‘फडणवीसांच्या हाती महाराष्ट्र माझा’ ही दिनेश गुणे यांची कव्हर स्टोरी (७ नोव्हेंबर) वाचली. १५ वर्षांनंतर आघाडी सरकार जाऊन प्रथमच भाजपाचे एकपक्षीय सरकार अधिकारावर आले हे ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ला मतदारांनी दिलेले उत्तर होय! 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची झालेली भरगच्च व्याख्याने व भाजपाला मिळालेली वाढती मतदारांची पसंती हे घटक जरी यशाचे शिलेदार असले तरी मतदारांनी भाजपाला बहुमत दिलेले नाही याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला व स्वत:हून सरकारला पाठिंबा दिला, तर मोठय़ा भावाच्या भूमिकेत रमलेली शिवसेना भानावर येऊन सत्तेत सहभागी झाली तर अस्थिर सरकारचा प्रश्न निकालात निघाला असता, परंतु तसे होणे नाही. कारण निवडणुकीत भाजपा शत्रू नंबर एक मानणे व दर्जाहीन प्रचार करणे या बाबी भाजपाने सहज विसरून जाव्या अशा नाहीत. सत्तेची संधी सोडली तर विरोधी पक्षात राहून भाजपाला सहकार्य करावेच लागेल याची धास्ती सेनेला अस्वस्थ करणारी आहे, म्हणून फडणवीसांना ही स्थिती अनुकूल होऊ शकेल; पण तेथेही जर-तरचे प्रश्न आहेत. त्यांना पक्षांतर्गत विरोध नाही, असे मानणे धाडसाचे होईल. तरीही दिल्लीचा मजबूत पाठिंबा मिळविण्यात त्यांना अडचण येणार नाही हे त्यांच्यासमोरील सर्व आव्हानांचे उत्तर आहे.
आघाडी सरकारचे घाईने घेतलेले निर्णय व सेनेच्या सहभागाची समस्या यावर त्यांना मार्ग काढावा लागेल. अशा सर्व अनिश्चिततेवर भाजप मात करेल अशी स्थिती आहे, कारण काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या तिन्ही पक्षांतील काही आमदारांचा गट (सत्तेकरिता) फुटून भाजपला स्थिर सरकारासाठी कायमस्वरूपी मदत करेल. तथापि असा फुटलेला गट ताब्यात ठेवताना व विकासाचा मार्ग शोधताना त्यांना काही तडजोडी कराव्या लागतील. राज्याच्या मूलभूत समस्या सोडविताना सभागृहाचे सहकार्य घ्यावे लागेल.
सारांश, देवेंद्रांच्या हाती महाराष्ट्र सुरक्षित आहे व महाराष्ट्राचा खरोखर विकास होत आहे, अशी भावना महाराष्ट्रातील तमाम मतदारांमध्ये निर्माण करणे हे मोठे आव्हान ते कसे स्वीकारतात यात त्यांची कसोटी आहे.
नारायण खरे, पुणे.

कोण किती पाण्यात..
‘हातात हात, तरीही मार्ग एकलाच’ ही १४ नोव्हेंबरच्या अंकातील कव्हर स्टोरी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर समयोचित भाष्य करणारी होती. गेल्या २०-२५ वर्षांत राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणातदेखील आघाडय़ांच्या राजकारणांमुळे एकप्रकारची अनागोंदीच माजली होती. सोयीस्कर कारण शोधत एकत्र यायचं मात्र अंतिम लक्ष्य सत्तेतील लोण्याचा गोळा देणारी मंत्रिपद हेच असायचं. परिणामी शासनाचा गाडा चालविताना सगळ्यांचे पाय एकमेकात अडकलेले असायचे. यावेळच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांनी आघाडी युतीचं राजकारण संपुष्टात आणलं हे खरं. प्रत्येकाने स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यामुळे निदान जगाला कळले तरी की कोण किती पाण्यात आहे ते.
अर्थात असे झाले असले तरी पूर्ण बहुमत नसल्यामुळे भविष्यात सोयीस्करपणे वेगवेगळ्या पक्षांचा आधार घेतला जाणार, हे सत्यदेखील टाळता येणार नाही.
अनंत पाटील, औरंगाबाद</strong>

गुरू दत्तना आदरांजली
१० ऑक्टोबरच्या ‘लोकप्रभा’त प्रभाकर बोकील यांनी गुरूदत्तबद्दल लिहिलेला लेख वाचून मनात भावनांचा समुद्र उसळला. प्रतिभाशाली लोकांची समाजाने केलेली उपेक्षा, त्यांना भोगावा लागणारा त्रास, मनात असलेल्या काही इच्छादृश्यांच्या माध्यमातून थेट हृदयाला भिडणारे त्यांचे हे तीन चित्रपट आहेत. ‘साहब, बीबी और गुलाम’ हा चित्रपट विमल मित्र यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यात जमीनदार वर्गाची राहणी, ऐषोआराम, भोगविलास सर्व दिसते.
त्यातील छोटी बहू (मीनाकुमारी)ला फक्त आपल्या नवऱ्याची साथ हवी असते. तिची ती कधी न संपणारी प्रतीक्षा व तो घरी राहावा म्हणून तिचे ते दारूला जवळ करणं, मोठय़ा दिराचा क्रूरपणा व शेवटी पडझड झालेली ती हवेली हे सर्व बघून दर्शक कुठे तरी हरवून जातो.
‘प्यासा’त एका प्रतिभाशाली कवी विजयची दु:खात बुडालेली कथा आहे. त्यांनी रचलेली उत्कृष्ट शायरी, कधी तरी आपल्या रचनांची कदर करणारे लोक भेटतील, ही आशा. मजुरी केल्यानंतर खोटे पैसे देणारा सेठ यथार्थाबरोबर आपला परिचय करवितो. गुलाबो जी प्रत्येक सुख-दु:खात त्याच्याबरोबर असते, मनाला कुठेतरी सुखावते.
‘कागज के फूल’सारखे चित्रपट या जगात मोजकेच असतील. रमेश सिन्हा व शांती यांचे अव्यक्त पण गहिरे प्रेम, वेगळी राहत असलेली व त्याला जराही जाणून न घेणारी बायको, प्रसिद्धीच्या उच्च शिखरावरून घसरलेला रमेश सिन्हाचा शेवट बघून डोळे ओलावतात. ‘लोकप्रभा’बरोबरच माझीही गुरू दत्त यांना आदरांजली.
मीरा रिंगे, नवी मुंबई.

गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक

Sameer
‘गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक’ असल्या लेख आणि चर्चामुळे ‘लोकसत्ता’ हा एक वाचनीय पेपर ठरतो.

Mandar Moghe 
‘गांगरलेली मुलं आणि गोंधळलेले पालक’ हा खूप मोठा लेख आहे; पण सर्व पालकांनी नक्की वाचण्यासारखा.

Shekhar Pandit 
अतिशय मार्मिक. आजच्या धर्माधळ्या, चंगळवादी, अविचारी समाजाला वैचारिक, वैज्ञानिक पातळीवर विचार करायला वेळ नाहीय. गहन सामाजिक विषयांवर चिंतन आणि चर्चा ही गोष्ट आजच्या अति जलद जनमानसात क्षुल्लक आणि बऱ्याच वेळा हास्यास्पद ठरवली जाते. तुमच्या प्रयत्नांबद्दल आभार..

hmk  
वय वर्षे चौदानंतर पालकांनी मुलांना ऋ्रल्लंल्ल्रूं’ २४स्र्स्र्१३ करणं बंद करायला हवं आणि त्यांना स्वतंत्र राहायला सांगायला हवं.

Ashwin
खूप छान, वाचनीय लेख. पालकांना वेळीच विचार करायला लावणारा लेख.

Ganesh 
आजच्या पालकांनी सजग राहून आपल्या पाल्यावर योग्य ते संस्कार करावेत. उदा. आताच आलेला ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ हा सिनेमा पालकांनी आपल्या पाल्याला नक्की दाखवावा. शक्यतोवर त्याला त्याच्या स्पर्धात्मक भविष्याची जाणीव पालकांनी करून द्यावी. आयुष्य सुंदर आहे, ते कशा पद्धतीने जगणार, हे त्याला समजून सांगावे.

हवीहवीशी खाद्ययात्रा
दिवाळीपूर्व अंकाचे औचित्य साधून ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केलेला रुची विशेषांक मनापासून आवडला. या अंकात दिलेल्या ४०-५० रेसिपीज्मुळे दिवाळीच्या काळात नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ तयार करण्याची संधी आम्हाला मिळाली. सणासुदीच्या या काळात नेहमीच्याच खाद्यपदार्थाशिवाय वेगळं काहीतरी हवं असते ते नेमके आणि वेळेवर वैदेही भावे यांनी सादर केल्यामुळे ‘लोकप्रभा’स धन्यवाद.
विशेष म्हणजे वैद्य खडीवाले यांच्या पुस्तकातील रेसिपीज्मुळे रोजच्या जेवणात चांगला आरोग्यपूर्ण बदल मिळू शकला. पोह्य़ाची इडली, पोह्य़ाचे सांदण, पोह्य़ाचे पकोडे, चुरमुऱ्याची कचोरी, सुरण पिठलं भाजी, कडधान्याचा पुलाव या ऑफबीट डिशेस मुळे आमच्या उत्सवाला एक वेगळी चव आली.
दिवाळीच्या निमित्ताने आपण जरी असा रुची विशेषांक प्रकाशित केला असला तरी वर्षांतून एकदा संपूर्ण अंकच खाद्यविशेष असावा अशी अपेक्षा आहे.
निलेश देशमुख, पिंपरी.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers response
First published on: 21-11-2014 at 01:01 IST