आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आघाडीचे नेतृत्व करावे, असे काँग्रेसमधून कुणीही सांगितलेले नाही, ते स्वतच तसे सांगत असावे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या वेळीही एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील, असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला उधाण येताच मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दिल्ली गाठली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. राज्यात नेतृत्वबदल नाही, मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढविल्या जातील, असे पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडून मुंबईला परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधून पक्षश्रेष्ठींनीच नेतृत्वबदलाबाबतची राजकीय अनिश्चितता संपविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
 दिल्लीत सोनिया गांधी, राहुल गांधी व अन्य वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक कशा प्रकारे लढवायची, कोणते मुद्दे घ्यायचे, यांवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांच्या वेळी कुणी किती जागा लढवायच्या, कोणत्या जागांची अदलाबदल करायची,  अशी चर्चा होत असते. परंतु त्याबाबत केंद्रीय स्तरावरील समितीत वाटाघाटी होतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अर्थात जागा वाटपाची जाहीर चर्चा करायची नसते, अशी कोपरखळीही त्यांनी अजित पवारांना मारली.
स्फोटामागे दहशतवादी?
पुण्यात गुरुवारी झालेल्या स्फोटाचा तपास पोलीस करीत आहेत, स्फोट घडविण्यामागचा हेतू काय, याचीही चौकशी केली जात आहे, या स्फोटामागे दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.