ध्यान करण्यासाठी कित्येक तास वेळ घालवण्याची आवश्यकता नाही. रोज फक्त पाच मिनिटे ध्यान केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. ही साधी सोपी सवय तुमचा ताण कमी करण्यास, लक्ष केंद्रित करण्यास आणि आरोग्य सुधारण्यासाठी मदत करू शकते.
नियमित ध्यानाचा परिणाम खोलवर होतो, अगदी पाच मिनिटांसाठी केले तरी. पण, ते नेमके कसे कार्य करते आणि जर तुम्ही दररोज पाच मिनिटे ध्यान केले तर तुम्हाला कोणते फायदे मिळतील?
याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना हिमालयन आयंगार योगा सेंटरचे संस्थापक आणि प्रमुख प्रशिक्षक असलेले सार्थ अरोरा सांगतात की, “ध्यान ही प्राचीन परंपरेत रूजलेली एक कालातीत (काळाचे बंधन नाही) आध्यात्मिक पद्धत आहे, तरीही आधुनिक विज्ञानाने त्याचे फायदे अधिकाधिक प्रमाणित केले आहेत. दररोज फक्त पाच मिनिटे ध्यान केल्याने तुमचे मन, शरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन आणि सुसंवाद साधता येतो, तुमच्या अंतर्मनाशी एक खोल संबंध निर्माण होतो आणि तुमच्या शारीरिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.”
अल्पकालीन आणि दीर्घकालीन फायदे
अरोरा सांगतात, “ध्यान केल्याने मिळणाऱ्या अल्पकालीन फायद्यांमध्ये तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळते, वर्तमान काळात घडणाऱ्या क्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते, बाह्य गोंधळ शांत करून आंतरिक शांती मिळते.
ध्यान केल्याने मिळणाऱ्या अल्पकालीन फायद्यांमध्ये तुमची जागरूकता वाढते, सजगता वाढते आणि तुमच्या ध्येयाबरोबर एक मजबूत संबंध निर्माण होतो. “भावनिक पातळीवर, ध्यान अहंकाराला शांत करून संतुलन साधते, व्यक्तींना आव्हानांना तोंड देण्यास सक्षम करते, भावनिक स्थिरता आणि लवचिकता वाढवते,” असे अरोरा सांगतात.
कमी वेळेतील ध्यान सत्रांमध्ये होणारे महत्त्वाचे शारीरिक बदल
अरोरा यांच्या मते, शरीरात होणारे संभाव्य बदल येथे आहेत:
ब्रेनवेव्ह आणि चेतना (Brainwaves and Consciousness):
ध्यान मेंदूला सतर्कतेशी संबंधित सक्रिय बीटा लहरींपासून (beta waves ) शांत करणाऱ्या अल्फा लहरींकडे वळवते, ज्यामुळे विश्रांती वाढते. ध्यान मेंदूला थीटा लहरींच्या स्थितीत आणू शकते, यामुळे मन खूप आरामशीर स्थितीत असते, तरीही चांगले ध्यान करता येते आणि नवीन सर्जनशील कल्पना सुचतात. मेंदूच्या स्थितीत होणारे हे बदल (बीटा ते अल्फा/थीटा लहरींमध्ये) विश्रांती आणि जागरूकतेची सुसंवादी स्थिती निर्माण होते.
पॅरासिम्पेथेटिक अॅक्टिव्हेशन (Parasympathetic Activation):
ध्यान पॅरासिम्पेथेटिक मज्जासंस्था सक्रिय करते, ज्याला बहुतेकदा ‘विश्रांती आणि पचन’ प्रणाली म्हणतात. यामुळे हृदयाची गती कमी होते, श्वासोच्छवास मंदावतो आणि स्नायूंना आराम मिळतो.
न्यूरोप्लास्टिकिटी (Neuroplasticity) :
कालांतराने, ध्यानामुळे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (cortex) जाड होते, जे निर्णय घेण्यास आणि स्व-नियमन करण्यास जबाबदार असते, तर मेंदूची भीती आणि ताण केंद्र असलेल्या अमिग्डालाला (amygdala) आकुंचन पावते.
हार्मोनल संतुलन (Hormonal balance):
ध्यान केल्याने कॉर्टिसोल (तणाव हॉर्मोन्स) कमी होते आणि सेरोटोनिन आणि डोपामाइन (आनंदी असल्याची भावना निर्माण करणारे हॉर्मोन्स) वाढते, ज्यामुळे मूड सुधारतो.
नव्याने ध्यान करणार्यांसाठी दररोज पाच मिनिटांच्या ध्यानाचे फायदे जास्तीत जास्त वाढवण्यासाठी सोपा उपाय
अरोरा नमूद करतात, “सुरुवातीला आरामात बसा, डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वासाची ऊर्जा आणि प्रत्येक श्वास सोडताना तणावातून मुक्तता अनुभवा. पुढे, ‘ओम’ किंवा ‘शांती’सारखे शांत शब्द पुन्हा पुन्हा उच्चारून ध्यान करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे कंपन संतुलन आणि स्पष्टता आणेल. अशी कल्पना करा की, प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या शरीरात सोनेरी प्रकाश प्रवेश करत आहे, जो तुम्हाला उबदारपणा आणि ऊर्जा देत आहे. शेवटी तुम्ही ज्या गोष्टींसाठी कृतज्ञ आहात त्यावर काही मिनिटे विचार करा, ज्यामुळे तुमचे भावनिक कंपन वाढू शकते आणि सकारात्मकता निर्माण होऊ शकते.”
(टीप- वरील लेख प्राप्त माहिती आणि तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे.)