लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला चोहोबाजूने घेरले गेले आहे. स्वपक्षीय आणि मित्रपक्षही पराभवाबद्दल नेतृत्वाला दोष देऊ लागले आहेत. राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावण्याची संधी स्वपक्षीयांनी सोडली नसतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेस नेत्यांची इंग्रजीतील भाषणे पराभवास कारणीभूत ठरल्याचा शोध लावला आहे.
दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांवर फोडले. त्यावर देवरा हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. देवरा व्टिटरच्या माध्यमातून एखादी भूमिका मांडायचे आणि नंतर राहुल गांधी त्यावर अधोरेखित करायचे हे अनेकदा घडले आहे. देवरा हे सुद्धा गांधी यांचे निकटवर्तीय होते, असेही मलिक यांनी म्हटले आहे.  काँग्रेसच्या वाईट कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार, ममता बँनर्जी या एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांनी पुन्हा पक्षात परतावे, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी मांडले असले तरी सिंग यांचे हे मत राष्ट्रवादीने फेटाळून लावले.
यूपीए सरकावर अनेक आरोप झाले. आरोप करताना भाजपच्या नेत्यांची हिंदीमध्ये संसदेत भाषणे झाली. मात्र त्याला उत्तर देताना पंतप्रधान, अर्थमंत्री किंवा सोनिया गांधी यांची भाषणे इंग्रजीतून झाली. इंग्रजीतील भाषणे सर्वसामान्यांना समजलीच नाहीत, असा आक्षेप राष्ट्रवादीने घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक चव्हाण आक्रमक
नारायण राणे एकीकडे पक्षाला आव्हान देत असतानाच अशोक चव्हाण यांनीही मुख्यमंत्री चव्हाण यांना लक्ष्य करण्याची संधी सोडली नाही. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याकरिता तात्काळ काही निर्णय घ्यावे लागतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांना टोला हाणला. सक्षम नेतृत्व असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोदी लाट थोपविणे शक्य झाले, असे सांगत आपण सक्षम असल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न केला. यापुढे दिल्लीतून महाराष्ट्र बघणार, असे सूचक वक्तव्यही अशोकरावांनी केले.  मतदारसंघांचा आढावा घेताना अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या मंत्र्यांच्या कामगिरीाबाबत नाराजी व्यक्त केली. शासकीय नियुक्त्या रखडल्याबद्दल मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष या दोघांनाही दोष दिला.

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Using english to counter graft charges hurt upa government ncp
First published on: 23-05-2014 at 03:45 IST