टाईप-२ मधुमेह नव्याने निदान झालेल्या रुग्णांना हा प्रश्न नेहमीच पडतो, “कच्चा कांदा मेटफॉर्मिनपेक्षा फायदेशीर आहे का” हा प्रश्न ‘क्वोरा’वर एकाने विचारला होता. अनेक रुग्ण अशाच स्वरूपाच्या शंकांमध्ये अडकलेले दिसतात.” या पार्श्वभूमीवर दी इंडियन एक्स्प्रेसने याबाबत डायबेटोलॉजी तज्ज्ञांकडून खरी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेतले.
एंडोक्रिनॉलॉजिस्ट डॉ. संजय कलरा यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “अनेक रुग्ण त्यांच्याकडे येऊन विचारतात की, कच्चा कांदा टाईप-२ मधुमेहासाठी मेटफॉर्मिनची जागा घेऊ शकतो का? त्यावर त्यांचे नाही, असे अगदी स्पष्ट उत्तर आहे. मेटफॉर्मिन हे टाईप-२ मधुमेहासाठी दिले जाणारे सर्वांत पहिले औषध आहे आणि त्याचे परिणाम दीर्घकालीन, विश्वासार्ह व प्रमाणित आहेत. मोठ्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये असे सिद्ध झाले आहे की, मेटफॉर्मिन HbA1c कमी करते, उपवासानंतर आणि जेवणानंतरची रक्तातील साखरेची पातळी सुधारते, तसेच हृदयविकाराचा दीर्घकालीन धोकाही कमी होतो. त्याची कार्यपद्धतीही सिद्ध असून, यकृतातील ग्लुकोज उत्पादन कमी करणे, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारणे आणि आतड्यांतून ग्लुकोज शोषण नियंत्रित करणे या गोष्टींवर आधारित आहे. दशकानुदशके संशोधनांनी हे सिद्ध केले आहे.”
तरीही कच्चा कांदा काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो. कांदा, विशेषतः कच्चा, हायपोग्लायसेमिक गुणधर्म दर्शवतो. डॉ. कलरा सांगतात की, एका क्लिनिकल स्टडीमध्ये १०० ग्रॅम कच्चा लाल कांदा खाल्ल्यानंतटाईप-२ मधुमेह रुग्णांमध्ये काही तासांत उपवासातील रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली. प्रयोगशाळेत केलेल्या अभ्यासानुसार कांद्यातील घटक α-आमायलेस आणि α-ग्लुकोसिडेस एन्झाइम्सला रोखतात, ज्यामुळे कार्बोहायड्रेट्स पचन मंद होते आणि जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते.
परंतु कांदा आणि मेटफॉर्मिन यामध्ये फरक स्पष्ट आहे. मेटफॉर्मिनचे परिणाम नेहमीच ठरलेले, सातत्यपूर्ण आणि जगभरात हजारो रुग्णांवर अभ्यासलेले आहेत. कांद्याचे परिणाम मात्र वेगवेगळे असतात, अल्पकालीन असतात आणि मुख्यतः लहान गटांवर किंवा प्राणी मॉडेल्सवर अभ्यासलेले आहेत. कांद्याचे फायदे अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात दररोज खाणे आवश्यक असते, जे अनेक रुग्णांसाठी पचवायला कठीण होऊ शकते.
ठाणे येथील KIMS हॉस्पिटल्सचे डॉ. विजय नेगालूर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “कच्चा कांदा सुरक्षित आहे. फायबर, अँटीऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. रक्तातील साखरेच्या चढ-उतारांना तो नियंत्रित करण्यास मदत करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही सहायक ठरतो. पण, अति सेवन केल्यास काहींना पोटात गॅस, आम्लता किंवा इतर पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. निसर्गाने त्याचे फायदे दिले आहेत; पण फक्त आहारावर अवलंबून राहणे आणि औषध न घेणे धोकादायक ठरू शकते. संतुलन राखणे महत्त्वाचे आहे; आहार हा औषधांचा पूरक असायला हवा, पर्याय नाही.
डॉ. कलरा हेही सांगतात,”कांदा आणि इतर भाज्या चयापचयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत; पण औषधांची जागा घेऊ शकत नाहीत. कांदा हा फक्त पूरक आहाराचा भाग म्हणूनच वापरावा; एकमेव उपाय म्हणून नाही. टाईप-२ मधुमेह रुग्णांसाठी सुरक्षित मार्ग असा आहे की, मेटफॉर्मिन किंवा डॉक्टरने दिलेली औषधे नियमित घ्यावीत, कच्चा कांदा आणि इतर भाज्या चयापचयाच्या आरोग्यासाठी आहारात समाविष्ट कराव्यात आणि कोणत्याही नैसर्गिक उपायाची सुरुवात करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.