देवी विशेष
अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com
लिंब नेसत, भंडारा उधळत, आंबील-घुगऱ्यांचा प्रसाद घेत, सुती-चौंडकं वाजवीत, देवीची गाणी गात महाराष्ट्रभर फिरणाऱ्या ‘देवमामा तानाजी पाटील’ यांनी प्रबोधनाची वेगळी वाट निर्माण केली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे देवीच्या नावाखाली केसांच्या जटा ठेवणे, मुलांना देवीला सोडणे या प्रथांचा लोक पुनर्विचार करू लागले आहेत. दारूला विरोध करणं, स्त्रीभ्रूण हत्येवर परखड टीका करणे हादेखील आपल्या कामाचाच भाग मानणाऱ्या देवमामांचा जीवनप्रवास..
सौंदत्ती नावाच्या रं..
सौंदत्ती नावाच्या रं
रेणुका संबळ माया रं..
जगदंबा संबळ माया रं
कापूर जळतोय यल्लमा म्होरं.
आरती जळतीय देवी म्होरं
देवी बसलिया गादी म्होरं..
पुजारी बसला आसनावर
सुती-चौंडकं गर्जे म्होरं..
मंगळं, मंगळं त्यो मंगळं
मंगळारती तू घे गं आई
जोग्या निर्मळ.. सर्वे निर्मळ
आकया.. जोगया.. आकया.. जोगया..
आई उदं ग आई उदंऽऽऽऽ..
परशुराम उदं उदंऽऽऽऽऽऽ
एकापेक्षा एक भन्नाट मराठी, हिंदी गाण्यांच्या चालींवरील यल्लमादेवीच्या गाण्यांनी तानाजीमामांनी रेणुकाभक्तांना अक्षरश: वेड लावले आहे. कर्नाटकात असणाऱ्या सौंदत्तीच्या रेणुकामातेवर शेकडो गाणी रचणारे आणि गावागावांत समाजप्रबोधन करत देवीची महती सांगत फिरणारे ‘देवमामा तानाजी पाटील’ भक्तांच्या हृदयावर अधिराज्य करत आहेत. देवमामा म्हणून प्रसिद्ध असणारे तानाजी पाटील आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगतात की, पूर्वी एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल किंवा काही घरगुती अडचणी असतील तर ते यल्लमादेवीला ‘तू मला अडचणीत बाहेर काढ, माझे पहिले मूल तुला सोडेन’ असा नवस बोलत असत. तशाच पद्धतीने मला माझ्या आई-वडिलांनी देवीला सोडले. एरवी आमच्यासारख्या तृतीयपंथी व्यक्तींना इतरांसारखे काम करून पोट भरणे शक्य नसते. एखाद्या तृतीयपंथी व्यक्तीला देवाला सोडले की, त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटतो. त्याचबरोबर समाजातून होणारा त्रासदेखील कमी होतो. देवीला सोडलेल्या मुलीला जोगतीण आणि तृतीयपंथी व्यक्तीला जोगता म्हटले जाते. मी जोगता झाल्यानंतर हातात सुती आणि चौंडक घेऊन देवीचे जागरण, देवीचा भंडारा (आंबील), देवीचा लिंब, असे धार्मिक कार्यक्रम सुरू केले. वयाच्या ११ वर्षांपासून देवीची भक्ती सुरू केली. देवीला जशी एखादी तृतीयपंथी व्यक्ती किंवा स्त्री सोडली जाते, तसाच एखादा पुरुषदेखील सोडला जातो. त्याला ‘किन्नर’ म्हणतात. त्याला समाजाकडून त्रास होण्याची फारशी शक्यता नसते. परंतु, एखादी स्त्री (देवदासी) देवीला सोडली जाते, तेव्हा तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण होण्याची शक्यता जास्त असते. देवीचे कार्यक्रम करत असताना देवदासींच्या शोषणाची अनेक प्रकरणे माझ्या निदर्शनास आली. देवदासींवर होणाऱ्या अन्यायाबद्दल एखाद्या संवेदनशील माणसाने आवाज उठविला, तर समाज त्याची गांभीर्याने दखल घेत नाही. उलट त्याला विरोधच होतो. पण तृतीयपंथी तसंच देवीचा भक्त म्हणून माझी ओळख असल्याने या कामात मला फारसा विरोध झाला नाही. त्यामुळे मी स्वत:च पुढाकार घेतला आणि देवदासींच्या दुर्दैवी जीवनावर बोलण्याला सुरुवात केली.
खरेतर आजही अनेक शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागांत घरांसमोर ‘आकया जोगवाऽऽऽऽ’ असा जोगवा मागत स्त्रिया येतात. अजूनही समाज त्यांच्याकडे माणूस म्हणून पाहात नाही. साहित्य, चित्रपट, अशा माध्यमांतून देवदासींच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. पण या समस्येचं उग्र स्वरूप पाहता हे प्रयत्न खूपच अपुरे आहेत. अशा परिस्थितीत सोनारानेच कान टोचायला हवेत, या न्यायाने तानाजी पाटील पुढे सरसावले. यल्लमादेवीच्या नावाने जोपासल्या जाणाऱ्या चुकीच्या प्रथा-परंपरांबद्दल त्यांनी पालकाच्या नात्याने भक्तांना समजून सांगण्यास सुरुवात केली. केसांच्या जटा काढणे आणि मुलींना देवीला सोडण्यास मज्जाव करणे, असे कार्यक्रम घेण्यास प्रारंभ केला. या कार्यक्रमांतून आलेल्या अनुभवांबद्दल तानाजी पाटील सांगतात की, सुरुवातीला केसांच्या जटा काढण्याच्या कार्यक्रमाला समाजातून प्रचंड विरोध झाला. लोक म्हणायचे की, तूदेखील देवाचाच माणूस आहेस. मग तूच देवाला का विरोध करतोस? मात्र, माझं वाढत जाणारं काम आणि लोकांना समजून सांगण्याच्या पद्धतीमुळे आज लोक स्वत:हून माझ्याकडे येतात आणि जटा काढून घेतात. आतापर्यंत सुमारे चार हजारांहून अधिक स्त्रियांच्या जटा काढण्यात आम्हाला यश मिळाले आहे.
अनिष्ट रूढी, प्रथा-परंपरा, चालीरीतींवर थेट भाष्य करत समाजपरिवर्तन करू पाहणाऱ्या लोकांपेक्षा तानाजी पाटील यांची प्रबोधनाची पद्धत एकदम वेगळी आहे. हिंदी, मराठी गाण्यांच्या चालीवर देवीची महती सांगत ते चुकीच्या प्रथांवर भाष्य करतात. चौंडक, तबला-पेटी, टाळ, भरजरी साडय़ा, दागिने, देवीचा जग (फिरता देव्हारा), भंडारा घेऊन गावागावांत देवीच्या जागरणाचे कार्यक्रम करतात. वेगवेगळ्या चालींवरील गाणी, कथानक आणि संवाद यांच्या जोरावर लाखो भक्तांना तब्बल दोन-अडीच तास रोखून ठेवण्याची जादू तानाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आहे. १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘लाखात अशी देखणी’ या मराठी चित्रपटातील ‘बाई मी पतंग उडवीत होते’ गाण्याच्या चालीवर ठेका धरत तानाजी पाटील आणि त्यांचे ११ सहकारी यल्लमा देवीचे गाणे गातात..
बाई मी भंडारा उधळीत होते
गं.. बाई मी भंडारा उधळीत जाते
दरवर्षांची गं माझी वारी,
कुलदैवता आई माझ्या घरी
पाणी कुंडात जाऊन न्हाहते..
बाई मी भंडारा उधळीत होते
आशा नाही गं मला कशाची,
आवड मला आहे रेणुकाची
तिचं दर्शन नेमात घेते..
बाई मी भंडारा उधळीत होते
अशा गाण्यांनीच खरेतर तानाजी पाटील यांनी लाखो भक्तांना जोडून घेतले आहे. पावसाळ्याचे दिवस वगळता सलग आठ महिने कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मराठवाडा, विदर्भ अशा भागांत ते देवीच्या जागरणाचे कार्यक्रम करतात. या कार्यक्रमांतून गायल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये भक्त तल्लीन होऊन जातात. श्रद्धेने देवीसमोर हात जोडत आपली गाऱ्हाणी मांडतात. अनेक अडचणींतून भक्तांना सोडविणारी यल्लमा देवी खरी आपली आई आहे, या भावनेने तिची पूजाअर्चा करतात.
तानाजी पाटील यांनी कोल्हापुरातील उत्तूर या खेडेगावात देवीचे मोठे मंदिर बांधलेले आहे. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीची मोठी पूजा केली जाते. या नऊ दिवसांमध्ये देवीला वेगवेगळ्या रंगांच्या साडय़ा नेसविल्या जातात. घट बसविले जातात. त्याचबरोबर देवीची परडी सोडणे, देवीचा लिंब नेसणे, जागरण घालणे, यात्रेला जाणे असे अनेक कार्यक्रम रेणुकाभक्त या मंदिरात करतात. लाखो भक्त दरवर्षी नित्यनियमाने सौंदत्तीला रेणुकामातेच्या भेटीला जात असतात. सौंदत्तीहून घरी आल्यानंतर आंबील-घुगऱ्यांचा नैवेद्य करत देवीचे जागरण केले जाते. या जागरणाला देवदासी, जोगता, किन्नर यांना आमंत्रण दिले जाते. त्यांच्याकडून देवीचे कार्यक्रम करवून घेतले, तरच, देवीला तो प्रसाद मान्य होतो, असे मानले जाते. त्यानंतर आपापल्या कुवतीप्रमाणे आमंत्रित जोगत्यांना आणि देवदासींना कपडे भेट दिले जातात. देवीच्या नैवेद्यामध्ये पुरणपोळी, भाजीभाकरी हे पदार्थ असतात. या आमंत्रितांमध्ये मांतगीलाही बोलावणे धाडले जाते. मातंगी म्हणजे देवीचे मांग समाजातील भक्त. तंगी म्हणजे आई. देवीने मांग लोकांना आईचा मान दिला, त्यामुळे मांग आणि तंगी या शब्दांचा मिळून ‘मातंगी’ हा शब्द तयार झाला, असे सांगितले जाते. ‘देवीची पूजा’ घातली जाते. लिंब नेसणे म्हणजे संपूर्ण अंगावर लिंबाच्या पानांची डहाळे बांधली जातात. घरातील इडापिडा टळण्यासाठी लिंब नेसवला जातो. त्यामध्ये कमरेला, डोक्याला, हातांना आणि तोंडामध्ये लिंबाची पाने बांधली जातात. हा लिंब नेसण्याचा प्रकार कोणी दरवर्षी करतात, तर कोणी तीन वर्षांतून एकदा करतात.
एरवी समाजात तृतीयपंथीयांची सातत्याने हेटाळणी होते. पण ज्यांना यल्लम्माला सोडलं जातं, त्या तृतीयपंथीयांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटतो, त्यांना समाजात मानसन्मान मिळतो. हे सगळं देवीमुळे झालं, तिच्यामुळे आपल्याला माणूसपण मिळालं म्हणून देवीची सेवा करण्यात त्यांना धन्यता वाटायला लागते. आजही समाजात जोगत्यांबद्दल आदरयुक्त भीती आहे. बुजुर्गाकडून नेहमी असे सांगितले जाते की, जोगत्याची चेष्टा करू नये. कारण जोगत्या म्हणजे देवीच्या अगदी जवळ असलेली व्यक्ती. देवी त्याचे ऐकते, त्याची चेष्टा करणाऱ्यांना जन्माची अद्दल घडवते असा समज आहे. या भीतीपोटी का होईना समाजात तृतीयपंथी जोगत्यांना आदराने वागवले जाते. तरीही प्रत्येक देवदासी, तृतीयपंथी यांच्या जीवनाची एक दुर्दैवी कथा असते. त्याच्याकडे सर्वाचेच दुर्लक्ष होते. त्यांचे जगणे अधोरेखित करण्यासाठी तानाजी पाटील गाण्यांचा आधार घेतात आणि वास्तवदर्शी रचना प्रेक्षकांसमोर ठेवतात. ती रचना अशी..
अगं हे झालं कसं..
मला मुळीच कळले नाही
माझ्या आईबापानं देवाला सोडली बाई
मी गं लहानाची झालोय मोठी,
जो-तो प्रेमानं मारतोय मिठी
या या पोटाच्या खळग्यासाठी,
नको नको त्या करतो गोष्टी
लोक म्हणत्यात मला,
इज्जत नाही हिला.. अब्रू नाही हिला
आता करावं तरी मी काई..
मला आईबापानं देवाला सोडली बाई
नाही जीवाला नवरापोरं,
घरादाराचा नाही आधार
जोगवा मागतोय घरोघरं,
माझ्या जीवाला वाटंना बरं
हे माझं कोडं, सांगू कुणापुढं
दुख वाटतं लई..
मला आईबापानं देवाला सोडली बाई
दास बळीराम हात जोडून,
सांगे लोकांना इनवून
दास तानाजी हात जोडून,
सांगे भक्ताला इनवून
त्या देवाच्या नावानं..
करू नका मुलं तुम्ही दान..
यल्लूबाईच्या नावानं
देवदासीचं कोडं.. नको यांच्यापुढं
हात जोडून सांगतो बाई..
मला आईबापानं देवाला सोडलं बाई
(सर्व छायाचित्रे : गणेश आसगावकर)