रणात येते. पण, तुमची अपुरी झोप असेल किंवा तुमची सर्केडियन लय विस्कळीत असेल तर त्याचा विपरित परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. निद्रानाशामुळे तुमचे शरीर असामान्यपणे काम करू शकते. तुमच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. हे तुमच्या मेंदूला थकवते, ज्यामुळे शरीराच्या नैसर्गिक कार्यावर परिणाम होतो.

झोपेच्या कमतरतेमुळे उच्च कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढू शकतो. २००९ च्या अभ्यासात असे दिसून आले की, जे पुरुष सहा तासांपेक्षा कमी झोपतात त्यांच्यात एलडीएल कोलेस्ट्रॉल जास्त होते. याव्यतिरिक्त, ज्या स्त्रिया अंदाजे समान प्रमाणात झोपतात, त्यांच्यात कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. झोपेचा पुरुष आणि स्त्रियांवर वेगवेगळा परिणाम झाल्याचे दिसून आले. झोपेच्या कमतरतेमुळे चयापचय आणि भूक नियंत्रित करणारे हार्मोन लेप्टिनची पातळी कमी होऊ शकते.

तसेच २०२० मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी कॉग्निटिव्ह अँड ब्रेन सायन्सेस, अकादमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्स, बीजिंग यांच्या संशोधनातून असे दिसून आले की, झोपेच्या कमतरतेमुळे सीरम कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि यकृतामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. अपुरी झोप घेतल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. मधुमेह कधीच नियंत्रणात राहत नाही. झोपेच्या कमतरतेमुळे रात्री आपल्याला खूप भूक लागते, त्यामुळे आपण अनेक पदार्थ खातो. चुकीच्या वेळी खाण्याच्या सवयीमुळे लठ्ठपणा आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते. एका अहवालानुसार, जे लोक सहा तासांपेक्षा कमी तास झोपतात, त्यांना टाइप २ मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते.

अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन आणि स्लीप रिसर्च सोसायटीने शिफारस केली आहे की, प्रौढांनी दररोज किमान सात ते आठ तासांची झोप घेतली पाहिजे. यासोबतच योग्य आहार आणि नियमित व्यायामामुळेच तुम्ही आजारांना दूर ठेवू शकता, असेही संशोधनातून समोर आले आहे.