डोंगरात भटकताना दर वेळी आधी ठरविल्याप्रमाणे होतेच असे नाही. फडताडासाठी पूर्ण तयारीने गेलो होतो, पण फडताडाचा नव्हे तर पालखीचा योग होता. अर्थात त्यामुळे डोंगरातली ही तडमड वाया न जाता सार्थकीच लागली असं म्हणावं लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिवाळ्यात जवळपास सगळेच वीकेंड सत्कारणी लागल्यानं मी आधीच खूश होतो. अमुक-तमुक ट्रेनिंगच्या कारणानं प्रीती १५ दिवसांसाठी पुण्यात आली होती. साहजिकच भेट झाली. मी आपला निवांत पुणे शहरातल्या माझ्या सर्वात लाडक्या भागात म्हणजे कर्वे रोडच्या सुजाताची सिताफळ मस्तानी नरडय़ातून खाली जातानाचा आंनद घेत होतो आणि अचानक प्रीतीनं पिलू सोडलं, ‘‘वीकेंडला भिकनाळ आणि फडताड करायचा? राजस आणि यज्ञेश येतील गाडी घेऊन’’. विचारात एवढा गुंतलो की उरलेली मस्तानी कधी संपली ते कळलं नाही आणि स्ट्रॉचा फुर्र्रर आवाज आला तेव्हा कुठं खऱ्या अर्थानं विचारमंथन सुरू झालं.

फडताड हे नाव काही माझ्यासाठी आणि तिच्यासाठी नवीन नव्हतं. २००८ मध्ये एकदा स्टुडिओतल्या संजय काकाकडे असताना दिवाकरच्या तोंडी हे नाव ऐकलं होतं. छातीत धडकी भरावी असा तो ट्रेक हे ऐकूनच होतो. एकंदरच कळून चुकलं की जायचंय तर तयारीने जावं लागेल. तसं म्हणलं तर आमच्यासोबत जो एक गडी येणार होता त्यानं हा ट्रेक केला होता. पण त्यानं प्लान ऐकायच्या आधीच माघार घेतली. कुणाच्या पोटात दुखलं तर दुखू दे, जे होईल ते बघू म्हणून आम्ही प्लान कायम ठेवला.

शुक्रवारी संध्याकाळी भेटून मी आणि प्रीतीनं खाण्याचं सामान गोळा केलं आणि ठरल्याप्रमाणं राजस आणि यज्ञेश रात्री कारने पुण्याला आले. पौड रोडपाशी प्रीतीला पिकअप करून ते सगळे मला कात्रजच्या नाक्यावर भेटले. यज्ञेशशी माझी नीट ओळख करून देईपर्यंत आम्ही चेलाडीला पोहोचलो.

राजसला थोडा आराम मिळावा म्हणून चेलाडीपासून प्रीतीनं गाडी चालवायला घेतली. ‘झोपेची वेळ + थंडी + वेल्ह्य़ापर्यंत ठिकठाक असा रस्ता’ या सगळ्या सॉर्टेड-आउट गोष्टींना मात देणारी प्रीतीची ड्रायव्हिंग! डोळा अजिबातच लागला नाही. हसत-खिदळत वेल्ह्य़ात पोहोचलो तेव्हा पहाट झाली होती. गावात कुस्तीची स्पर्धा असल्यानं आदल्या रात्री चपटी न लावलेले सगळे जागे झाले होते. आम्हालाच उशीर झाल्यागत वाटत होतं. आम्ही गडबड करणाऱ्यातले नाही हे त्यांना जाणवलं असावं. आम्ही काही तासभर तिथून हललो नाही. चहा आणि क्रीमरोल पोटात कोंबून आम्ही पुढं निघालो.

कानंद खिंडीजवळ झालेलं स्वर्गीय नर्तकाचं दर्शन, अभेद्य दिसणारा तोरणा, हवेतला गारवा आणि चांडाळचौकडी.. सगळं काही मनासारखं. गाडी पाच मिनिटं बाजूला थांबवून विशेष वटवट न करता आम्ही सगळेच नि:शब्द होऊन निसर्गाची उधळण टिपत होतो. उगाच ट्रेक मारणं, घाटवाट उडवणं असल्या गप्पा नाहीत, घडय़ाळाशी स्पर्धा नाही.

पासली फाटय़ानंतर अतिशय सुमार अशा रस्त्यानं गाडी जपून चालवत आम्ही कुसरपेठेत आलो. एका जीपमध्ये गावातली चिल्लर पार्टी रंगबिरंगी कपडे घालून बसली होती. वेल्ह्य़ाच्या जत्रेत जायची उत्सुकता दिसत होती. एरवी गुरापाठी बिनधास्त भटकणारी, झाडाच्या अंगाखांद्यावर खेळणारी किंवा शहरातली पोरं कायम वंचित राहतील असे नाना प्रकारचे खेळ खेळताना दिसणारी ही कारटी आज पावडर फासून, तयार होऊन जाताना किती वेगळी वाटत होती.

गावातल्या थोरल्या मंडळींना विचारून सावलीच्या जागी गाडी ठेवली. कुसरपेठेतून भिकनाळेचा साधारण अंदाज मला होता, तरी आम्ही गावात थोडी चौकशी केलीच. फाटय़ा आणण्यासाठी मावशी त्याच बाजूला निघाल्या होत्या, मग आम्ही त्यांच्यासोबतच निघालो. सिंगापूरच्या दिशेनं थोडं पुढे जाऊन धुत्या हाताला वळलात की एक पत्र्याचं खोपटं दिसतं, त्याच्या समोरच एक विहीरवजा डबकं खोदलं आहे. पाणी पिण्यालायक आहे. कोवळ्या उन्हामुळं गारठा जरा कमी झाला होता.

छाताड काढून उभा असलेला लिंगाणा, त्यापल्याड लिंगाण्यापेक्षा इंचभर डोकं वर काढून बोराटय़ाच्या नाळेला बगलेत मारून मिरवणारं रायलिंग, समोरच्या बाजूला रायगड, अन् नजर डावीकडे भिरकवली की रानापलीकडं आ वासून बसलेल्या भिकनाळेचा कडा दिसायला लागला. उजव्या हाताला थोडं पुढे पोटाशी आग्यानाळ.

पुढे बैलगाडीची चाकोरी सोडून डावीकडे वर कारवीत शिरलो, अन् मग तसंच छोटी दरी डावीकडे ठेवून सोंडेवर चालत गेलो. साधारणत: ३५-४० मिनिटं. तशी विशेष चढण नसलेल्या डोंगरसोंडेवर पायपीट केल्यावर उजवीकडल्या कारवीच्या दाट जाळीमागे फडताडकडून येणाऱ्या वाटेजवळ मावशीने आम्हाला सोडलं आणि त्या माघारी गेल्या. मी या जागी दीडएक वर्षांपूर्वी आलो होतो. समोरच कडय़ापलीकडे भिकनाळ आणि तिच्या तोंडाशी असलेली दाट कारवी. घसा ओला करून आम्ही परत डावीकडे कारवीत शिरलो. एका ढोरवाटेवर थोडं उतरून एका छोटय़ा आणि कोरडय़ा मिऱ्यापाशी येऊन थांबलो. नाळीच्या आत शिरायला वाट मिळते का हे पाहायचं होतं. प्रीती आणि यज्ञेश थोडं पुढे पाहायला गेले आणि मी आणि राजस कारवीत शिरलो. दोनच मिनिटांत कारवी ओलांडून नाळेच्या तोंडाशी पोहोचलो. प्रीती आणि यज्ञेशला हाळी दिली.

पोटातल्या कावळ्यांचा ऑपेरा ऐकू यायच्या आत वाटेच्या सुरुवातीलाच टेकायला सोयीस्कर अशी सावली पाहून नाश्ता करून घ्यायचा ठराव बिनविरोध मंजूर झाला. मग ब्रेड, बिस्कीट, चिवडय़ापाठोपाठ खजूर पोटात ढकलले आणि आम्ही निघालो. तासभर कधी आणि कसा गेला ते कळलंच नाही, पण मग उत्तराभिमुख असल्यानं नाळेत दिवसभर सावली राहणार हे साहजिक होतं, आणि जमेची बाजू अशी होती की आजचा मुक्काम पणदेरी गावात होता, त्यामुळे वेळेचं विशेष बंधन नव्हतं. उगाच हाणामारी करत उडय़ा मारत जाणे हा प्लॅनच नव्हता.

‘एकच पायवाट’ असं काही कौतुकास्पद प्रकरण ते नव्हतंच. उन्हाळ्यातही चिवटपणे तग धरून असलेली बोचरी झुडपी आणि निसटणारे दगड ह्य़ातनं वाट काढत, अनेकदा मिसकॉल देत आम्ही खाली उतरत होतो. बुटाच्या तोंडाशी, मोज्याच्या लोकरीत, पँटच्या पायाशी अडकणारी रावणं आणि काटाळं झटकत साधारण अध्र्या तासात आम्ही एका मोठय़ा धोंडय़ापाशी आलो. त्या पलीकडची उडी पाहता सॅक पाठीवरून काढून खाली ठेवली. रोप आणि बाकीचं सामान बाहेर काढलं. थोडं वरच्या बाजूला योग्य जागा पाहून आम्ही रोप बांधला आणि यज्ञेशला खाली सोडलं. त्या पाठोपाठ राजस आणि प्रीती मग मी. पॅच संपतो तिथंच कोपऱ्यात एक माणूस पद्धतशीर फेरी मारून येईल एवढी नैसर्गिक गुहा आहे. ती गुहा म्हणजे वटवाघुळांचं आगार! बॅटमॅनमधल्या बेल भाऊसारखं आम्ही डोकं खाली वाकवून रोप गुंडाळून बॅगेत भरला आणि निघालो.

जसं थोडं खाली आलो तशी नाळ रुंद झाली. झाडी-काटकी वाढली, तरी उतार काही मंदावेना. तसंच टप्पे उतरत आम्ही खाली जाऊ लागलो. वाटेत एका ठिकाणी थबकलो. समोर उडी टाकायला ६० फुटाचा कडा आणि इथं पडी टाकायला आणि उदरभरणाला मस्त सावली!  ते ‘वदनी कवळ घेता’ राहिलं बाजूला आणि आमच्या पैजा चालू झाल्या त्या समोरच्या नाळेवर. मी ठाम होतो की त्यात वाट असणार! समोरच्या अभेद्य वाटणाऱ्या कडय़ाला माणसाच्या अचाट इच्छाशक्तीनं कुठंतरी भेद दिला असावा असं वाटत होतं. पोळ्या, लसूण-शेंगदाण्याची चटणी, दही, गोडलिंबू आणि खजूराचं लोणचं आणि मग त्यावर गूळ-खवा पोळी असं जेवण आणि मग त्यावर ताक असं सगळं पोटात ढकलल्यावर आमची आळशी गाढवं झाली. सॅकला पाठ टेकवून आम्ही परत नाळ चर्चेत आणली.

यज्ञेश आणि माझं एकच म्हणणं, वाट असणार, वर एखादा पॅच असणार. प्रीती, राजस आणि यज्ञेशचं मत असं होतं की, खाली जाऊ गावात, थोडी विचारपूस करू म्हणजे नक्की काय ते कळेल.

आता खाली जाण्याचा मार्ग शोधणं गरजेचं होतं. मी उजवीकडे शिरलो तर यज्ञेश एक टप्पा उतरून खाली गेला. बराच आटापिटा केल्यावरसुद्धा मला वरून वाट मिळाली नाही. मग यज्ञेशने आम्हाला हाक दिली आणि आम्ही तिघे तो टप्पा उतरून यज्ञेशपर्यंत गेलो. उजवीकडे दिसणाऱ्या कडय़ाखालच्या घळीत आम्ही पोहोचलो. वाट शोधायला गेल्यावर कारवी आणि ऊन्हामुळे जो काही छळ झाला होता, त्यानंतर मोकळ्या घळीत येऊन हायसं वाटलं. पुढे गावात पोहोचणं काही विशेष अवघड नसलं तरी बराच पल्ला बाकी होता.

मग विशेष घाई न करता आम्ही निवांत खाली उतरत गेलो. नाळेत असल्याने इथे-तिथे भरकटण्याचा प्रश्नच नव्हता. थोडं पुढे राहून मी आपला सुपर मारिओ खेळल्यागत उडय़ा मारत मारत सावली हेरायचो आणि डुलकी काढायचो. जसं खाली आलो तसं मग आम्ही अजूनच निवांत झालो. मध्येच एका ठिकाणी एकाच कुटुंबाची वस्ती लागली. हे लोक सगळ्यात बेकार. एकाच पट्टय़ातली झाडं उभीच्या उभी तोडतात, पेटवतात आणि त्यावर माती-वाळू दाबून धूर करतात. त्यातनं कोळसा होतो. जंगलातले अख्खेच्या अख्खे पट्टे गायब करणारे हे लोक. सद्य परिस्थिती पाहता जिवंत झाडातून असा कोळसा काढणं पर्यावरणाच्या आणि विशेषत: वन्यजीवासाठी किती नुकसानदायी आहे, तसंच ते कितपत महाग पडेल हे सांगायची गरज नाही.

त्यांना उचक्या देत, आम्ही तासाभरात पणदेरी गावाशी पोहोचलो. साडेपाचच्या सुमारास पोहोचल्यानं शेताची कामं संपवून गावाबाहेर निवांत बसलेला बळीराजा. त्यांच्याशी वाटेबद्दल विचारपूस केली आणि भिकनाळेतून दिसलेल्या ‘त्या’ वाटेवर शिक्कामोर्तब झालं. गावात क्रिकेट खेळत असणाऱ्या पोरांमध्ये जाऊन चार पट्टे फिरवायचा मोह आवरून सरपंचांच्या घराकडे निघालो. त्यांनीही वाट असल्याच्या दाव्याला दुजोरा दिला. शाळेत मुक्कामाची परवानगी घेऊन आम्ही पुन्हा उरलेल्या दोन कारटयांपाशी आलो.

सरपंचांना भेटल्यानंतरही आम्ही गावात बऱ्याच लोकांकडे पालखीच्या वाटेबद्दल चौकशी केली. मोहिते काकांच्या ओसरीत त्यांच्याशी गप्पा मारताना बरीच माहिती मिळाली. लोकांच्या सांगण्यानुसार त्या वाटेनं कोणे एकेकाळी मंदिरासाठी मोठे लाकडी वासे ओढून नेले होते. वासे ओढून नेण्याइतपत मोठी वाट असावी अशी अपेक्षाच नव्हती. पण सह्य़ाद्रीत अशा अनेक अजब-गजब वाटा आहेत जिथून वाट असणं अशक्य वाटतं, पण वाट असतेच! खेतोबा काय, पाथरा काय किंवा चिपाचं दार काय.. अशी बरीच उदाहरणं देता येतील.

बोलता बोलता आम्ही मोहिते काकांना सांगितलं की आम्ही खरंतर फडताडने वर जायचा प्लान केला होता; पण आता ती भिकनाळेतून पाहिलेली वाट करायची असं ठरलंय तेव्हा त्यांनीही सांगितलं की साधारणत: महिन्याभरापूर्वी पालखीच्या नाळेनं काही लोक आले होते. त्यांच्या आणि अनेक गावकऱ्यांच्या मते भर उन्हात फडताड करण्यात जोखीम होती, त्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान प्लान करणं योग्य होतं. एकंदरच आजच्या घडीला पालखीची वाट करणं कधीही योग्य होतं. त्यात आम्हालाही नवीन वाटेचं आकर्षण होतंच. फडताडसाठी एवढी वर्षं वाट पाहिली होती, अजून थोडी कळ काढायला हरकत नव्हती.

मोहिते काकांनी गावातल्या एका दादाला सोबत देऊन मला एकाच्या घरी पाठवलं. त्यांना तिथल्या साऱ्या वाटा माहीत होत्या. ते जर वाट दाखवायला आले असते तर सगळंच सोईचं झालं असतं. बराच आटापिटा करूनदेखील त्यांची मजुरी दोन हजाराखाली येईना. ते आम्हाला परवडणारं नव्हतं. मग आम्ही शाळेत थांबलोय, विचार बदललात तर सकाळी या सहाला असं सांगून तिथून निघालो. रात्रीसाठी पटकन जेवण उरकून दुसऱ्या दिवशीसाठी पाणी भरून घेतलं, आणि पडी टाकली. विशेष थंडी नव्हती, शाळेच्या आवारात असल्यानं स्वत:ला फटके मारायची गरज नव्हती. नेहमीच्या सवयीप्रमाणं मी दोनच्या दरम्यान का होईना, पण झोपलो.

पहाटे पहाटे टीव्हीवर योगासनाचं च्यानल लावल्यागत काहीतरी आवाज आले आणि मला जाग आली. पाहतो तर राजस योगासनं करत होता. हे बेणं पहाटे योगा करतं आणि मग दिवसभर कितीही पळवा चार पावलं पुढे पळतं.

निघायला सात वाजले. वाट दाखवायला मामा काही आले नाही. मग स्वत:च बघून घेऊ  म्हणून आम्ही गावाबाहेरची वाट धरली. कोळसेवाल्यांच्या वस्तीपर्यंत कालच्याच वाटेने जायचं होतं. कोरडय़ा नाळेतून जाताना गुडघ्याच्या वाटय़ा करकरतात आणि मांडय़ा बोंबलतात. म्हणून तिथून पुढे नाळेनं वर जाण्याऐवजी आम्ही डावीकडल्या सोंडेवर चढून मधल्या पट्टय़ातल्या जंगलातून त्या छोटय़ा धारेवर चढायचं ठरवलं. कोळसेवाल्यांच्या वस्तीपाशी वर जायची वाट विचारली असता त्यांच्यातला एक दादा थोडं वर वाट दाखवायला तयार झाला. दादा, त्याचा अबोल साथीदार आणि चार-पाच कुत्री. त्यांच्यापाठी चालून, खरं सांगायचं झालं तर पळून आमचीच गत कुत्र्यासारखी झाली होती.

काही ठिकाणी अरुंद आणि पुसट अशी ती पाऊल वाट. दादाच्या सांगण्यानुसार तीच वाट फडताडला जाण्यासाठीही वापरली जाऊ  शकते, हे कळल्यावर त्यांना तीही वाट विचारून घेतली. दादाने जे काही हातवारे केले त्यातनं जमेल तेवढं डोक्यात भरलं.

पुढे थोडं चढून आम्ही कातळकडय़ाच्या खाली मधल्या गचपणात उजवीकडे वळलो. डुकराच्या शिकारीसाठी केलेला चर ओलांडण्यासाठी बरेच द्राविडी प्राणायाम करावे लागले. ते करून आम्ही पदरातल्या रानात शिरलो. गच्च रान, मोठमोठी झाडी. इंजिन आधीच तापलेलं असल्यानं आणि त्यात तिथं दाट पण उंच झाडी असल्यानं तो सुखद पट्टा पार करायला विशेष वेळ लागला नाही. त्यात तिथं झाडीत एका कारची चावी मिळाल्यानं विशेष वापरात नसली तरी आपण योग्य वाटेवर असल्याची खात्री झाली.

रानातून पालखीची नाळ सोडा, एवढी मोठी भिकनाळ पण दिसत नाही. जंगलातून बाहेर आलो की थोडं उजवीकडे जायचं आणि घळ लागली की गोटे आळीत न जाता डावीकडे वर चढायचं. त्यात नेमकी वाट हुकली की तुमचा बोऱ्या वाजलाच म्हणून समजा. तिथं दादा थोडं वर चढून गेले आणि वर चढल्यावर खाली येता येईना म्हणून त्यांचं श्वानपथक ओरडू लागलं.

आमच्यातल्या दोघांना नाळेत शिरायची जागा दाखवली, कुत्र्यांना खाली वाटेला लावलं आणि त्यांची रास्त मजुरी घेऊन दादा खाली निघून गेले. ‘वाट’ म्हणायला तसं फारसं काही नव्हतंच तिथे, पण ‘वाट’ लागायला बरंच काही. भर उन्हात त्या वाटेनं जायचं म्हणजे शिक्षा! स्क्रीचे दोन खडे पॅच चढून एका झुडपापाशी आम्ही विसावलो. नरडं ओलं करून पुन्हा निघणं जिवावर आलं होतं पण तिथं बसून उन्हानं काहिली करून घेण्यात काही हशील नव्हतं.

मग पुढे यज्ञेश, मग प्रीती आणि राजस आणि गरजेनुसार मध्ये किंवा शेवटी मी असा कॉन्वॉय वरवर सरकू लागला. पुढे आणि एक छोटा पॅच आणि दोन एक्स्पोज्ड ट्रॅवर्स पार करून आम्ही नाळेत पोहोचलो. नाळेची लांबी जास्त नसल्याने नाळ कमी खिंड जास्त वाटली ती. बरीच हाणामारी करून झाली असल्यानं आणि वरची झाडी नजरेत आल्यानं आपण वर पोहोचल्यात जमा आहोत असं गृहीत धरलं आणि जेवण उरकायचं ठरवलं.

जेवणाचा कार्यक्रम गप्पा रंगल्यानं दीड तास चालला. मी, प्रीती आणि राजस बऱ्याच वर्षांनंतर एकत्र ट्रेक करत होतो, त्यामुळे बरेच किस्से ऐकले- सांगितले गेले. कसलीच घाई नव्हती. शेवटी साडेचार वाजता आम्ही तिथून निघालोच. पंधरा मिनिटे वर चढून आलो आणि जसजसं वर आलो तसतसं एक-एक करत चार बोटं तोंडात घालायची वेळ आली. समोर ५० फुटांचा खडा पॅच. मग मात्र इशारे झाले की झाला तो टाइमपास पुरेसा आहे, आता कामाला लागा.

इथून-तिथून मिथुन झाल्यावर चढायला योग्य जागा पाहून यज्ञेश वर चढू लागला. यज्ञेशच्या हालचालीतला द्राविडी प्राणायाम पाहता पॅच तसा अवघड वाटला. जे धरेल ते निसटून हातात येत होतं. यज्ञेश वर पोहोचला आणि त्यानं रोप लावला. पण यज्ञेश गेला तिथून वर जाणं म्हणजे जरा अवघडच होतं म्हणून मी थोडं बाजूने जिथं कातळ होता तिथून प्रयत्न केला आणि वर गेलो.

हा खटाटोप उरकेपर्यंत अंधारून आलं. नाळीच्या तोंडाशी उजेड असला तरी अजून बरंच अंतर कापायचं होतं, आणि बाकीचे दोघे व सामान वर येता येता काळोख होणं साहजिक होतं. त्यात उल्हास म्हणजे मी वर आलो तिथं रोप बांधायला जागा नव्हती आणि रोप आहे त्या ठिकाणी ठेवून मी चढलो तसं चढताना जरा गडबड झाली की झोपाळा झालाच म्हणून समजा. मग मी थोडं खाली उतरून सेल्फ-अरेस्टसाठी छानशी जागा निवडली आणि रोप फिरवून घेतला. आधी दोन सॅका वर घेतल्या. मग प्रीती आणि उरलेल्या दोन सॅका वर आल्या. त्या वर ओढताना आई आठवली आणि लगेच वाटून गेलं की गंज चढता कामा नये, या असल्या आडवाटेची सवय असलीच पाहिजे. राजस अंधारातच वर आला. सगळा सेट-अप व्यवस्थित सॅकमध्ये जाईपर्यंत आठ वाजले होते. तसं म्हणावं तर पालखीची वाट झाली होती आणि आम्ही खूश होतो.

घाटमाथ्यावर आलो तरी अजून गंमत बाकी होतीच. रात्री त्या कारवीतल्या गच्चपणातून कुसरपेठ ते मोठय़ा नाळेच्या वपर्यंत आलेल्या धारेवर येणं म्हणजे छळ होता. पण मी आधी तिथं वरवरचं तीन वेळा भटकल्यानं मला नेमकी वाट माहीत नसली तरी दिशेचा अंदाज होता.

शेवटी अंधारात कारवीच्या दाट जाळीतून मारामारी करत आम्ही एका सपाटीला आलो. इथून पुढे वाट मला नक्की माहीत होती. मग, दुपारचं खाणं पार जिरलं असल्यानं आम्ही तिथं निवांत बसून खजुरावर ताव मारला. दमछाक झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक होतं. उशीर तर झालाच होता, पण आता धावपळ करण्यात काही हशील नव्हतं. तसंही असे ट्रेक करताना आपण उगाच घाई करत येण्यात अर्थ नाहीये हे माझं वैयक्तिक मत. पण मग चारही डोकी एकाच विचाराची असली की घडय़ाळ पाहत ट्रेक ‘मारण्या’पेक्षा निवांत गप्पा मारत खोल दरीत दिसणाऱ्या टिमटिमत्या लाइट पाहण्यात भरपूर काही हशील होतं. आम्ही तसंही पुण्यात पहाटेच जाणार होतो. त्यात चांदोबा पण साथीला होताच.

रमतगमत आदल्या दिवशी सकाळी आलो त्याच धारेवरच्या वाटेनं आम्ही रात्री बारा वाजता कुसरपेठेत आलो. काणंद खिंडीच्या अलीकडे एका छानशा जागी गाडी थांबवून झोप काढली आणि पहाटे पुण्यात. फडताड साठीचा योग येणं गरजेचं झालं होतं. मात्र आजच्या तडमडीतनं पालखीचा योग आल्यामुळे ही तडमड सार्थकी लागली होती.
प्रसाद तांदळेकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व ट्रेकर ब्लॉगर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trekker blogger palkhi phadtada