गर्भधारणेच्या निदानासाठी स्त्रिया गर्भधारणा चाचणी करतात हे आपल्याला माहीत आहे; पण पुरुषांनी ही चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली, असे कधी ऐकले आहे का? पुरुषांमध्ये ही चाचणी सहसा निगेटिव्ह येते; पण अत्यंत दुर्मीळ परिस्थितीत पॉझिटिव्ह निकाल आल्यास तो गंभीर आरोग्य समस्येचा इशारा असू शकतो. तुम्हाला विश्वास बसत नसेल; पण असे घडू शकते. ही गोष्ट दुर्मीळ असली तरी ती चिंताजनक आहे. याबाबत पुण्यातील अंकुरा महिला आणि बाल रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ व वंध्यत्व विशेषज्ञ, सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “जर एखाद्या पुरुषाने गर्भधारणा चाचणी घेतली, तर ती जवळजवळ नेहमीच नकारात्मक दिसून येईल. कारण- या चाचण्या गर्भधारणेदरम्यान तयार होणाऱ्या hCG (human chorionic gonadotropin) हॉर्मोन्सचा शोध घेण्यासाठी तयार केल्या आहेत. पण, अत्यंत दुर्मीळ प्रकरणांमध्ये, पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह येऊ शकते. याचा अर्थ असा नाही की, त्या पुरुषाला गर्भधारणा झाली आहे; परंतु वैद्यकीयदृष्ट्या ती स्थिती धोकादायक ठरू शकते.
जर गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आली तर काय?
“काही प्रकारचे कर्करोग, विशेषतः टेस्टिक्युलर कर्करोग (testicular cancer) hCG नावाच्या हार्मोनचे उत्पादन करू शकतात. म्हणूनच पुरुषांमध्ये गर्भधारणा चाचणी सकारात्मक ठरणे अनेकदा गंभीर आरोग्य समस्येचा इशारा मानला जातो. त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये किंवा ते हलक्यात घेऊ नये,” असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, जर पुरुषांची गर्भधारणेची चाचणी पॉझिटिव्ह आल्यास लगेच तपासणी करून टेस्टिक्युलर ट्यूमर किंवा इतर दुर्मीळ आजार आहेत का हे पाहणं आवश्यक असतं. त्यामुळे ही चाचणी पुरुषांसाठी नसली तरी पॉझिटिव्ह निकाल आल्यास तो काही महत्त्वाच्या गोष्टींकडे निर्देश करू शकतो, ज्यासाठी तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज असते.
आजही पुरुषांमधील प्रजनन क्षमतेबद्दल फारशा चर्चा होत नाहीत आणि तो लाजिरवाणा विषय मानला जातो आणि दाम्पत्यांना मूल होण्यात येणाऱ्या अडचणींचं मूळ कारण म्हणून त्याकडे पाहिलं जात नाही. त्यामुळे मानसिक ताणतणाव निर्माण होऊ शकतो, विशेषतः भारतीय समाजात जिथे अपत्यप्राप्तीला खूप महत्त्व दिलं जातं. शिक्षणाच्या अभावामुळे पुरुषांकडे त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत योग्य माहिती व समज नसते. बहुतेक पुरुष गरज पडल्याशिवाय युरोलॉजिस्ट किंवा वंध्यत्व तज्ज्ञांकडे जात नाहीत. त्यामुळे पुरुषांनी पुरुष वंध्यत्वाविषयी माहिती ठेवणं आणि समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळेत निदान व उपचार होऊ शकतील,” असं इंदिरा आयव्हीएफचे सीईओ व सहसंस्थापक डॉ. क्षितिज मुर्डिया यांनी दी इंडिनय एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.
डॉ. मुर्डिया यांच्या मते, पुरुषांच्या वंध्यत्वाशी संबंधित समस्या वेळीच हाताळल्या गेल्या, तर पिढ्यान् पिढ्या महिलांवर वंध्यत्वामुळे आलेला कलंक कमी होईल.
पुरुषांच्या प्रजनन आरोग्याचं संरक्षण करण्यासाठी काही जीवनशैलीचे उपाय महत्त्वाचे ठरू शकतात. त्यांनी पुढील सूचना केल्या आहेत:
१. डॉक्टरांची नियमित भेट द्या (Visit your doctor regularly:
आपलं प्रजनन आरोग्य चांगलं ठेवायचं असेल, तर डॉक्टरांकडून वेळेवर तपासणी करून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्याची नोंद ठेवली जाऊ शकते आणि समस्या गंभीर होण्याआधी त्यावर उपाय करता येतो.
२. धूम्रपान, तंबाखू सोडा आणि मद्यपान कमी करा (Quit smoking, tobacco and limit alcohol)
धूम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे. पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शन होण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. धूम्रपान सोडलं, तर हा धोका कमी होतो. तसेच अति मद्यपान प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम करतं.
३. स्वच्छतेची सवय लावा (Practise good hygiene)
ही अगदी मूलभूत सवय आहे. जननेंद्रियांची नियमित स्वच्छता ठेवल्याने जंतूंचा संचय होऊन होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो.
४. जीवनशैलीशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवा (Manage lifestyle disorders)
लठ्ठपणामुळे वंध्यत्वावर अनेक प्रकारे परिणाम होतो. योग्य आहार, पोषण आणि नियमित शारीरिक व्यायामाने प्रजनन आरोग्य सुधारता येतं. दररोज किमान १५-२० मिनिटे व्यायाम करावा आणि शक्य तितका ताण कमी ठेवावा.
५. संसर्गापासून बचाव करा (Prevent infections)
क्लॅमिडिया आणि गोनोरिया (as chlamydia and gonorrhea) यांसारखे लैंगिक संसर्गजन्य आजार (STIs) पुरुषांच्या वंध्यत्वाचं कारण ठरू शकतात. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लैंगिक जोडीदारांची संख्या मर्यादित ठेवावी, सुरक्षित संबंध ठेवावेत आणि वेळोवेळी STI चाचणी करून घ्यावी.
“प्रजनन क्षमतेशी संबंधित अडचणी पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही ताणतणावपूर्ण ठरतात. वंध्यत्वाशी संबंधित जोखीम आणि जीवनशैली घटकांबद्दल अधिक जागरूकता निर्माण झाल्यास पुरुष आपलं प्रजनन आरोग्य आणि एकूणच आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक पावलं उचलू शकतात. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल माहिती उपलब्ध करून दिल्यास या समस्या समोर येऊ शकतात आणि जागरूकता वाढेल, ज्यामुळे पुरुषांना स्वत:च्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम बनवता येईल,” असं डॉ. मुर्डिया सांगतात.