विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापन करणे हे भाजपा-सेनेसाठी काही कठीण नव्हते. लोकसभा निवडणुकांनंतर विधानसभेसाठी फार काही करावेही लागणार नव्हते. मात्र अनेकदा अति झाले की, जमिनीपासून दोन अंगुळे वर हवेत असलेला प्रवास पुन्हा जमिनीच्या दिशेने सुरू होतो, तसेच झाले. २०१९ची राज्य विधानसभा निवडणूक सत्तांधांसाठी तर मोठा धडाच असेल.
निवडणुकांच्या आधी भाजपाने मेगाभरतीला सुरुवात केली आणि विरोधी पक्षांमधील हवाच काढून घेतली. बेरजेचे राजकारण म्हणून भाजपाने ज्यांना पक्षात घेतले होते ते काही फार मोठे नेते नव्हते. अनेकांनी तर केवळ आपापली संस्थाने राखणे, चौकशी किंवा कारवाई टाळणे यासाठीच सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाणे पसंत केले होते. ‘आपण म्हणू तेच होणार’ या गुर्मीत सत्ताधारी होते. ही गुर्मीच घातक ठरली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेल्या आणि राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची कारवाई हे निमित्त ठरले आणि हीच खेळी महागात पडली. कारण मुरब्बी आणि मुत्सद्दी शरद पवार यांनी त्याचे भांडवल केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही ठाम उभे राहून त्यांनी विधानसभेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली. त्याचवेळेस त्यांच्या अनेक शिलेदारांनी पक्षावर टीका करून सोडचिठ्ठी द्यायला सुरुवात केली. शोलेमधील ‘थोडे इधर, थोडे उधर’ असे संवाद वापरून सत्तांधांनी पवारांची थेट खिल्ली उडवली. पण निवडणूक निकालांनंतर आता तिथरबिथर होण्याची वेळ सत्तांधांवर आली आहे. स्वतहून ईडीला सामोरे जाण्याचा निर्णय या मुरब्बी राजकारण्याने घेतला आणि नंतर सत्ताधाऱ्यांच्या अडचण पर्वाला सुरुवात झाली. पवार नावाच्या वावटळीने वेग घेतला आणि चक्रवाताचे रूप धारण केले. ऑक्टोबर हिट म्हणजे उकाडा. पण पावसाने लांबवलेल्या मुक्कामामुळे वातावरणात गारवा होता. त्या गारव्यामुळे सत्ताधारी गुर्मीत राहिले; येणाऱ्या चक्रवाताची कल्पनाच आली नाही. या चक्रवाताने सत्ताधाऱ्यांचे मनसुबे पार उधळून लावले. आता पाच वर्षे निर्विघ्न नव्हे तर कसरत करत राज्यभार हाकावा लागणार आहे.
या निवडणुकीत शरद पवारांना कमी लेखण्याची चूक सत्तांधांनी केली. विरोधक आहेतच कुठे किंवा पैलवानच नाहीत तर कुणाशी लढणार इथपतही एकवेळ ठीक होते, पण यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या राजकारणातून पवार पॅटर्न बाद हे विधान मात्र सत्ताधाऱ्यांच्या अंगाशी आले. त्यावर कोणतीच प्रतिक्रिया पवार यांनी व्यक्त केली नाही. त्यांनी त्यांचे लक्ष ढळू दिले नाही. ऐन मोक्यावर पक्ष सोडून जाणाऱ्यांवर त्यांनी प्रच्छन्न टीका केली. पाय रोवून ते उभे राहिले. पक्ष सोडणाऱ्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी सभा घेतल्या. प्रसंगी उदयनराजेंसारख्यांच्या संदर्भात तर त्यांना तिकीट देणे ही चूक होती असे सांगत जनतेची जाहीर माफी मागितली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादापेक्षाही या निवडणुकीत स्थानिक प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि त्यांना बगल देण्यासाठीच राष्ट्रवादाचा उपयोग करून घेतला जातोय हे जनमानसाला पटवून दिले. सत्तेची भाषा काटेकोरपणे टाळली. ही निवडणूक विरोधकांच्या वतीने त्यांनी एकहाती लढली, त्यांना बळ दिले. काँग्रेसची अवस्था तर मृतवत आहे. त्यांनी फारसे प्रयत्नच केले नाहीत. त्यांनी थोडेसे प्रयत्न केले असते तरी आज चित्र खूपच वेगळे असते. त्यांनीही पवार यांच्याकडून धडा घ्यायला हवा. जो ‘पवार पॅटर्न’ मुख्यमंत्री फडणवीस बाद करायला निघाले होते तो पवार नाही तर लढाऊ प‘वॉर’ पॅटर्न आहे, हे या निवडणूक निकालांनी सिद्ध केले.