वेगवेगळ्या मासिकांमधले म्यानमारचे फोटो पाहून म्यानमारविषयी मनात कुतूहल होतं. ‘मेरे पिया गये रंगून, वहाँ से किया है टेलीफून, तुम्हारी याद सताती है,’ या गाण्याने तर कधीचं रंगूनविषयी आकर्षण निर्माण झालेलं होतं. पाहता पाहता एके दिवशी खरंच रंगूनमध्ये येऊन थडकलो. पण आता ते रंगून नव्हे, तर ते आहे यांगॉन. म्यानमारचे सर्वात मोठे शहर व व्यापारी केंद्र. त्याला अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. बुद्ध धर्माचा उदय आपल्याकडे असला तरीही प्रामुख्याने पसरला व स्थिर झाला तो जपान, तिबेट, चीन, भूतान, थायलंड, कंबोडिया, लाओस, श्रीलंका व म्यानमारमध्ये. आपल्याकडील लडाख व तिबेट येथील बुद्धधर्म महायान पंथातला तर इथला थेरवादी. अकराव्या शतकाच्या अखेरीस कंबोडिया येथील ख्मेर राजवटीला उतरती कळा लागली आणि इथे बुद्ध धर्म जोर धरू लागला. त्या काळच्या राजांनी कंबोडियाच्या आँकोर वॉटच्या तोडीचे धम्मायनजी हे मोठे देऊळ बांधले. येथे बगो, पगान म्हणजे सध्याचे बगान, मँडले, इन्वा अशा अनेक भागांत शान, मॉन, प्यू, काचीन, कारेन व बामर अशा वेगवेगळ्या बारा जमाती होत्या. इरावडी, यांगान नदीच्या सुपीक खोऱ्यात शेती समृद्ध होती. एवढेच नव्हे तर मूल्यवान रत्नांच्या खाणीबरोबरच इरावडी नदीच्या पात्रातही सोने मिळू लागले. त्यामुळे भारत, मंगोलिया, तिबेट, कंबोडिया अशा सर्वच दिशांनी लोकांनी येण्यास सुरुवात केली.
आम्हाला सांगितलेला इतिहास तेराव्या शतकापासूनचा. अठराव्या शतकापर्यंत त्यांच्याच वेगवेगळ्या जमातींचे राज्य होते. तेथील मॉन राजवटीतला मिंडॉन राजा हा शेवटचा. अठराव्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने शिरलेले इंग्रज इथे अठराव्या शतकापासून १९४८ पर्यंत राज्य करत होते. त्यानंतर हा देश लष्करी राजवटीत होता. त्यांचा बाहेरच्या जगाशी संबंधच नव्हता. स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने इंग्रजांनी दिलेली नावे टाकून पुन्हा शहरांना जुनी नावेच दिली. जसे बर्माचे युनियन ऑफ म्यानमार, रंगूनचे यांगॉन, मँडलेचे मंडाले.
यांगान येथे पाहण्यासारखे म्हणजे तॉक्यन वॉर सिमेट्री, सुले पॅगोडा, बोतोताँग पाया, कांडुगी लेक. शिवाय बरीच देवळं आहेत. वॉर सिमेट्रीमध्ये दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या जगभरातील २२ हजार सैनिकांची नावे आहेत. आपल्या भारतीयांची नावे वाचून आमचे हात आपोआपच जोडले गेले. बोतोताँग पाया येथे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धांचा केस आणला होता. त्या वेळी हजार सैनिक पहारा देत होते, म्हणून त्या जागेला हे बर्मीज् नाव देण्यात आले. या देवळाची रचना अष्टाकृती असून कमलदलाप्रमाणे दिसते.
कधी काळी अवकाशातून उल्का पडून येथे १५० एकर व्यासाच्या विवरात कांडुगी लेक झाला आहे. सूर्यास्तावेळी श्वेडगान पॅगोडाचे त्यात पडलेले प्रतिबिंब छानच दिसते. किनाऱ्यावर बाहेरील बाजूस छानसे लॉन असून फुलझाडांची मांडणी फार कल्पकतेने केलेली आहे, तर दुसरीकडे सोनेरी रंगाचे पक्ष्याचे तरंगते रेस्टॉरंट आहे. तेथे वेगवेगळे कार्यक्रम होतात.
सुले पॅगोडा हे यांगानमधले मध्यवर्ती ठिकाण. त्याभोवती शहर वसत गेले आहे. यांगान येथील सर्व रस्ते पॅगोडापासूनच सुरू होतात. बुद्धांचा केस असलेले हे सुवर्ण मंदिर १५१ फूट उंचीचे आहे. चौथरा अष्टकोनाकृती असून घंटेच्या आकाराचा पॅगोडा आहे. ब्रिटिशकालीन इमारती व हायकोर्ट, म्युझियम यांच्या सान्निध्यातले हे देऊळ संध्याकाळी दिव्यांनी झगमगते रस्त्यावर भरपूर दुकानं, फेरीवाले व खाद्यपदार्थाच्या गाडय़ा व त्याचा आस्वाद घेण्यासाठी फुटपाथवरच खवय्यांची गर्दी असते. या सर्व कार्यक्रमाने संध्याकाळी आसमंत अगदी गजबजून गेलेला असतो. म्यानमारमध्ये सर्वच प्रांतात खाद्यपदार्थ रस्त्यावर बसून खाण्याचे प्रमाण भरपूर आहे.
यांगान नदीकिनारी से ता मित् पाया येथे चायना येथून आणलेल्या बुद्धाच्या दाताची प्रतिमा सुंदरशा रत्नजडित कुपीमध्ये ठेवलेली आहे. नदीकिनारी हजार सैनिकांच्या देखरेखीत हा अवशेष होता म्हणून त्याला से ता मित् असे बर्मीज् नाव आहे.
यांगॉन येथून क्याईक्तो येथे जाताना ८० कि. मी.वर आपल्याला बगो, पूर्वीचे पेगु, हे गाव लागते. येथेही यांगॉनच्या श्वेड्गानसारखाच उंच श्वे मॉ डॉ पाया आहे. मॉन राजवटीत हे भरभराटीचे गाव होते. राजघराण्यातील दोन भावांनी स्थापलेली ही राजधानी होती. येथेही बुद्धाचे दोन केस आणि दात ठेवलेला आहे. त्याच काळात बनलेला श्वे था लिआँग पाया येथे भेट दिलीच पाहिजे. या देवळात महानिर्वाणापूर्वी सायंकाळी पहुडलेला असा गौतम बुद्धाचा ५५ मी. लांब व १६ मी. उंच सोनेरी पुतळा आहे. तसाच ८३ मी. लांबीचा पुतळा श्वे था लिआँग पाया येथे आहे. तो अगदी अलीकडचाच म्हणजे २००१ सालचा आहे. पण येथील पुतळा उघडय़ावर आहे. दोनही ठिकाणी सजावट अति उत्तम आहेच, शिवाय बुद्धाच्या पायावर १४४ वेगवेगळी चिन्हे आहेत. त्याभोवती फिरताना उन्हाने तापलेल्या फरशीमुळे पायाला चटके बसतात.
गौरी बोरकर
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2015 रोजी प्रकाशित
पॅगोडांच्या देशात…
बर्मा किंवा म्यानमार म्हटलं की आपल्याला मंडालेचा लोकमान्य टिळकांचा तुरुंगवास, आँग सान सू की या नेत्या आणि जुन्या हिंदी सिनेमात गाजलेलं ‘मेरे पिया गये रंगून’ हे गाणं या तीन गोष्टी हमखास आठवतात.
First published on: 17-04-2015 at 01:05 IST
मराठीतील सर्व पर्यटन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Travel to myanmar