बरेच लोक रात्री उशिरा जेवतात किंवा स्नॅक्स खातात. अनेकांना वाटतं की त्यामुळे झोप चांगली लागेल. पण खरं म्हणजे झोपण्याच्या आधी खाणं शरीराच्या नैसर्गिक विश्रांती आणि दुरुस्तीच्या कार्यामध्ये अडथळा आणतं. तुम्ही आठ तास झोपला तरी शरीर खरं तर विश्रांती घेत नसतं — ते अन्न पचवण्यात व्यस्त असतं.
झोपण्याच्या आधी खाल्ल्यावर काय घडतं
जेव्हा आपण झोपेच्या अगदी आधी खातो, तेव्हा आपलं पोट, यकृत, आतडे आणि स्वादुपिंड पूर्ण क्षमतेनं अन्न पचवण्यात, पोषकद्रव्य शोषण्यात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात गुंतलेले असतात. या संपूर्ण प्रक्रियेला ऊर्जा लागते आणि त्यामुळे शरीराला ‘डीप स्लीप’(गाढ झोप) — म्हणजेच खरी विश्रांती मिळत नाही.
गाढ झोपेदरम्यान हृदयगती मंदावते, शरीराचं तापमान कमी होतं आणि पेशीय ऊतींची दुरुस्ती, विकासाच्या संप्रेरकांची (Growth Harmons) निर्मिती आणि ऊर्जा पुन्हा निर्माण करणे ही कामं करतात. पण, पचन प्रक्रिया सुरू असेल तर हे काम कार्यक्षमतेने होत नाही. शरीर बरे होण्याऐवजी पचनासाठी ऊर्जा वापरतं, त्यामुळे अनेकांना पूर्ण झोप घेतली असं वाटलं तरी सकाळी थकवा जाणवतो.
उशिरा खाल्ल्यावर झोप आणि स्वप्नांवर होणारा परिणाम
रात्री उशिरा खाणं झोपेच्या दर्जावर आणि स्वप्नांवरही परिणाम करतं. पचनसंस्था काम करत असल्याने अस्वस्थता, पोट फुगणे, आम्लपित्त किंवा जळजळ जाणवू शकते — विशेषतः जेवणानंतर लगेच झोपल्यास, त्यामुळे मेंदू गाढ झोपेच्या टप्प्यात जात नाही आणि मानसिक ऊर्जा मिळत नाही.
जे लोक झोपण्याच्या किमान चार ते पाच तास आधी खाणं थांबवतात, त्यांना जास्त ताजेतवाने वाटतं आणि स्वप्नं अधिक स्पष्ट दिसतात, कारण त्यांचं शरीर त्या वेळेत पूर्णतः ‘रिपेअर मोड’मध्ये जातं — हार्मोन्स संतुलित करणे, पेशी पुनर्जन्म आणि मेमरी कन्सॉलिडेशनसाठी ही अवस्था उत्तम ठरते.
मेमरी कन्सॉलिडेशन म्हणजे दिवसभर आपण जे काही शिकतो, ऐकतो, पाहतो किंवा अनुभवतो, ते सर्व मेंदूत तात्पुरत्या स्मृतीत (short-term memory) साठवलं जातं. पण, झोपेत, विशेषतः डीप स्लीप आणि REM स्लीपच्या अवस्थेत, मेंदू त्या माहितीचं वर्गीकरण करून दीर्घकालीन स्मृतीत (long-term memory) रूपांतर करतो.
का महत्त्वाचा आहे “४–५ तासांचा नियम”
झोपण्याच्या सुमारे चार ते पाच तास आधी शेवटचं जेवण घेणं शरीरासाठी आदर्श मानलं जातं. या वेळेत अन्न पचून पुढे गेलं असतं आणि शरीर “पचनक्रिया अवस्थे”मधून “दुरस्थी अवस्थे”मध्ये जाऊ शकतं.
ही सवय रक्तातील साखरेचा समतोल राखते आणि चयापयच योग्य ठेवते. संध्याकाळी लवकर खाण्यामुळे शरीर झोपेत साठवलेली ऊर्जा कार्यक्षमतेने वापरतं. दीर्घकाळात यामुळे वजन नियंत्रण, पचन सुधारणा आणि सकाळी ऊर्जा वाढते. उशिरा जेवणामुळे उर्जेचा वापर थांबतो आणि वजन वाढतं.
चांगल्या झोपेसाठी काय कराल
- लवकर जेवा : जर तुम्ही रात्री ११ वाजता झोपता तर शेवटचं जेवण ७.००–७.३० वाजेपर्यंत संपवण्याचा प्रयत्न करा.
- हलके अन्न निवडा : तळलेले, मसालेदार किंवा जड पदार्थ टाळा, हे पचायला वेळ लागतात आणि आम्लपित्त वाढवतात.
- रात्री उशिरा स्नॅक्स खाणे टाळा : झोपायच्या आधी भूक लागल्यास फळ, मूठभर सुका मेवा किंवा कोमट दूध यांसारखं हलकं काही घ्या.
- पाणी योग्य प्रमाणात : दिवसभर पुरेसं पाणी प्या, पण झोपण्याच्या अगोदर जास्त पाणी पिणं टाळा, नाहीतर वारंवार उठावं लागू शकतं.
- दिनक्रम तयार करा : जेवण आणि झोपेचं वेळापत्रक ठरवलं तर शरीराचं जैविक घड्याळ संतुलित राहतं.
झोप म्हणजे शरीराचा दुरुस्ती आणि विश्रांती घेऊन पुन्हा ऊर्जा मिळवण्याचा काळ आहे. पुढच्यावेळी मध्यरात्री स्नॅक घेण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा — खरी विश्रांती तेव्हाच मिळते, जेव्हा शरीर पचनापासून मोकळं असतं.
(डॉ. अरुण प्रसाद – सीनियर कन्सल्टंट, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि बॅरियाट्रिक सर्जरी, इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्स, दिल्ली)
