The Real Difference Between Red And Yellow Bananas : आजवर आपण केळी खाण्याचे अनेक फायदे ऐकले असतील. पोटॅशियमचा समृद्ध स्रोत असणाऱ्या केळ्यांमध्ये अनेक गुणधर्म दडलेले आहेत. पण तुम्हाला हे माहीत आहे का, लाल केळीसुद्धा तुमच्या शरीरासाठी तितकीच किंवा जास्त फायदेशीर ठरतात. लाल केळी मुसा अकुमिनाटा डक्का केळी (Musa acuminata Dacca banana) किंवा क्यूबन केळी (Cuban banana), कोलोराडो केळी (Colorado banana) आदी नावांनी ओळखली जातात. पण, पिवळ्या केळ्यांपेक्षा लाल केळी चांगली असतात का याबद्दल आपण जाणून घेऊयात…

लाल केळी ही जेनेटिकली मॉडिफाइड (जनुकीय बदल) नसून नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या केळ्यांचा एक प्रकार आहे; असे डेली डायटच्या पोषणतज्ज्ञ व सीईओ एकता टंडन म्हणाल्या आहेत. लाल केळी चवीला रास्पबेरी फळासारखी गोड असतात. लाल केळीची झाडे रोगप्रतिकार असतात. त्यामुळे ती लवकर खराब होत नाहीत. केळीची झाडे लवकर वाढतात आणि त्यांना छोटी; पण भरपूर केळी लागतात.

लाल केळ्याचे अयोग्यदायी फायदे

हैदराबादच्या एलबी नगर येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर बिराली श्वेता यांच्या मते…

ऊर्जा वाढवते – पिवळ्या केळ्यांप्रमाणे लाल केळ्यांमध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे तुम्हाला जलद ऊर्जा मिळते.

हृदय निरोगी राहते – लाल केळ्याचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. कोलेस्ट्रॉल कमी होऊन, रक्तदाब आणि हृदयाचे आरोग्य नियंत्रित राहते. उच्च पोटॅशियम सामग्री रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि हृदयाच्या आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

पचनास मदत होते – लाल केळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे पचन सुरळीत होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता टाळता येते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते – लाल केळ्यामध्ये जीवनसत्त्वे सी आणि बी६ असतात; जे रोगप्रतिकार शक्तीला आधार देतात.

त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर – लाल केळ्यांमध्ये असणारी अँटिऑक्सिडंट्स आणि बीटा-कॅरोटीनची उपस्थिती निरोगी त्वचा आणि चांगली दृष्टी राखण्यास मदत करते.

वजन कमी करणे – लाल केळी फायबरने समृद्ध असतात. तसेच त्यामध्ये कॅलरीज कमी असल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुमचा आहार नियंत्रित राहण्यास मदत होते. नियमितपणे लाल केळी खाल्ल्याने पोटफुगी कमी होण्यास, बॅक्टेरियाची विविधता वाढण्यास आणि बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत होते; ज्यामुळे पचन व्यवस्थित होते आणि IBD किंवा दाहक आतड्यांसंबंधी रोगाचा धोका कमी होतो.

मूड सुधारतो – लाल केळ्यात असणारे व्हिटॅमिन B6 शरीरात सिरोटोनिन तयार होण्यासाठी मदत करतात . सिरोटोनिन हे एक नैसर्गिक रसायन आहे, जे आपला मूड चांगला ठेवते आणि तणाव कमी करते.

जर तुम्हाला केळ्यांची अ‍ॅलर्जी असेल किंवा तुम्ही जास्त प्रमाणात केळी खाल्ली, तर तुमचे पोट फुगू शकते किंवा पोट खराब होऊ शकते. तसेच जर तुम्हाला त्रास होत नसेल, तर लाल केळी सामान्यतः एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. म्हणूनच आरोग्यासाठी फायदे मिळवण्यासाठी तुमच्या दैनंदिन आहारात लाल केळ्याला थोडी जागा द्या,

लाल आणि पिवळ्या केळ्यात काय फरक?

पिवळ्या केळ्यांच्या तुलनेत, लाल केळी आतून जास्त घट्ट असतात आणि दिसायला लहान असतात. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सदेखील जास्त असतात. लाल केळी गोड असली तरीही त्यात ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो, ज्यामुळे मधुमेही किंवा वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो, असे पोषणतज्ज्ञ व सीईओ एकता टंडन म्हणाल्या आहेत.

लाल केळ्यामध्ये पिवळ्या केळ्यासारखेच पोषक घटक असले तरी, त्यात बी६, मॅग्नेशियम व बीटा कॅरोटीनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. दिवसाला १ ते २ लाल केळी खाणे आरोग्यदायी मानले जाते. जेवणाबरोबर नव्हे, तर जेवणापूर्वीच्या मधल्या वेळेत केळी खावीत; जेणेकरून त्यातील पोषक घटक चांगले शोषले जातील, असे पोषणतज्ज्ञ व सीईओ एकता टंडन म्हणाल्या आहेत.

एकता टंडन यांच्या मते, दररोज लाल केळी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. जास्त ऊर्जा आणि पोट भरल्याची भावना प्रदान करण्यात मदत मिळते. तसेच रक्तदाब नियंत्रित करून आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगाचा धोकासुद्धा कमी होतो.