Malasana Pose Benefits : चांगल्या, निरोगी आरोग्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली होणं खूप गरजेची असते. पण, सध्याच्या वेगवान धावपळीच्या जीवनशैलीत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी योग्य वेळचं मिळत नाही, अशाने विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. पण, आयुर्वेदात आणि योगाभ्यासात शरीर आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी काही योगासनं सांगितली आहेत, यातीलच एक म्हणजे मलासन..

मलासन हे सोपं आसन आहे, ज्यात व्यक्तीला गुडघ्यावर वाकून बसावे लागते; यानंतर हात जोडून बॅलेन्स करावा लागतो. अशा आसनात बसून कोमट पाणी पिण्याचे फायदे योग प्रशिक्षक तन्नू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहेत. ज्यामध्ये त्यांनी महिन्याभरात रोज सकाळी मलासनात बसून कोमट पाणी पिण्याचे शरीरात नेमके काय बदल होतात हे सांगितले आहे. चला तर मग याचे शरीरासाठी नेमके त्यांना काय फायदे दिसले जाणून घेऊ…

योगा प्रशिक्षक तन्नू यांनी सांगितले की, महिनाभर रोज सकाळी मलासनात बसून कोमट पाणी प्यायल्याने शरीरात खूप बदल जाणवू लागतात.

१) आतड्यांचे आरोग्य सुधारले आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी झाला.
२) मासिक पाळीदरम्यान जाणवणाऱ्या वेदना कमी झाल्या.
३) उठल्यानंतर उलटी किंवा मळमळ जाणवली नाही.
४) कंबरेची योग्य हालचाल करता येऊ लागली.
५) दिवसभर खूप फ्रेश, सक्रिय वाटले.
६) डोकं आणि मनाला शांत मिळाली.
७) एकाग्रता, स्थिरता वाढली.

यावर अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने फिटनेसतज्ज्ञ आणि सल्लागार आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, जर एखाद्या व्यक्तीने दिवसाची सुरुवात मलासनात एक ग्लास कोमट पाणी पिऊन केली तर त्याचा काय परिणाम जाणवतो?

मलासनाला एक वाइट स्क्वॅट, सिटिंग डाउन असे म्हणतात. हे एक हठयोगाचे आसान आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते, कंबरदुखीचा त्रास कमी होतो आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढता येतात. या योगासनाचे अनेक फायदे आहेत. सकाळी उठल्यानंतर रोज हे आसन करत कोमट पाणी प्यायल्यास पचन सुधारते, पोटफुगी कमी होते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते, असे गोयल म्हणाल्या.

आहारतज्ज्ञ गोयल यांनी सात दिवसांत याचे काय परिणाम जाणवतात हे सांगितले आहे.

प्रत्येक दिवशी येणारा अनुभव – नेमका कसा?

दिवस १-२: सुरुवातीचा काळ

१) जर तुम्ही पहिल्यांदाच मलासन करत असाल तर तुम्हाला तुमच्या कंबर, गुडघे आणि पाठीच्या खालच्या भागात थोडासा कडकपणा जाणवू शकतो.

२) कोमट पाणी पचनसंस्था सक्रिय करण्यास मदत करते, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते.

३) आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस बाहेर पडतो किंवा हलके पोट फुगण्याची समस्या जाणवू शकते.

दिवस ३-४: पचन क्रिया सुधारते आणि लवचिकता

१) मलासनात नियमित बसल्याने आतड्यांची हालचाल सुधारते, ज्यामुळे मलविसर्जन सोपे होते.
२) जेवणानंतर तुम्हाला पोटफुगी कमी झाल्याचे आणि पचनक्रिया सुधारल्याचे दिसून येईल.
३) कंबर, मांडी आणि पाठीचा खालचा भाग कमी कडक वाटू लागतो.

दिवस ५-६: डिटॉक्स आणि ऊर्जा पातळी वाढते

१) कोमट पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते, तर मलासन पचनासंबंधित अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत करते.

२) सकाळी तुम्हाला अधिक ऊर्जावान आणि कमी आळस जाणवू शकतो.

३) आतड्यांचे आरोग्य सुधारल्यामुळे त्वचेचे आरोग्यही सुधारते.

दिवस ७: इतर फायदे

१) रोज पोट नीट आणि सहज साफ होते.
२) कोअर आणि पेल्विक फ्लोअर स्नायू मजबूत होतात.
३) शरीरास जाणवणारी सूज कमी होते. चयापचय प्रक्रिया चांगली होते आणि पाठीचा कडकपणा कमी होतो.
४) पोटफुगीची समस्या जाणवत नाही, यामुळे आतड्यांमध्ये अडकलेली हवा बाहेर काढण्यास मदत होते.

कोमट पाणी पिण्याचे फायदे

१) विषारी पदार्थ बाहेर टाकते : मूत्रपिंड आणि यकृतातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
२) पोटाच्या कार्यास मदत करते : अॅसिड रिफ्लक्स रोखता येते आणि पचनक्रिया सुरळीत करते.
३) चयापचय क्रिया वाढते : कॅलरी बर्निंग आणि हायड्रेशन वाढवते.

पण ‘हे’ फॉलो कसे करायचे?

१) रोज सकाळी उठून एक ग्लास कोमट पाणी प्या. (साधे किंवा लिंबू घालून).
२) मलासनात बसत जा (सिटिंग डाउन स्क्वॉट) आणि ३० सेकंद ते १ मिनिट या स्थितीत बसा.
३) पाठीचा कणा सरळ आणि पायाच्या टाचा स्थिर ठेवा, यानंतर दीर्घ श्वास घ्या.
४) चांगल्या परिणामांसाठी असे दिवसातून २ ते ३ दिवस करा.

मलासन करणं कोणी टाळावे?

१) जर तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्सचा त्रास असेल त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२) जर तुम्हाला कोमट पाणी प्यायल्यानंतर चक्कर येत असेल तर पाणी पटकन गिळण्याऐवजी एक एक घोट घेत पिण्याचा प्रयत्न करा

जर आठवडाभर रोज सकाळी कोमट पाणी पिऊन मलासन केल्यास पचनक्रिया लक्षणीयरीत्या सुधारते, पोटफुगी कमी होते आणि ऊर्जेची पातळी वाढते. कालांतराने यामुळे पेल्विक फ्लोअरची ताकद वाढते, चयापचय आणि आतड्यांचे आरोग्यदेखील सुधारते. जर तुम्हाला याचे फायदे फायदेशीर वाटत असतील तर तुम्ही दररोज सकाळी हे करू शकता, असेही गोयल म्हणाले.