घरातलं मूल मोठं व्हायला लागतं, जग त्यांच्या पद्धतीने समजून घेताना प्रश्न विचारायला लागतं तेव्हा खडबडून जाग येते. आपण आजवर नक्की काय शिकलो, याचा आपल्याला साक्षात्कार होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसाची वयाची पहिली वीस-पंचवीस र्वष शिक्षणात जातात. म्हणजे आयुष्यातला सरासरी साधारण तीस टक्के वेळ शिक्षणात जातो. या शिक्षणाच्या बळावर नोकरी, व्यवसाय करून आपण पसे कमवायला लागतो. मग त्या बळावर लग्नं वगरे होतात. या सगळ्यात चरितार्थासाठी तोपर्यंतच्या शिक्षणाचा नक्की काय फायदा करायचा हे आपल्याला शिकवलं जातं. पण या सगळ्यात जगण्यासाठी या शिक्षणाचा काही उपयोग झालाय का? तो आपण करून घेतलाय का? हा प्रश्नच तसा पडत नाही. कारण शिक्षणानं पसे मिळवायचे मार्ग मोकळे होतात एवढीच काय ती धन्यता मानली जाते. घेतलेल्या शिक्षणानं आपण नक्की ज्ञानी झालोय का? हा प्रश्न तसा आपल्याला कुणी विचारतही नाही; आणि त्यामुळे तो आपला आपल्याला पडायचं तसं काही कारणंच पडत नाही.
पण लग्नानंतर जेव्हा मुलं होतात, ती मोठी होऊ लागतात; हे जग, व्यवहार, आपला परिसर जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रश्न विचारायला लागतात, तेव्हा मात्र आपल्याला खडबडून जागं व्हायला होतं. आपण नक्की आजवर काय शिकलो, याचा आपल्याला साक्षात्कार होतो. कारण बालसुलभ मनाची कवाडं विस्तारण्यासाठी त्यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला बऱ्याच माहितीचं भांडार बाळगून रहावं लागतं. त्यांच्या येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या निमित्ताने स्वत:लाच प्रश्न पडत राहतात. आणि आपले आजवर झालेले सगळे शिक्षण पहिल्यापासून परत नव्याने सुरू होते. आणि त्याच अभ्यासक्रमाला आपल्याला नव्या दृष्टीने सामोरं जावं लागतं.
माझ्या घरी मुलाला रोज गोष्ट सांगावी लागते. तसं हे वय वास्तवापेक्षा गोष्टींतच रमण्याचं. मी माझ्या कामात असताना माझा मुलगा कुठलीतरी गोष्ट वाचून झाल्यावर काहीतरी विचारायला आला. गोष्ट झाली की तो अनेक प्रश्न घेऊन उभा असतो. इथे मुद्दा फक्त माझ्या मुलाचा नाही. माझा मुलगा हा काही जगावेगळा नाही. त्याच्याबरोबरीची शाळेतली सगळीच मुलं, शेजार, आप्त, इतर मित्र-मत्रिणींच्या मुलांचीही प्रश्न पडण्याची सर्वसाधारण तीच अवस्था. काही मुलांचे प्रश्न तर अधिकच विचार करायला लावणारे.
मुलगा – बाबा, आपला राजा कोण आहे?
दुसरीत असल्याने त्याच्या भावविश्वात सतत राजे, राण्या, पऱ्या, एंजल्स, राक्षस, देव वगरे ठाण मांडून आहेत अजून. आम्हीही उगाच आमच्यासाठी म्हणून त्यातून त्याला बाहेर काढत नाही. आता राष्ट्राचा पंतप्रधान हा राजा असतो? का राष्ट्रपती? हे ठरवण्यातच माझा आधी वेळ गेला. सगळी समाजशास्त्राची उजळणी.
मी – आपला राजा असा नसतो कुणी. आपले प्रमुख राष्ट्रपती असतात आणि राज्य चालवणारे पंतप्रधान.
मुलगा – पण आपले मेन कोण आहेत यातले? (त्याच्यालेखी मेन म्हणजे ज्याच्याशी त्याला घेणं-देणं आहे ते.)
मी – तसे मेन पंतप्रधान.
मुलगा – कोण आहेत ते?
मी – मनमोहन सिंग.
मुलगा – बाबा, आपला राजा चांगला आहे ना?
मला काय सांगावं कळेचना. त्याच्या लेखी त्याला बरं वाटावं म्हणून मी त्याला म्हटलं,
मी – आपला राजा स्वत: खूप हुशार आहे, ज्ञानी आहे.
कोणतीही गोष्ट, नाटक, सिनेमा पाहताना त्याचं पहिलं वर्गीकरण सुरू होतं; गोष्टीत चांगलं कोण आणि वाईट कोण याचं. त्याला लगेच ठरवायचं असतं आपण कुणाच्या बाजूनं जायचं आहे ते. काही वेळा कळत नाही तेव्हा तो अधीरपणे विचारतो, ‘‘बाबा हा नक्की चांगला माणूस आहे का वाईट?’’ त्याला गोष्ट संपेपर्यंत थांबायला भाग पाडतो. त्याचं त्यालाच ठरवायला भाग पाडतो. पण सगळीच उत्तरं सोपी नसतात. मग प्रश्न पडायला सुरुवात होते. ज्ञानेश्वरांच्या गोष्टीनंतर ‘‘ज्ञानेश्वरांचे आई-बाबा मुलांना सोडून आणि तेही न सांगता का निघून गेले?’’ ही उत्तरं कशी पटकन देणार?
की आपल्या चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, राजा हर्षवर्धनपासून शिवाजीपर्यंत.. या राजांच्या गोष्टींच्या परिणामामुळे माझ्या मुलाच्या बालसुलभ मनाच्या कोमल मनावरचा एक खोलवर रुजणारा सूक्ष्म अर्थ मला वेळोवेळी जाणवला; तो असा की, राजा प्रजेचं पालन करतो; जो चांगलं पालन करतो तो चांगला राजा असतो आणि राजा चांगला असला की आपण सेफ असतो.
आपला राजा हुशार आहे, ज्ञानी आहे एवढय़ानेही माझ्या मुलाचं समाधान झालं आणि तो लगेच खेळायला गेला. त्याला एवढी माहितीही पुरेशी होती.
मी रोज सकाळी माझ्या मुलाला शाळेच्या बससाठी सोडायला जायचो. ती वेळ दिल्ली आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातम्यांची असल्याने मी रोज सकाळी त्या बातम्या गाडीतही ऐकतो. मला दिल्ली आकाशवाणीच्या राष्ट्रीय बातम्या ऐकण्याची सवय आहे. बातम्यांचा मूलभूत गुणधर्म म्हणजे ‘बातमी ही भावनारहित असावी’ लागते; या गुणधर्माला जागून दिल्या जाणाऱ्या या बातम्या खरंच ऐकण्यासारख्या असतात. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय राजकारण, कला, क्रीडा सगळ्याच बाबतीतल्या बातम्या अजूनही जबाबदारीने दिल्या जातात. रोजच्या बातम्यांमध्ये अनेक कारणांनी पाकिस्तानचा उल्लेख असतोच. या बातम्या माझ्याबरोबरीने माझा मुलगाही ऐकतोय हे माझ्या तसं कधी लक्षातच आलं नाही. मित्रांबरोबर खेळण्याच्या निमित्ताने माझ्या सात वर्षांच्या मुलाला चार-पाच देशांची नावं कानावर पडली होती. त्यात त्याला पाकिस्तान नावाचा देश आहे याची माहिती झाली होती. माहितीचं आणखी एक महत्त्वाचं प्रमुख कारण क्रिकेट हे होतं. एकदा रेडिओवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भाषणांची ऑडिओ क्लिप सुरू होती. पाकिस्तानी पंतप्रधान उर्दूत बोलत होते. निम्मे शब्द िहदी असल्याने माझा मुलगा कुतूहलाने मला विचारू लागला.
मुलगा – बाबा, आपण पण िहदी बोलतो. पाकिस्तानात पण लोक िहदी बोलतात का?
मी – हो.
मुलगा – का?
मी – कारण आपली आणि त्यांची भाषा एकच आहे. तो आधी आपल्याच देशाचा भाग होता. तो देश नंतर वेगळा झाला.
मुलगा – का वेगळा झाला?
माझ्या पोटात गोळा आला. आता याला फाळणी, युद्ध सगळं सांगावं लागणार. फाळणी या शब्दाचा अर्थ कळण्याचं त्याचं चुकूनही वय नव्हतं. मी काय सांगायचं याचा विचार करत असतानाच परत त्याचा प्रश्न आला.
मुलगा – बाबा.. सांगा ना.
मी – अरे त्यांना वेगळं राहायचं होतं.
मुलगा – का?
आता याला पाकिस्तान वेगळं होण्याची काय कारणं सांगायची? धर्म हे प्रमुख कारण असलं तरी ते दुसरीतल्या मुलाला कळायचं कारणच नव्हतं. कारण ‘धर्म म्हणजे काय?’ या त्याच्या पुढच्या प्रश्नाला मला सामोरं जाव लागलंच असतं, म्हणून सर्वसाधारण संस्कारित वाक्य माझ्या तोंडून बाहेर पडलं..
मी – ते आपलं शत्रू राष्ट्र आहे.
मी त्याला उत्तर दिलं खरं..पण माझ्या तोंडातून पाकिस्तान हा आपला शत्रू आहे ही माहिती काहीही कारण नसताना त्याला माझ्याकडून मिळाली आणि मी क्षणार्धात गप्प बसलो. बसची वाट पाहीपर्यंत माझं माझंच आतल्या आत अभिसरण सुरू झालं. मी का म्हणून त्याला हे सांगितलं की, पाकिस्तान हा आपला शत्रू आहे म्हणून? आत्ता या वयात त्याला या माहितीशी काही घेणं-देणं आहे का? त्याला ही माहिती पहिल्यांदाच कळत होती. कुठलातरी देश..म्हणजे पाकिस्तान हा आपला एनिमी आहे. त्यात त्याला ही माहिती त्याच्या बाबांनीच सांगितलेली असल्याने, त्याच्या लेखी ते ब्रह्मवाक्यंच. आणि मित्रापेक्षा कुणीतरी आपला शत्रू आहे, ही गोष्ट त्याच्या मनावर नव्यानं कोरली जाणार होती. मी माझाच विचार करत राहिलो, वर्षांनुर्वष हे असंच होत आलेलं आहे का? देशाची फाळणी माझ्या जन्माच्या तीन दशकं आधीची. मी आठवायचा प्रयत्न करत राहिलो, मला पहिल्यांदा कधी कळलं पाकिस्तान हा आपला शत्रू आहे म्हणून? मला कुणी सांगितलं? मी नक्की कोणत्या वयापासून हे मनात साठवून बसलो आहे? प्रयत्न करूनही मला खरंच आठवेना. म्हणजे असंच माझ्या न कळत्या वयातच पाकिस्तान हा आपला शत्रू आहे हे मलाही कुणीतरी सांगितलेलं असणार. माझ्या कानांवरही ते पडत आलं असणार. नाहीतर कशाला मी ही माझ्या शालेय जीवनात, िझबाब्वेकडून हरण्यापेक्षा पाकिस्तानकडून हरण्याचं जास्त वाईट वाटून घेतलं असतं?
ही माहिती काही लपून राहणारी नाही. ती जरा मोठं झाल्यानंतर कळणारच आहे. इतिहासात या विषयातून फाळणी वगरे गोष्टींची सुटकाच नाही. किंबहुना या गोष्टी सांगण्यासाठीच इतिहास शिकवला जाणार. तारतम्याने अनेक गोष्टींचं आकलन झाल्यावर या महितीकडे फॅक्ट म्हणून कळण्याचं वय येण्याआधीच, आत्ता ही माहिती देण्याची काहीच गरज नव्हती. कारण मागचे पुढचे कसलेच संदर्भ न देता केवळ एखादं वाक्य सांगणं हे किती चुकीचं आहे. वरवर ही बाब छोटीशी वाटली तरी खूप खोलवर रुजणारी आहे. आणि हीच नाही तर अशा किती संदर्भहीन बाबी मुलांना आपण सांगत असतो; किंवा त्यांच्या कानावर पडत असतात. ज्या आपणही लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत.
मी माझ्या मुलाला दिलेल्या उत्तराची मला लाज वाटायला लागली. मी परत माहितीची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी त्याला माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केला; अगदी एनिमी नाहीय तो आपला. आपले काका कसे दुसऱ्या घरात राहतात? त्यांचं कसं स्वत:चं घर आहे? सगळेच एकत्र नाही राहू शकत. त्यांनी जसं नवीन घर घेतलं, तसंच पाकिस्ताननेही वेगळं घर घेतलं, वगरे..
एके दिवशी माझा मुलगा शाळेतून चिडून आला. तो त्याच्या वर्गातल्या मुलीवर चिडला होता. कारण विचारलं तर म्हणाला, ‘‘जेनाबला कृष्णाच्या गोष्टीत इंटरेस्ट नाही. ती म्हणाली की, कृष्ण काही आमचा गॉड नाही. अल्ला आमचा गॉड आहे.. आई अल्ला म्हणजे कोण’’? मी आणि माझी बायको एकमेकांकडे पहात राहिलो. त्या जेनाबच्या घरात जेनाबला नक्की काय काय सांगितलं असावं हे त्या मुलीच्या ठाम स्वरांवरून लक्षात येत होतं.
असाच रुजत आला आहे का धर्म घराघरांत?
जगातल्या सर्व संस्कृतीच्या सर्व काळातल्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट सगळीकडे समान आहे, ती म्हणजे कोणत्याही संस्कृतीचा इतिहास युद्धांशिवाय घडला नाही. मग त्या आपल्या पुराणकथांपासून, रामायण, महाभारत करत शिवाजी महाराज ते अगदी स्वातंत्र्यापर्यंत. ग्रीक, रोमन, फ्रेंच, रशियन सगळ्याच कथा रोमांचित करणाऱ्या युद्धांच्या. आणि युद्ध आली की, राजे आले, त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या वीरगाथा आल्या. म्हणजे िहसा आलीच. मग कुणीतरी जिंकतो आणि कुणीतरी हरतो. आपल्याकडे हल्ली मुलांसाठी रामायण, महाभारत, पुराणकथांच्या भारंभार अ‍ॅनिमेशन फिल्म्सचा धंदा वाढलाय. त्यात सूर – असुर, राक्षसांचा नायनाट, कुणी कुणाला हरवलं हेच या फिल्म्सचं विक्रीमूल्य. हल्ली पटापट बनवल्या जाण्याऱ्या अ‍ॅनिमेशन फिल्म्समध्ये गोष्टींमधल्या नतिकतेवर फारसा विचार करायला वेळ मिळत नसल्याने; ‘‘चांगला राजा शेवटी जिंकतो’’ यापेक्षा ‘‘जिंकणारा राजा चांगला असतो; आणि हरणारा दुष्ट’’ हे मनावर िबबवलं जातं. त्यामुळे ‘‘जिंकलो की आपण चांगले असतो’’ असा अप्रतिम नवविचार रुजत चाललेला आहे. जो आजच्या राजकीय विचारधारेतही आपल्याला दिसतोच आहे.
‘‘ओ माय गणेशा’’ या एका अ‍ॅनिमेशन फिल्ममध्ये तर तुमची चूक झाल्यानंतरही फक्त गणेशाचे स्मरण केल्यावर तो तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व करतो; तुम्हाला व्यायाम न करता फक्त मोदक खाल्ले की शक्ती देतो; कठीण परिस्थितीत मन खणखर कसं बनवायचं हे न सांगता तोच येऊन तुमच्या शत्रूला हरवतो. थोडक्यात मानवी चुका देव येऊन दुरुस्त करतो. आणि अशा अ‍ॅनिमेशन फिल्म्सचं पेव फार आहे हल्ली.
म्हणजे चांगल्या फिल्म्स् बनत नाहीत असं अजिबात नाही. पण कुठल्या चांगल्या आणि कुठल्या वाईट हे पाहिल्याशिवाय कळत नाही. आणि पाहून झाल्यावर चांगलं काय आणि वाईट काय हे ठरवण्याची कोणती फूटपट्टी घराघरांत वापरली जाते हाच तर खरा प्रश्न आहे. मुलांसाठी काय चांगलं आणि वाईट हे ठरवण्याची तशी गरज पडते का आपल्याकडे कुणाला? वेळ आहे का कुणाकडे एवढा?
निवडणुका पार पडल्या. मतमोजणीच्या दिवशी सगळ्याच घरात फक्त निकालाचं वातावरण होतं. सगळ्याच घरात फक्त मोदी दिसत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी चार तास सगळी वर्तमानपत्रं वाचण्यात घालवली. सगळ्याच पेपर्समध्ये मोदींचे भव्य फोटो. झोपेतून उठून माझ्या मांडीवर बसत माझ्या मुलाने मला विचारलं,
मुलगा – बाबा आपला राजा बदलला ना? (कारण गेल्या कित्येक दिवसांत याशिवाय दुसरा कुठला विषयच नव्हता.)
मी – हो.
मुलगा – (पेपरमधला फोटो बघत) यांचं नाव काय?
मी – नरेंद्र मोदी<br />मुलगा – बाबा, हा राजा चांगला आहे ना?
मी त्याच्या डोळ्यांतल्या आश्वासक नजरेकडे पाहिलं आणि मनात म्हटलं.. असायला पाहिजे बाबा आता..
मी – आत्ताच नाही सांगता येणार.. बघू पुढची पाच र्वष..

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is your leader
First published on: 23-05-2014 at 01:26 IST