आरोग्यदायी जीवनशैली राखणे हे सर्वांगीण आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. आजारांवर नियंत्रण ठेवून, ते दूर ठेवण्यासाठी जीवनशैलीला शिस्त लावणे आवश्यक आहे. हृदयविकार, मधुमेह व रक्दाब हे आजार अकाली मृत्यूला कारणीभूत ठरत असून, योग्य आहार पद्धती, व्यायाम व योग्य जीवनशैलीमुळे या आजारांना दूर ठेवण्यास मदत होऊ शकते. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने दिल्लीतील केअर हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ डॉ. जी. सुषमा यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. सुषमा यांनी स्पष्ट केले आहे की, पुरुष आणि महिलांना वेगवेगळ्या अशा विशिष्ट पौष्टिक गरजा असू शकतात. जसे की पुरुषांच्या आरोग्यासाठी विशिष्ट जीवनसत्त्वे आणि खनिजे महत्त्वाची असतात. त्याचप्रमाणे स्त्रियांना जास्त लोह आवश्यक असू शकते; विशेषतः मासिक पाळी आणि गर्भधारणेदरम्यान.

आहारतज्ज्ञ भक्ती आडकर यांनी नमूद केल्याप्रमाणे, पौष्टिक आहार हा जीवनशैलीशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठीचा मोठा आधारस्तंभ आहे. “जीवनशैलीतील आजारांसाठी खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव व उच्च तणाव पातळी जबाबदार ठरते. मात्र, योग्य पोषणयुक्त आहार घेतल्यास खालील आजारांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

मधुमेह

मधुमेहाचे योग्यरीत्या व्यवस्थापन करण्यासाठी संतुलित आहाराचा समावेश करणे, नियमित शारीरिक हालचाली करणे व वजन व्यवस्थापन करणे अशा प्रकारचे बदल जीवनशैलीत करणे आवश्यक आहे. रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आणि औषधे नियमित घेतल्यासही मधुमेह कमी होऊ शकतो.

हृदयरोग

हृदयाच्या आरोग्यासाठी समतोल आहाराचा समावेश करणेही गरजेचे आहे. तसेच नियमित व्यायाम करणे, धूम्रपान सोडणे व तणावाचे व्यवस्थापन करणे यांमुळेही हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

लठ्ठपणा

हल्ली लठ्ठपणाच्या समस्येने सगळेच हैराण झाले आहेत. कॅलरी नियंत्रित करणे, योग्य आहार आणि नियमित व्यायामासह जीवनशैलीतील बदल या बाबी वजन व्यवस्थापनासाठी गरजेच्या आहेत.

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी आहारातील बदल जसे की, आहारात सोडियमचे सेवन कमी करणे, योग्य ते वजन राखणे, नियमित व्यायाम करणे व तणावाचे व्यवस्थापन करणे. या बाबी उच्च रक्तदाबावरील नियंत्रणासाठी गरजेच्या आहेत.

तुमच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये नक्की करा हे बदल

नियमित व्यायाम

चांगले आरोग्य राखण्यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यायामामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आरोग्य सुधारते. त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि वजन नियंत्रणासाठी मदत होते. प्रत्येक आठवड्यात किमान १५० मिनिटे व्यायाम करण्याचे लक्ष्य ठेवा.

बंद करा मद्यपान

जास्त प्रमाणात मद्यपान हे हृदयाच्या समस्या, यकृताचे आजार व विशिष्ट कर्करोगाचा धोका वाढवतो. त्यामुळे मद्यपान लगेच बंद करा.

सोडा धूम्रपान

धूम्रपानामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि काही प्रकारचे कर्करोग होण्याचा गंभीर धोका असतो. त्यामुळे धूम्रपान लगेच बंद करा.

हेही वाचा >> Health Special : वाढतं वय दिसतं, ते कसं थोपवायचं?

ताण व्यवस्थापन

दीर्घ काळापर्यंतचा ताण अनेक आरोग्याच्या समस्यांशी निगडित आहे. नियमित व्यायाम, पुरेशी झोप व आहारात संतुलन राखणे यांसारख्या सवयींमुळे तणाव कमी होतो. अशा प्रकारे ताणाचे व्यवस्थापन केले पाहिजे.

संतुलित आहार

धान्य, फळे, भाज्या, मांस यांसारखा संतुलित आहार घ्या. बाहेरचे प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर व मीठ यांचे प्रमाण मर्यादित करा. त्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि लठ्ठपणाची समस्या दूर होईल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to prevent lifestyle diseases regular exercise and a nutritious diet are a cornerstone srk