Poop Thrice in a Day is Normal or Not: सतत आणि नियमित शौचक्रिया होणे म्हणजे आपले आरोग्य चांगल्या स्थितीत आहे आणि शरीरामध्ये सगळं ठीक चाललं आहे असं समजलं जातं. काही लोक दिवसातून अनेक वेळा शौचाला जातात, तर काही जण दोन दिवसातून एकदाच जातात. शौचाच्या योग्य वेळेबाबत आणि सुरक्षिततेबाबत ऑनलाइन खूप चर्चा होते, म्हणूनच हे समजून घेण्याचा आपण या लेखातून आज प्रयत्न करणार आहोत.

डॉ. जतिन येगुर्ला, (सल्लागार गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि अ‍ॅडव्हान्स एंडोस्कोपी तज्ज्ञ – अपोलो क्लिनिक, मणिकोंडा) यांच्याशी बोलताना indianexpress.com ला शौचास कितीवेळा जाणं योग्य आहे हे कळलं.

“काही लोक रोज शौचाला जातात, काही एक दिवसाआड, तर काही आठवड्यातून एकदा जातात. प्रत्येकाची ही सवय वेगळी असते. जे एका व्यक्तीसाठी सामान्य आहे, ते दुसऱ्यासाठी नसू शकतं,” असं डॉ. येगुर्ला म्हणाले.

दिवसातून तीन वेळा शौचास जाणे खूप जास्त आहे का? (How many times poop in a day is normal)

“जर एखादी व्यक्ती दिवसातून तीन वेळा शौचाला जात असेल आणि ही सवय नियमित असेल, तसेच विष्ठा नीट आणि शौचाचं रुटिन नीट असेल, तर ते अगदी सामान्य आहे. पण, जर अचानक अशा गोष्टी होऊ लागल्या आणि त्यात त्रास, दुखणं किंवा फार कडक किंवा खूप मऊ विष्ठा येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

नियमित आणि निरोगी शौचक्रिया होण्यासाठी डॉ. येगुर्ला यांनी हे पाच जीवनशैलीतले छोटे बदल करण्याचा सल्ला दिला आहे:

आहार

“आपल्या आहारात भरपूर फायबर असावे, ज्यामध्ये फळं, भाजीपाला, डाळी आणि संपूर्ण धान्यांचा समावेश असावा,” असं डॉ. येगुर्ला म्हणाले. त्यांनी असंही सांगितलं की, दिवसभरात भरपूर पाणी प्यावं, जेणेकरून विष्ठा मऊ राहील आणि शौचास जाणं सोपं होईल.

“प्रोबायोटिक्सचाही विचार करता येईल – जसं की दही, सॉरक्रॉट (बारीक कापलेली कच्ची कोबी) आणि केफिर, यामध्ये ते मुबलक प्रमाणात असतात,” असंही त्यांनी सांगितलं.

शारीरिक क्रिया (व्यायाम)

नियमित शारीरिक हालचाल केल्याने पचनसंस्था नीट काम करते आणि शौच नियमितपणे होण्याची शक्यता वाढते.

रूटीन

“दररोज एकाच वेळी शौचाला जाण्याचा प्रयत्न करा, यामुळे शरीराला नियमितपणे शौच करण्याची सवय लागते,” असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

काही अन्नपदार्थ टाळा

वेगवेगळ्या अन्नपदार्थांवर प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतं असं त्यांनी सांगितलं. काही अन्नपदार्थांमुळे मळमळ, बद्धकोष्ठता किंवा अतिसार (जुलाब) होऊ शकतात, म्हणून योग्य ते बदल करणे गरजेचं आहे.

तणाव नियंत्रणात ठेवा

“खूप तणाव किंवा चिंता असेल तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवरही होतो. ध्यान (मेडिटेशन) आणि योगाच्या मदतीने मन शांत ठेवायला शिकल्यास ही लक्षणं कमी करता येतात,” असं डॉ. येगुर्ला यांनी सांगितलं.

“शौचाची इच्छा झाली असताना ती थांबवू नये, लगेच शौचाला जावं, कारण उशीर केल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते,” असंही त्यांनी नमूद केलं.

कधी काळजी घ्यायला हवी?

दिल्लीच्या CK बिरला हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएंटरॉलॉजी विभागातील सल्लागार डॉ. विकास जिंदल यांनी सांगितलं की, जर तुम्ही जीवनशैलीत बदल केल्यावरही शौच अनियमित होत असेल, तर ते काही अंतर्निहित समस्यांचा संकेत असू शकतो. यामध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS), हायपोथायरॉईडिझम किंवा आहारातील असंतुलन असू शकते.

“जर शौचासोबत तीव्र वेदना, विष्ठेत रक्त दिसणे किंवा अनपेक्षित वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण हे गंभीर आजारांचे लक्षण असू शकते,” असा त्यांनी सल्ला दिला.

डॉ. राहुल दुब्बाका (सल्लागार, गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स, हैदराबाद) यांनी पुढे सांगितलं की, आजकाल बाजारात उपलब्ध असलेले लॅक्सेटिव्हज, बुल्क-फॉर्मिंग एजंट्स आणि स्टिम्युलंट्स यांचा वापर या समस्येवर सामान्य उपाय म्हणून केला जातो. पण, ही लक्षणं कमी करण्यात मदत करतात, तरीही त्यांचा वापर सावधगिरीने आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करायला हवा.