Avoid Consuming too much dal vegetables : निरोगी आयुष्यासाठी उत्तम आहार घेणे फार महत्त्वाचे आहे. आपण जे पदार्थ खातो त्याचा आपल्या आरोग्यावर चांगला-वाईट परिणाम होत असतो. अनेकदा कोणता पदार्थ किती प्रमाणात खाल्ला पाहिजे हे देखील अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या रोजच्या जेवणात भाजी-पोळी, डाळ-भात हे मूलभूत पदार्थ असतात, पण ते योग्य प्रमाणात खाणेदेखील महत्त्वाचे असते. भाज्या आणि डाळी या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असल्या तरी खूप जास्त प्रमाणात खाणे फायदेशीर ठरू शकत नाही. यावर भर देत आरोग्य प्रशिक्षक निपा आशाराम यांनी त्यांच्या रोजच्या जेवणातील चुकांबाबत सांगितले. त्या सांगतात की, “मी रोज जेवणात खूप जास्त प्रमाणात डाळ आणि भाज्या खात होते, यामुळे मला पचनाच्या समस्या निर्माण होत होत्या. जर तुम्ही भाताबरोबर डाळ खात असाल तर ५० ग्रॅम शिजवलेली डाळ आणि १५० ग्रॅम शिजवलेल्या भाज्या घ्या. जास्त भाज्या म्हणजे तुमच्या आतड्याला पचण्यासाठी जास्त फायबर लागतात, म्हणून फक्त भाजी खात असाल तर ३०० ग्रॅम हे प्रमाण योग्य आहे.”

“प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरने समृद्ध आहारासाठी डाळ आणि भाज्या आवश्यक आहेत, पण जास्त प्रमाणात त्यांचे सेवन केल्यास त्याचे काही तोटे आहेत. जास्त प्रमाणात डाळ खाल्ल्याने, विशेषतः मूग किंवा मसूरसारख्या डाळी जास्त प्रमाणात तेल, तूप किंवा क्रिम वापरून बनवल्यास त्यातील कॅलरीजचे प्रमाण जास्त होऊ शकते; यामुळे कालांतराने वजन वाढण्याची शक्यता असते,” असे आसा अँटो सी यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले. ते आरआरनगर येथील एसएस स्पर्श रुग्णालयाच्या क्लिनिकल आहारतज्ज्ञ आहेत.

“जास्त प्रमाणात डाळ खाल्ल्यास त्यात असलेले ऑलिगोसॅकराइड्स (oligosaccharides) हे अपचन, गॅस किंवा पोटफुगची समस्या निर्माण करतात. डाळ शिजण्यापूर्वी भिजवा आणि त्यात आले, हिंग आणि जिरेसारखे पाचक मसाले घाला,” असे बॅलेन्स्ड बाईटच्या संस्थापक पोषणतज्ज्ञ अपेक्षा चांदूरकर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सुचवले.

“डाळींमध्ये कार्बोहायड्रेट मुबलक प्रमाणात असतात. विशेषत: मधुमेही रुग्ण आणि इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होत असलेल्या लोकांनी जास्त प्रमाणात डाळ खाल्ल्यास रक्तातील कार्बोहायड्रेटचे नियमन बिघडते,” असे चांदूरकर सांगतात.

त्याप्रमाणे, संतुलित प्रमाण न राखता जास्त भाज्या खाल्ल्याने पचनक्रियेदरम्यान त्रास होऊ शकतो. जसे की पोटफुगी किंवा गॅस, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय भरपूर ग्रेव्ही किंवा जास्त तेल घालून शिजवलेल्या भाज्या कॅलरीजचा वापर लक्षणीयरीत्या वाढवू शकतात, असे अँटो सांगतात.

“एका प्रकारच्या अन्नावर, अगदी डाळ किंवा भाज्यांसारख्या निरोगी आहारावर जास्त अवलंबून राहिल्याने तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या इतर महत्त्वाच्या पोषक तत्वांचा अभाव होऊ शकतो,” असे अँटो यांनी ठामपणे सांगितले.

काय लक्षात ठेवावे?

पोटाच्या समस्या टाळण्यासाठी योग्य प्रमाण (portion control) आणि विविधतेवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक जेवणात १-२ वाटीपेक्षा जास्त डाळ खाणे टाळा आणि ही डाळ कमीत कमी तेलात बनवलेली असेल याची काळजी घ्या. तसेच तापकिरी तांदूळ (brown rice) किंवा क्विनोआबरोबर ती डाळ खा. भाज्या खाताना विविध रंगाच्या भाज्या खाल्ल्या जातील याकडे लक्ष द्या. तसेच त्यातील पोषक तत्व कायम रहावे यासाठी थोडेसे शिजवा, खूप जास्त शिजवू नका. तसेच कॅलरीयुक्त सॉस वापरून भाज्या बनवू नका, असे अँटो यांनी स्पष्ट केले.

चांदूरकर सांगतात की, तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण हळू-हळू वाढवा आणि भरपूर पाणी प्या, जेणकरून तुमची पचनक्रिया सुधारेल. तुमच्या ताटामध्ये संपूर्ण धान्य, भाज्या, शेंगा, हेल्दी फॅट्स असे विविध खाद्यपदार्थ असतील याची काळजी घ्या.

डाळी, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रथिने यांचे नियंत्रित प्रमाण असलेला संतुलित आहार हे चांगले आरोग्य आणि वजन संतुलन राखण्याची गुरुकिल्ली आहे. “फक्त भाज्या खाल्ल्याने आणि फॅट्स आणि प्रथिने यांसारखे इतर कोणतेही मॅक्रोन्यूट्रिएंट न खाल्ल्याने अखेरीस पोषक तत्वांची कमतरता किंवा असंतुलन निर्माण होऊ शकते. मधुमेह, मूत्रपिंड समस्या, थायरॉईड इत्यादी विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींनुसार अन्न आणि त्याचे प्रमाण बदला,” असे चांदूरकर सांगतात.