Benefits Of Cutting Down Alcohol : मद्यपान करणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे याबद्दल आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तरीही आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत मद्यपान करणे म्हणजे एक कूल (Cool) सवय मानली जाते. सध्याची तरुण मंडळी तर वीकेंड म्हणजेच अगदी शनिवारी-रविवारी, तर कधी मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीला, तर कधी हळदी समारंभात उत्साहाने मद्यपानाची सोय सगळ्यांसाठी करतात. पण, ही सवय सोडून देणे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते याचबद्दल आपण आज या बातमीतून जाणून घेऊयात…

अभिनेता अजय देवगणने अलीकडेच एका मुलाखतीत त्याच्या मद्यपान करण्याच्या सवयीबद्दल सांगितले आहे. अभिनेता सुरुवातीला भरपूर मद्यपान करायचा. तो अशा टप्प्यावर पोहोचला होता, जिथे तो लोकांना जाऊन सांगायचा, जे अजिबात मद्यपान करीत नाहीत; त्यांनी दारू कधीही पिऊ नये. जे लोक मर्यादित प्रमाणात मद्यपान करतात, त्यांच्यासाठी ही सवय ठीक आहे. पण, मग ही सवय सोडविण्यासाठी अभिनेता एका वेलनेस स्पामध्ये गेला. त्यामुळे अभिनेत्याची आता दारू पिण्याची सवय पूर्वीपेक्षा काही प्रमाणात कमी झाली आहे आणि तो फक्त ३० मिलिलिटर किंवा एक ते दोन ग्लास इतक्या प्रमाणातच मद्यपान करतो. तो आता फक्त दारू पिण्याचा आनंद घेतो. अभिनेता इतक्या मर्यादेत राहून दारू पितो की, त्याने दारूचे सेवन केले आहे, असेही वाटत नाही.

एक ते दोन ग्लासांपर्यंत मद्यपान करणे योग्य ठरते का?

मुंबईच्या परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मंजुषा अग्रवाल म्हणाल्या की, तुम्ही मद्यपान करणं पूर्णपणे सोडून दिलं पाहिजे. त्यामुळे तुमचं आरोग्य आणि जीवनशैली सुधारते. तुमचं शरीर बरं होऊ लागतं. मन अधिक शांत आणि स्पष्ट राहते. म्हणजे एकूणच तुमचं आरोग्य सुधारू लागतं. त्याचबरोबर यकृत (लिव्हर)देखील पुनरुज्जीवित होऊ लागतं किंवा लिव्हर स्वतःला पुन्हा तयार करतं. त्यामुळे फॅटी लिव्हर, सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. त्याचबरोबर रक्तदाब व कोलेस्ट्रॉलची पातळी स्थिर झाल्यामुळे हृदयाचं आरोग्यदेखील सुधारतं. त्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांच्या मते, मेंदूचं कार्य अधिक तीक्ष्ण होतं आणि भावनिक स्थिरता आणखीन वाढते. बऱ्याच लोकांमध्ये तर झोपेची गुणवत्ता सुधारते आणि शरीरातील ऊर्जादेखील वाढते. कारण- अल्कोहोलमुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. त्याशिवाय तुम्हाला अधिक आराम आणि सक्रिय वाटण्यास मदत होते.

काही लोकांना दारू सोडताना सुरुवातीला त्रासदायक लक्षणे (विथड्रॉवल सिम्प्टम्स) जाणवू शकतात. त्यामुळे दारू सोडताना डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते. पण, विशेषतः यकृताच्या समस्या, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा व्यसनाचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांना, दारू सोडल्यानं खूप फायदा होतो, असे डॉ. अग्रवाल म्हणाल्या आहेत.