hypotension : कमी रक्तदाब म्हणजेच हायपो टेन्शन (Hypotension) ही अशी अवस्था आहे, जी बहुतेक वेळा लोकांकडून दुर्लक्षित केली जाते. काही लोकांना रक्तदाब कमी असला तरी कोणतेही विशेष लक्षण जाणवत नाही. परंतु वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहता, रक्तदाब खूप कमी झाल्यास शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचण्यात अडथळा येतो आणि त्यामुळे मेंदू, हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर गंभीर परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ रक्तदाब कमी राहिल्यास हे अवयव हळूहळू निष्क्रिय होण्याच्या अवस्थेत जातात, आणि उपचार न केल्यास मृत्यूचाही धोका निर्माण होऊ शकतो.

रक्तदाब आणि ऑक्सिजन पुरवठा यांचा संबध

रक्तदाब म्हणजे रक्ताने रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर टाकलेला दाब. तो दोन मोजमापांमध्ये दर्शविला जातो – सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक (उदा. १२०/८० mmHg). मात्र शरीरातील अवयवांना रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा नीट होण्यासाठी Mean Arterial Pressure (MAP) सर्वात महत्त्वाचा असतो. तज्ज्ञ सांगतात की जेव्हा MAP ६० ते ६५ mmHg पेक्षा खाली जातो, तेव्हा अवयवांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही. परिणामी, पेशींना ऑक्सिजन आणि पोषणद्रव्यांची कमतरता भासते आणि त्या हळूहळू निकामी होऊ लागतात.

दीर्घकाळ कमी रक्तदाब राहिल्यास काय होतं?

रक्तदाब कमी झाल्यावर शरीर तातडीने त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करते. हृदयाचे ठोके वाढतात, शरीरातील रक्त महत्त्वाच्या अवयवांकडे म्हणजेच मेंदू आणि हृदयाकडे वळवलं जातं. परंतु जर रक्तदाब दीर्घकाळ कमी राहिला तर या यंत्रणेचा परिणाम मर्यादित ठरतो. ऑक्सिजनच्या अभावामुळे पेशींचं कार्य बिघडतं, ऊतींमध्ये रक्तप्रवाह कमी होतो आणि हळूहळू अवयव काम करणं थांबवतात.

मेंदू, हृदय, किडनी आणि यकृतावर परिणाम

कमी रक्तदाबामुळे सर्वाधिक परिणाम मेंदू, हृदय, किडनी आणि यकृतावर होतो. मेंदूतील रक्तपुरवठा घटल्यास गोंधळ, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा कोमा अशी लक्षणं दिसू शकतात. हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही म्हणून छातीत दुखणे, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मूत्रपिंड सतत रक्त फिल्टर करत असल्याने त्यांना सतत रक्तपुरवठा आवश्यक असतो, पण रक्तदाब कमी झाल्यास मूत्रनिर्मिती घटते, क्रिएटिनिन (Creatinine)वाढते आणि Acute Kidney Injury म्हणजेच किडनी निकामी होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे यकृतालाही रक्ताचा पुरवठा घटल्यास इस्केमिक हिपॅटायटीस किंवा ‘शॉक लिव्हर’ची अवस्था निर्माण होते, ज्यात यकृताचे एन्झाइम्स वाढतात आणि यकृताचं कार्य तात्पुरतं थांबतं.

तीव्रता आणि कालावधी ठरवतो धोका

तज्ज्ञ सांगतात की, रक्तदाब किती खाली जातो आणि तो किती काळ टिकतो यावर अवलंबून शरीरावर परिणाम होतो. MAP ६० mmHg पेक्षा कमी किंवा सिस्टॉलिक रक्तदाब ९० mmHg पेक्षा कमी असणं अत्यंत धोकादायक मानलं जातं. काही वेळा थोड्या वेळासाठी कमी रक्तदाब असला तरी शरीर त्याला सहन करू शकतं, पण दीर्घकाळ रक्तदाब कमी राहिल्यास अवयवांवर कधीही न बदलता येणारे हानी होते.

वैद्यकीय संशोधन काय सांगतं?

‘जर्नल ऑफ अ‍ॅनेस्थेशिया, अ‍ॅनाल्जेसिया अँड क्रिटिकल केअर’ (२०२२) मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, शस्त्रक्रियेच्या काळात किंवा अतिदक्षता विभागात (ICU) रक्तदाब खूप कमी राहिल्यास रुग्णांच्या मृत्यूचा धोका वाढतो. अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे की, सतत रक्तदाब कमी राहिल्याने शरीरातील अवयवांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही आणि परिणामी किडनी, यकृत, मेंदू तसेच हृदयाच्या पेशींमध्ये अपरिवर्तनीय नुकसान होतं. विशेषतः ज्यांना आधीपासून किडनी, हृदय किंवा यकृताचे आजार आहेत, त्यांच्यात धोका अधिक असतो.

कमी रक्तदाब टाळण्यासाठी काय करावं?

कमी रक्तदाब टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली राखणं सर्वात महत्त्वाचं आहे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नये, कारण डिहायड्रेशनमुळे रक्तदाब घसरतो. मीठाचं प्रमाण डॉक्टरांच्या सल्ल्याने किंचित वाढवता येतं. उपाशी राहणं टाळावं, दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने खाणं आवश्यक आहे. अचानक उठणे, दीर्घकाळ उभं राहणं किंवा अत्याधिक थकवा टाळावा. काही प्रकरणांमध्ये कॉफी किंवा ग्रीन टीचे मर्यादित प्रमाणातील सेवन रक्तदाब वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते.

कमी रक्तदाब हा साधा किंवा निरुपद्रवी त्रास नाही. तो दीर्घकाळ टिकल्यास हृदय, मेंदू, मूत्रपिंड आणि यकृत यांसारख्या अवयवांचं कार्य बिघडवू शकतो. त्यामुळे रक्तदाब नियमितपणे तपासणं, थकवा, चक्कर येणे, बेशुद्धी अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणं अत्यावश्यक आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास या घातक परिणामांपासून शरीराचं संरक्षण करता येऊ शकतं.