मद्यपान हे आरोग्यासाठी घातक आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. तरीही अनेक जण सर्रासपणे मद्यपान करतात. पण, मद्यपान करण्याचीही एक मर्यादा आहे. अति मद्यपान हे आरोग्यासाठी घातक आहेच; पण कमी वेळात जास्त मद्यपान करणे एखाद्याच्या जीवावरही बेतू शकते. काही महिन्यांपूर्वी थानकर्न कांथी (Thanakarn Kanthee) या थाई कंटेंट क्रिएटरचे मद्याच्या विषबाधेमुळे निधन झाले.

बक्षीस म्हणून मोठी रक्कम जिंकण्यासाठी व्हिस्कीच्या दोन बाटल्या पिण्याचे आव्हान त्याने स्वीकारले होते. या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला त्यांच्या चाहत्यांमध्ये बँक लिसेस्टर (Bank Leicester) म्हणून ओळखले जाते. ख्रिसमसच्या दिवशी चांथाबुरीच्या था माई जिल्ह्यात पार पडलेल्या वाढदिवसाच्या उत्सवादरम्यान ३५० मिली रिजन्सी व्हिस्कीची एक बाटली पिण्यासाठी प्रति बाटली १०,००० थाई बात (₹ २५,०७६) देण्याची ऑफर त्याला देण्यात आली होती, असे वृत्त बँकॉक पोस्टने दिले आहे. हे आव्हान पूर्ण करताना दोन बाटल्या दारू प्यायल्यानंतर तो अचानक कोसळला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

इतक्या कमी वेळात इतके जास्त मद्यपान केल्यास शरीराचे काय होते याबाबत इंडियन एक्स्प्रेसला आरोग्य तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

अ‍ॅलाइव्ह हेल्थच्या पोषणतज्ज्ञ व योग प्रशिक्षक तान्या खन्ना म्हणाल्या, “शरीर इतक्या वेगाने मद्यावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने तयार नसते “सामान्यत: यकृत तासाला फक्त एक मानक पेय चयापचय करू शकते. एका मानक पेयामध्ये सुमारे १४ ग्रॅम शुद्ध मद्य असते, जे अंदाजे ४४ मिली व्हिस्की, १४८ मिली वाइन किंवा ३५५ मिली बिअरच्या समतुल्य असते. जेव्हा तुम्ही खूप जलद मद्यपान करता तेव्हा तुमचे शरीर त्यावर जलदतेने प्रक्रिया करू शकत नाही.” असे त्या खन्ना सांगतात.

खन्ना यांच्या मते, शरीराचे नियंत्रण केंद्र म्हणून मेंदू विशेषतः असुरक्षित असतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मेंदूला विशेषतः नुकसान होण्याची शक्यता असते. जेव्हा मद्यपान खूप जास्त प्रमाणात केले जाते तेव्हा मेंदूची निर्णय क्षमता, समन्वय आणि मेंदूच्या कार्यात अडथळा येतो, ज्यामुळे मद्याची विषबाधा होते. त्यामुळे श्वासोच्छ्वास, हृदयाची गती व शरीराचे तापमान नियमन यांसारख्या आवश्यक कार्यांमध्ये व्यत्यय येतो, ज्यामुळे कोमा किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो.

“जलद मद्य सेवनामुळे एरिथमिया, हृदयाचे ठोके अनियमित होणे व अ‍ॅट्रियल फायब्रिलेशनचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,” असे त्यांनी सांगितले.

मद्य श्वसनसंस्थेवर दबाव टाकते आणि बहुतेकदा जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने उलट्या होतात, ज्यामुळे उलटी फुप्फुसात जाण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे न्यूमोनिया किंवा गुदमरल्यासारखे होऊ शकते. गॅस्ट्र्रिटिस, अल्सर व स्वादुपिंडाचा दाह (pancreatitis) यासह गॅस्ट्रोइंटेस्टायनल त्रास होऊ शकतो, असे त्या सांगतात.

होलिस्टिक न्यूट्रिशन व गट हेल्थ (आतड्याचे आरोग्य) कोच ईशा लाल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “व्हिस्कीच्या दोन बाटल्या (सुमारे ७५० मिली प्रत्येकी) पिणे म्हणजे ३० पेक्षा म्हणजे मानक पेयापेक्षा जास्त मद्य पिणे. रक्तातील अल्कोहोलचे प्राणघातक प्रमाण (BAC) सुमारे ०.४% आहे. इतकी व्हिस्की प्यायल्याने.तुमच्याकडून काही मिनिटांतच ही मर्यादा ओलांडली जाऊ शकते.”

“सुरुवातीला तुम्हाला उत्साह किंवा मद्यधुंद किंवा नशेत असल्यासारखे वाटेल; पण जसजशी मद्याची पातळी वाढते, तसतसा तुमच्या शरीराचा समन्वय बिघडतो, तुमचे बोलणेदेखील अवघड होते आणि निर्णय घेण्यास अडचण येते. जर मद्याचे प्रमाण खूप जास्त वाढले, तर तुमचे शरीर आपत्कालीन ब्रेक (थांबण्याचे संकेत) देणे सुरू करते. उलट्या होणे आणि शुद्ध हरपणे. मद्याच्या विषबाधेविरुद्ध हे तुमचे शेवटचे संरक्षण आहे. ही लक्षणे दिसल्यास मद्यपान थांबवा.” असे त्या सांगतात

सुरक्षितपणे मद्यपान करण्यासाठी त्यांनी सुचविलेल्या टिप्स खालीलप्रमाणे :

१. तासाभरात एकापेक्षा जास्त मद्य पेये पिऊ नका.

२. रिकाम्या पोटी कधीही मद्यपान करू नका. कारण- अन्नामुळे मद्याचे शोषण कमी होते.

३. तुमची मर्यादा जाणून घ्या. कारण- बहुतेक लोकांसाठी, दिवसातून दोन पेक्षा जास्त ही सुरक्षित मर्यादा असू शकते. प्रत्येक व्यक्तीची मर्यादा वेगळी असते.

४. भरपूर पाणी प्या. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी मद्य पाण्याबरोबर प्यावे.