२५ ऑक्टोबरच्या पुरवणीमध्ये ‘बलबीर टिक्की’ या नावाची कथा विज्ञानकथा म्हणून छापली आहे. ‘बलबीर टिक्की’सारख्या कथांमुळे विज्ञानकथा हा कथाप्रकार बदनाम होतो आहे असं विज्ञानकथांच्या एक अभ्यासक आणि वाचक म्हणून मला वाटतं. या कथेत कुत्र्याच्या मेंदूतल्या पेशी मानवी मेंदूत टोचल्यामुळे पोट सुटलेला बलबीर सहा सेकंदांत १०० मीटर लागोपाठ दोनदा पळतो असं म्हटलंय. मेंदूत बदल घडवणं समजा शक्य आहे असं गृहीत धरलं तरी स्नायू जर बलवान नसतील आणि त्यांना सराव नसेल तर मेंदूत कितीही बदल घडवला तरी त्याचा जलदगतीनं धावण्याकरिता उपयोग होणार नाही. ती व्यक्ती पहिल्या धावण्यातच खाली पडेल. कारण पायांच्या स्नायूंना सतत सरावाने तयार केल्याशिवाय अशा वेगाने धावणं शक्य नाही. त्या व्यक्तीच्या स्नायूंमध्ये लॅक्टिक आम्ल वाढून पायात गोळे येतील. एवढंच नव्हे तर अतिश्रमाने कदाचित हृदयविकाराचा झटकाही येईल. कुठल्याही अ‍ॅथलेटिक तज्ज्ञाला किंवा क्रीडा-वैद्यकतज्ज्ञाला विचारून याची खात्री करून घेता येऊ शकेल. अशा चुकीच्या विज्ञानतत्त्वावर आधारित कथा ‘विज्ञानकथा’ म्हणून प्रसिद्ध करण्याने या लेखनप्रकाराचं खूप नुकसान होऊ शकतं, म्हणूनच हा पत्रप्रपंच.
– निरंजन घाटे, पुणे
एलकुंचवारांचा उद्बोधक लेख
ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी आपल्या ‘लोकरंग’मधील लेखात जीवनानुभव आणि जीवनमूल्ये यांचे महत्त्व पटवून देताना लेखकाने पाळावयाची पथ्ये, नाटकाचे व्याकरण इत्यादीसंबंधी केलेले मुक्तचिंतन अतिशय उद्बोधक आणि नवोदित लेखकांना उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे होते. तसेच ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांचे ‘गगनिका’ हे सदरही जुन्या काळातील महत्त्वाच्या रंगकार्याचा मागोवा घेणारे, नाटकाच्या निर्मितीत आणि नंतर त्याच्या प्रत्यक्ष वाटचालीत येणाऱ्या नानाविध अडीअडचणी आणि त्या- त्या वेळी संबंधितांनी त्यातून काढलेले मार्ग, त्यासाठी उपसलेले अपार कष्ट यांची वाचनीय सैर घडविणारे आहे. लेख वाचून अशा व्यक्तींबद्दलचा आदर अधिकच द्विगुणित होतो. दासू वैद्य यांचे ‘यमक-गमक’ हे सदरही माणसांचं मन समृद्ध करणारं आहे.
– कुमुद राळे, पुणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे घडणे केवळ अशक्य !
दिनेश गुणे यांचा ‘हे चित्र भारतात कधी दिसणर?’ हा लेख वाचला. प्रामाणिकपणे व परखडपणे या प्रश्नाचे उत्तर कितीही सकारात्मक होऊनही ‘कधीच नाही’ हेच द्यावे लागेल. आपल्याकडे पदपथ नाहीत. माणसांना रस्त्यावर चालण्याचा हक्क नाही. मग ते सायकल कशी चालवणार? लंडनमध्येच काय, पण पाश्चिमात्य देशांमध्ये काही कारणांनी वाहतूक ठप्प झाली तरी तास- दोन तासदेखील मोटारी व्यवस्थित अंतर ठेवून, मुख्य म्हणजे हॉर्न न वाजवता शांत असतात, हेच कौतुकाचे आणि सहनशीलतेची परिसीमा गाठणारे आहे. आपल्याकडे असे कधी होईल का? फक्त दोघे वाहनधारक जरी रस्त्यावर जात असतील- आणि पुढचा थांबला तर लगेच मागचा हॉर्न वाजवून निषेध व्यक्त करेल. ळ१ंऋऋ्रूो१ छल्लल्लि चे शशी वर्मा आपल्याकडे मुंबई, दिल्लीसारख्या शहरांत वाहतूक व्यवस्थेत स्वयंशिस्त येण्याचे स्वप्न पाहतात. पण ते स्वप्नच राहील. मोदींनी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना मांडली आहे. पण त्याचा अर्थ मोदींना तरी माहीत आहे का? उगीच लोकांना फसवे शब्द देऊन वेळ मारून न्यायचे, हेच त्यांचे काम!
– डॉ. सी. बी. मगदूम, विटे, सांगली.

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Letter to editor lokrang