बुलढाणा/अमरावती/अलिबाग/नाशिक : राज्यात मंगळवारी वेगवेगळय़ा पाच अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात विदर्भातील बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळय़ा तीन अपघातांतील १४ मृतांचा समावेश आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एकाचा, तर नाशिकमध्ये मायलेकीचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा जिल्ह्यात मुंबई-संभाजीनगर-औरंगाबाद महामार्गावर मंगळवारी सकाळी ६.१५ च्या सुमारास ट्रक आणि एसटी बस यांच्यात धडक झाली. त्यात आठ जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. बस संभाजीनगरहून वाशीमकडे जात असताना ट्रकला धडकली. जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुसऱ्या घटनेत, सोमवारी मध्यरात्री दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावरील ईटकी फाटय़ाजवळ भरधाव ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये चिमुकल्यांचाही समावेश आहे. शेख अजहर शेख अनवर (३३), त्यांची पत्नी नासीया परवीन शेख अजहर (२५), मुलगी अनशरा परवीन शेख अजहर (६), आई नफिसा परवीन शेख अनवर (५४) आणि पुतण्या शेख अनस शेख असलम (२) सर्व रा. टाटानगर, बाभळी, दर्यापूर अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातात सायमा परवीन वकील खान (२४) रा. वलगाव, आसमा परवीन शेख शकील (२६) रा. काकनवाडा, अकोला, मुस्कान परवीन शेख असलम (२१), रा. बाभळी, दर्यापूर, आयशा परवीन शेख शकील (३) रा. काकनवाडा, अकोला, अलमास परवीन शेख अजहर (२) रा. बाभळी, दर्यापूर, अशमीरा परवीन शेख शकील (५) रा. काकनवाडा, अकोला, शेख एजाज शेख अब्बास (७५), शायमा परवीन (४०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाभळी येथील रहिवासी शेख अजहर हे आपल्या परिवारासह अंजनगाव सुर्जी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून टेम्पोने दर्यापूरकडे येत असताना ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.

तिसऱ्या घटनेत, समृद्धी महामार्गावर आणखी एका अपघाताची नोंद झाली. मंगळवारी उत्तररात्री दुसरबीडजवळ (तालुका सिंदखेडराजा) खासगी प्रवासी बस दुभाजकला धडकल्याने वाहक दगावला तर आठ प्रवासी जखमी झाले.

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर मंगळवारी सकाळी कंटेनरने आयशर टेम्पोला धडक दिल्याने मायलेकींचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. पाचवा अपघात मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर नोंदवण्यात आला. खोपोलीजवळ भरधाव कंटेनरने सहा वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य पाच जण जखमी झाले. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एसटी अपघातातील मृतांच्या वारसांना दहा लाख

मुंबई : सिंदखेडराजा येथे मंगळवारी एसटी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना एसटी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच जखमी प्रवाशांना योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने देण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 17 deaths in five different road accidents in maharashtra zws