करोना साथीच्या काळात मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांमध्येही स्क्रीनकडे पाहण्याच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आजच्या डिजिटल युगात अगदी अभ्यासापासून ते ऑफिसच्या कामानिमित्त प्रत्येकाला मोबाइलची गरज पडते. त्यामुळे स्क्रीनकडे दीर्घकाळ टक लावून पाहणे आता अगदीच सामान्य गोष्ट झाली आहे. पण, यामुळे डोळे कोरडे पडण्याच्या किंवा इतर अनेक समस्यांना सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. या समस्येलाच ‘ड्राय आय सिंड्रोम’, असं म्हणतात.

स्क्रीन, एअर कंडिशनिंगच्या दीर्घकाळ संपर्कामुळे अनेक व्यक्तींना अस्वस्थता, जळजळ आणि दृष्टिदोषाचा त्रास होऊ लागतो, तर इन्स्टाग्रामवर कंटेन्ट क्रिएटर ॲलन मँडेल याने या समस्येवर एक उपाय सुचविला आहे. हा उपाय म्हणजे तुम्हाला फक्त ‘एका मिनिटासाठी तुमचे डोळे मिचकवायचे आहेत.’ जेव्हा आपण स्क्रीनकडे बराच वेळ एकटक पाहतो, तेव्हा डोळे कमी लुकलुकतात; ज्यामुळे डोळे कोरडे होतात, डोळ्यांची जळजळ होते, असे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा…तुमच्या ‘या’ सवयीमुळे मानेवर येऊ शकतो २७ किलोचा भार; स्क्रीन बघण्याची योग्य पद्धत कोणती? समजून घ्या तज्ज्ञांचे गणित

व्हिडीओ नक्की बघा…

ॲलन मँडेल पुढे म्हणतात की, डोळ्यांची उघडझाप (मिचकावणे) या व्यायामाचा काळजीपूर्वक सराव केल्याने मेबोमियन ग्रंथी उघडू शकतात. पापण्यांच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूस असलेल्या लहान तेल-उत्पादक ग्रंथी आपल्या डोळ्यांसाठी आवश्यक आहेत. डोळे मिचकावण्याचा हा सोपा उपाय डोळ्यांच्या पृष्ठभागावर अश्रू समान रीतीने पसरवण्यास मदत करतो आणि त्यामुळे कोरडेपणा, जळजळ, अस्वस्थता टाळता येते.

कसा करावा हा व्यायाम ?

तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या व्यायामाचा समावेश करून पाहा. काही सेकंदांसाठी हळुवारपणे डोळे बंद करा. नंतर डोळे उघडा आणि फक्त डोळे मिचकावणे सुरू करा. तुमच्या डोळ्यात थोडे पाणी येईल आणि त्यामुळे दिवस चांगला होण्यास मदत होईल; असे कंटेन्ट क्रिएटरचे म्हणणे आहे.

कोरड्या डोळ्यांसाठी डोळे मिचकावण्याची पद्धत उपयोगी आहे का?

कंटेन्ट क्रिएटरने सांगितलेला उपाय वा व्यायामाबद्दल द इंडियन एक्स्प्रेसने, अथ्रेया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार,नेत्रविज्ञान विभागाच्या नव्या सी. मंडेल यांच्याशी संवाद साधला. डॉक्टरसुद्धा या उपायाशी सहमत आहेत. त्या म्हणाल्या की, डोळ्याच्या पृष्ठभागावर अश्रू समान रीतीने पसरवून डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी डोळे मिचकावणे ही क्रिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, ज्यामुळे चिडचिड दूर होते. डोळे मिचकावल्याने अश्रुग्रंथींमधून अश्रुस्राव सुलभ होतो, ज्यामध्ये ओलावा आणि आवश्यक प्रथिने असतात; जी डोळ्यांच्या पृष्ठभागाचे संरक्षण करतात आणि कोरडेपणाचा सामना करतात. ‘व्हॉलंटरी ब्लिंकिंग एक्सरसाइज’ म्हणून ओळखला जाणारा हा एक विशिष्ट पॅटर्न आहे; ज्यात जाणूनबुजून पूर्ण डोळे मिचकावणे फायदेशीर ठरू शकते. डिजिटल उपकरणे वापरताना अश्रू बाष्पीभवनास प्रोत्साहन देण्यासाठी हा सराव विशेषतः महत्त्वाचा आहे.

‘व्हॉलंटरी ब्लिंकिंग एक्सरसाइज’ व्यायामावर पूर्णपणे अवलंबून राहण्याचे धोके आणि तोटे –

डोळे मिचकावण्याचा व्यायाम फायदेशीर असला तरीही डॉक्टर ठामपणे सांगतात की, ज्यांच्या डोळ्यांची स्थिती गंभीर आहे किंवा ज्यांचे डोळे दीर्घकाळ कोरडे राहतात अशा व्यक्तींनी या व्यायामावर पूर्णपणे अवलंबून राहणे पुरेसे ठरणार नाही. तसेच अशा परिस्थितीमध्ये अनेकदा कृत्रिम अश्रू, प्रिस्क्राइब्ज्ड आय ड्रॉप्स किंवा इतर काही गोष्टी आवश्यक असू शकतात. तसेच ही बाब लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे की, गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करून, फक्त डोळे मिचकावण्याच्या व्यायामावर जास्त काळ अवलंबून राहणे अपुरा उपचार ठरू शकतो. संभाव्यत: ही स्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे या समस्येवर डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घेणेही फायदेशीर ठरू शकते.