Best TimeTo Eat Curd : दुपारच्या कडक उन्हात थंडगार दही खायला कोणाला आवडणार नाही? ताजेतवाने, चविष्ट आणि शरीराला थंडावा देणारे दही उन्हाळ्यात भारतीय आहारातील एक लोकप्रिय पदार्थ आहे. आरोग्यतज्ज्ञ देखी आहारात दह्याचा समावेश करण्याची शिफारस करतात. परंतु, दही योग्यप्रकारे आणि योग्य वेळी खाणे फार महत्त्वाचे असते, अन्यथा त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो..

आयुर्वेदानुसार दही दिसते तितके थंड नसते; ते शरीरात गरमदेखील पडू शकते, विशेषत: पचनानंतर. तुम्हाला कदाचित हे स्पष्ट समजणार नाही, पण दही खाताना थंड वाटते. पण, आयुर्वेदात दही फक्त तापमान आणि चव यावरून थंड आहे असे मानले जात नाही, तर तुम्ही कोणत्या पदार्थाबरोबर ते खाता आणि कोणत्या वेळी खाता यावर ते थंड आहे की गरम ठरते. तसेच पोटात गेलेल्या पदार्थांवर त्याचा कसा परिणाम होतो यादेखील गोष्टी लक्षात घेतल्या जातात.

जीवा आयुर्वेदाचे संस्थापक आणि संचालक डॉ. प्रताप चौहान म्हणाले की, दही उष्णता निर्माण करते आणि पित्त (अग्नि तत्व) आणि कफ वाढवते (ज्यामुळे जडपणा आणि सर्दी होऊ शकते). म्हणून चुकीच्या वेळी किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास आम्लता, त्वचा फुटणे, पोटफुगी किंवा पचनक्रिया मंदावणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना कन्सल्टंट डायटिशियन आणि सर्टिफाइड डायबिटिज एज्युकेटर कनिका मल्होत्रा यांनीही काही गोष्टींवर सहमती दर्शवत म्हटले की, दही नैसर्गिकरित्या शरीरासाठी थंड आहे असा फक्त एक समज आहे. पोषणाच्या दृष्टीने दह्यामध्ये जास्त पाणी आणि प्रोबायोटिक्स आहे, जे शरीरास ताजेतवाने आणि हायड्रेटिंग ठेवते. त्यामुळे ते थंड आहे असे मानले जाते. दही शरीराचे तापमान थेट कमी करते. यावर कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

दही खाण्याची वेळ निश्चित केल्याने शरीरात थंडावा वाढत नसला तरी त्यामुळे पचनक्रियेस फायदा होतो. दह्याच्या हायड्रेटिंग गुणधर्मांमुळे आणि पचनसंस्थेवर त्याचा होणारा परिणाम, यामुळे शरीरात थंडावा जाणवतो.

पण काळजी करू नका, तुम्हाला दही खाणे पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही. ते योग्य वेळी योग्यरित्या खाल्ल्यास तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

उन्हाळ्यात दही खाण्याची योग्य पद्धत कोणती?

दही योग्यरित्या खाल्ल्यास ते शरीरासाठी हानिकारक नसते. यामुळे पचनक्रिया आणि आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते. परंतु वेळ, संयोजन आणि प्रमाण महत्त्वाचे आहे, विशेषतः उन्हाळ्यात याची अधिक गरज असते, असे डॉ. चौहान म्हणाले.

दही खाण्याची योग्य वेळ कोणती? (When is the Best Time To Eat Curd?)

जेवण्याची सर्वोत्तम वेळ : दुपारचे जेवण, जेव्हा तुमची पचनशक्ती चांगली असते, त्यावेळी दही खाणे अधिक फायदेशीर असते.

रात्रीच्या वेळी दही खाणे टाळा : रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने सर्दी, जडपणा किंवा झोपेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

कधीही नुसते दही खाऊ नका : पचनक्रिया सुधारण्यासाठी दह्यात नेहमी चिमूटभर काळी मिरी पावडर आणि भाजलेले जिरे मिसळा किंवा मसाला ताक बनवून प्या.

या’ पदार्थांसह दही खाणं टाळा : मासे, कांदे किंवा जड जेवण या गोष्टींमुळे पचनक्रिया मंदावते. तसेच या पदार्थ्यांसह दही खाल्ल्यास शरीरात विषारी पदार्थ तयार होऊ शकतो.

कोणी काळजी घ्यावी?

दही प्रत्येकाच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकत नाही, विशेषतः उन्हाळ्यात. जर तुम्हाला वारंवार सर्दी, कफ किंवा वारंवार अॅसिडिटी, छातीत जळजळ होणे यांसारख्या समस्या जाणवत असतील तर दही खाणे टाळण्याचा प्रयत्न करा. ज्यांना मुरुम, पुरळ किंवा जळजळ यांसारख्या त्वचेच्या समस्या आहेत, तसेच खोकला, सर्दी किंवा सायनस यांसारख्या श्वसनाच्या समस्या आहेत, त्यांनीही दही खाणे टाळा.

डॉ. चौहान यांनी सल्ला दिला की, उन्हाळ्यात नुसते दही खाण्यापेक्षा त्याचे ताक बनवा आणि त्यात थोडेसे सैंधव मीठ घाला, जे पचण्यास खूपच हलके आणि शरीरास जास्त थंडावा देते. यामुळे शरीरात जडपणा जाणवत नाही किंवा उष्णता वाढत नाही. आयुर्वेदात, उन्हाळ्यात रोज दही खाण्याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत.