‘मी काही तास बसलो, की पाठ आणि मान आखडून जाते, काम थांबवलं की मानेत वेदना जाणवते’, अशी तक्रार आजकाल अनेकांकडून ऐकायला मिळते. ऑफिसमध्ये आठ-आठ तास लॅपटॉपसमोर बसणं, कामात सतत लक्ष देणं, कामाच्या मधे ब्रेक न घेता येणं या सवयी शरीरावर नकळत परिणाम करतात.
“सीटिंग इज द न्यू स्मोकिंग” म्हणजेच सतत बसून राहणं हे आपल्या आरोग्यासाठी तितकंच घातक आहे, जितकं सिगारेटचं व्यसन! त्यामुळे या लेखात आपण पाहूया, की ऑफिसमध्ये किंवा घरच्या वर्क फ्रॉम होम सेटअपमध्ये कोणते बदल केले तर आपण जास्तीत जास्त अ‍ॅक्टिव राहू शकू.
सतत एका जागी बसून काम केल्याने काय होतं?

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा
  • बैठ्या कामाचे परिणाम हे शरीरातील बहुतेक सगळ्या अवयवांवर होतात.
  • मानेचे आणि वरच्या पाठीचे स्नायू आखडतात
  • कंबरेचे स्नायू दीर्घकाळ ताणलेल्या अवस्थेत राहतात
  • काही स्नायू अति प्रमाणात ताणले जातात आणि काही अति प्रमाणात आखडून जातात
  • यामुळे स्नायूंना पुरेसा रक्त पुरवठा होत नाही
  • सतत बसून काम केल्याने चयापचय क्रिया मंदावते, परिणामी पोटावरील चरबीचं प्रमाण वाढतं, परिणामी स्थूलता वाढते, डायबेटिस, ब्लड प्रेशर, सांध्यांचे त्रास यांची शक्यता वाढते.
  • पायाचे सांधे देखील आखडून जातात.
  • फुप्पुसांची कार्यक्षमता कमी होते.
  • एका जागी बसून स्क्रीन वर काम करणाऱ्या व्यक्तींच्या डोळ्यावर ताण येतो.

डेस्क एक्झरसाइजेस म्हणजे काय?

डेस्क एक्झरसाइजेस म्हणजे काही सोप्या, सौम्य आणि पटकन होणाऱ्या हालचाली ज्या आपल्याला अगदी ऑफिसच्या खुर्चीवर बसल्या बसल्या ही करता येतात. या हालचालींमुळे बसून काम करण्याचे दुष्परिणाम बऱ्याच अंशी कमी होतात.

हे डेस्क एक्झरसाइजेस कसे करावे?

आपल्या कामाच्या पद्धतीनुसार आणि वेळेनुसार तसाच आपल्या वयाला अनुसरून हे व्यायाम ठरवले जातात. साधारणपणे मानेच्या आणि कंबरेच्या स्नायूंना योग्य प्रमाणात ताण देऊन ते पुन्हा सैल सोडले जातात, यामुळे स्नायूंवर आणि सांध्यांवर आलेला ताण कमी होतो, वेदना कमी होतात.
फिजियोथेरेपिस्ट तुम्हाला हे व्यायाम योग्य पद्धतीने शिकवू शकतात, त्यानंतर आपल्या स्मार्ट वॉचेसमध्ये किंवा मोबाईल फोनमध्ये या व्यायामांसाठी रिमाइंडर लावून ते अगदी सहजरीत्या कामाच्या ठिकाणी केले जाऊ शकतात.

  • व्यायामांशिवाय, कामाच्या ठिकाणी जर काही सोप्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या तर आपला एका जागी बसण्याचा वेळ कमी होऊ शकतो, जसं की
  • घरी काम करताना पाणी जवळ घेऊन बसू नका, प्रत्येक वेळी तहान लागली की स्वतः उठून पाणी प्या
  • ऑफिस मधे पाण्याची बाटली दिवसाच्या सुरुवातीलाच पूर्ण भरून आणू नका, थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी स्वत: भरून आणा
  • प्रिंटर तुमच्या टेबल शेजारी न ठेवता दूर ठेवा, म्हणजे प्रत्येक वेळी कोणतीही प्रिंट घेताना तुम्हाला उठावं लागेल.
  • डस्टबिन टेबल शेजारी न ठेवता दूर ठेवा.
  • सहकाऱ्यांशी बोलायचं झालं तर त्यांच्या जागेवर जाऊन बोला.
  • प्रत्येक वेळी फोन आला की उभ राहून किंवा फेऱ्या मारत फोन वर बोला.
  • ठराविक वेळाने डोळे बंद करून त्यांना आराम द्या
  • लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा
  • टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जाणीवपूर्वक दूर पार्क करा.

बसून काम करणं पूर्णपणे टाळणं शक्य नाही, पण काम आणि आरोग्य यामध्ये योग्य समतोल राखणं नक्कीच शक्य आहे. आपल्या शरीराचा आदर करा, हालचाल या नैसर्गिक गरजेला महत्त्व द्या आणि दिवसभरातील बैठे तास जाणीवपूर्वक कमी करा. सगळ्यात शेवटी हे ही सांगणं महत्त्वाचं आहे की डेस्क एक्सरसाइजेस किंवा वर सांगितलेले उपाय हे रोजच्या व्यायामाला पर्याय होऊ शकत नाहीत, उलट ते तुमच्या रोजच्या व्यायामाची परिणामकारकता वाढवतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to stay fit in office how to avoid back pain neck pain hldc psp