मॅडम, गुडघा वाकतच नाहीये, सरळ म्हणजे सरळ राहतो, भीती वाटते., माझा गुडघा आधीसारखा होईल ना? तीन महिन्यांपूर्वी मांडीच्या हाडाचा गुडघ्यावरील भाग फ्रॅक्चर झालेला आणि त्यासाठी शस्त्रक्रिया झालेला रुग्ण मला अगतिकपणे विचारत होता. आपण आता रोज व्यायाम सुरू करूया आणि एका यंत्राच्या साह्याने हळूहळू गुडघा वाकवायला सुरुवात करूया. यात वेदना होतील पण त्या हळूहळू कमी होतील. हे मी बोलत असतानाच पुढचा प्रश्न, मॅडम किती दिवसात गुडघा वाकेल? असं दिवसात सांगता नाही येणार, पण तुम्हाला नियमितपणे व्यायाम करावे लागतील, आणि घरीसुद्धा सांगितलेली पथ्यं पाळावी लागतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मॅडम पण मला फ्रॅक्चर मांडीच्या हाडाला झालं होतं, आता ते हाड तर जुळलं, मग माझा गुडघा का वाकत नाही? ते ही समजावून सांगते. शस्त्रक्रियेनंतर आलेल्या या अनपेक्षित त्रासामुळे हा रुग्ण त्रासून गेला होता….

हेही वाचा : Health Special : सोशल मीडियाच्या आक्रमणात आपलं आरोग्य कसं जपावं?

शस्त्रक्रियेनंतर पहिल्या महत्वाच्या दिवसांमध्ये व्यायाम सुरू न केल्याने पुढील काही महिन्यात सांधा आणि त्याच्या आजूबाजूचे स्नायू हे स्टीफ म्हणजे कडक होऊन जातात, मग मूळ फ्रॅक्चर झालेला भाग जरी व्यवस्थित जुळला तरी रुग्णाच्या हालचाली पूर्ववत होत नाहीत. हे फक्त पायाच्या सांध्यामध्ये होतं असं नाही, हाताच्या सांध्यामधे विशेषतः कोपराच्या सांध्यामध्ये हे बहुतेकवेळा दिसून येतं. याला पोस्ट ऑपरेटिव्ह स्टीफनेस असं म्हणतात.

हे कशामुळे होतं?

शस्त्रक्रियेनंतर फ्रॅक्चर झालेल्या भागाची हालचाल कधी सुरू करायची, किती प्रमाणात करायची (हे अगदी नेमक्या प्रमाणात) ठरलेलं असतं. हे ठरवताना ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट यांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो यात रुग्णाचं वय, हाडांची स्थिती, फ्रॅक्चरचा प्रकार, फ्रॅक्चर जुळवण्यासाठी वापरलेलं साधन (इंप्लांट), इन्फेकशन सारखे काही घटक यांचा समावेश असतो. याशिवाय रुग्णाशी संबंधित घटक जसं रुग्णाचं वय, वजन, हाडांच एकंदरीत आरोग्य यांचाही विचार करावा लागतो. काही वेळा रुग्णाला इतर शारीरिक किंवा मानसिक आजार असू शकतात ज्यांचा विचार ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरेपिस्टला करावा लागतो. हाताच्या, खांद्याच्या किंवा मनगटाच्या हाडांची हालचाल ही पायाच्या हाडांच्या तुलनेत लवकर सुरू करता येते.

ठराविक कालावधीनंतर रुग्णाने फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शना खाली व्यायाम करणं अपेक्षित असतं. हे व्यायाम क्रमाक्रमाने वाढत जणारे असतात. हा टप्पा अतिशय महत्वाचा असतो आणि हा टप्पा पूर्ण केल्यावरच रुग्ण स्वावलंबी होऊ शकतो आणि शस्त्रक्रिया खर्‍या अर्थाने यशस्वी होते.

काही रुग्ण या कालावधीमध्ये फिजिओथेरपी सुरू करत नाहीत, व्यायाम अजिबात करत नाहीत, अथवा चुकीच्या पद्धतीने करतात. यामुळे शस्त्रक्रियेनंतरची अतिशय सुलभ, सोपी आणि रूग्णाला स्वावलंबी बनवणारी प्रक्रिया, अतिशय गुंतागुंतीची आणि त्रासदायक होते.

हेही वाचा : हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला का दिला जातो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात….

प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर काही सांध्यांची हालचाल विशिष्ट दिवसांकरिता बंद करावी लागते, पण या दरम्यान आजूबाजूच्या सांध्याची योग्य पद्धतीने हालचाल सुरू ठेवता येते, फिजिओथेरपिस्ट याच्या योग्य पद्धती रुग्णांना शिकवतात. हे अतिशय महत्वाचं आहे अन्यथा सुरूवातीला सांगितलेल्या रुग्णाप्रमाणे आजूबाजूचे सांधे कडक होऊन त्यांची हालचाल बंद होऊ शकते. मांडीच्या हाडाच्या खालच्या टोकाला झालेल्या शस्त्रक्रियेनंतर ठराविक वेळी योग्य प्रमाणात गुडघा वाकवला नाही तर प्रत्यक्ष शस्त्रक्रियेत सहभाग नसतानाही गुडघा स्टीफ होऊ शकतो. तसच खांद्याच्या हाडाच्या खालच्या टोकाला होणारी शस्त्रक्रिया ही कोपराच्या सांध्याला स्टीफ करू शकते.

मुळात शस्त्रक्रियेनंतर होणार्‍या या गोष्टींबद्दल काही रुग्णांमध्ये जागरूकता नाही. बहुतेकवेळा शस्त्रक्रिया झाली म्हणजे आपण पूर्वीसारखं आयुष्य आपोआप जगू शकतो असा गैरसमज रुग्णांमध्ये होतो. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.

हेही वाचा : Walking Pneumonia Vs Common Cold : वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय? वाचा, लक्षणे, उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला

शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली निदान २ महिने शास्त्रीय पद्धतीने व्यायाम करणं अपेक्षित आहे अन्यथा शस्त्रक्रियेनंतरदेखील वेदना होतच राहतात. जसं,

-स्नायू कमकुवत राहणं

-सांध्याची हालचाल पूर्ववत न होणं

-सांधा एकाच स्थितीत अडून बसणं

-सांध्यावर वजन घेता न येणं

असे अनेक त्रास होतात.

अशावेळी रुग्ण आमच्याकडे येतात तेव्हा देखील त्यांना त्वरित सांधा पूर्ववत व्हावा असं वाटतं. पण हे त्वरित होणारं नाही यासाठी बराच कालावधी आणि रुग्णाचं सहकार्य लागतं. पोस्ट-ऑपरेटिव्ह स्टीफनेस टाळण्यासाठी आणि शस्त्रक्रियेचा खर्‍या अर्थाने फायदा होण्यासाठी रुग्णांनी फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम सुरू करणं आणि रुग्णालयातून सुट्टी झाल्यावरही नियमित फिजिओथेरपी उपचार घेणं आवश्यक ठरतं.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Physiotherapy treatment after fracture and surgery operation hldc css