मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार असलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईसहीत राज्यातील अनेक भागांमध्ये आंदोलनं केली जात असतानाच या प्रकरणासंदर्भात सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. सदानंद सुळे यांनी ट्वीटर हॅण्डलवरुन सत्तार सुप्रिया सुळेंना शिवीगाळ करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. सदानंद सुळेंचं ट्वीटर अकाऊंट व्हेरिफाइड नसलं तरी ज्या खात्यावर ट्वीट करण्यात आलं आहे ते खुद्द सुप्रिया सुळे फॉलो करतात. सदानंद सुळे यांनी विद्यमान कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंबद्दल केलेल्या विधानाचा दाखलाही सत्तार यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> सुप्रिया सुळे शिवीगाळ प्रकरण: “तो नेमका कोणत्या धर्माचं…”; इस्लामचा उल्लेख करत आव्हाड अब्दुल सत्तारांवर संतापले

औरंगाबादमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधिंशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं. हा व्हिडीओ सदानंद सुळेंनी ट्वीट केलं आहे. हा व्हिडीओ ट्वीट करताना त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या सत्तार यांचा समाचारही घेतला आहे.

नक्की वाचा >> सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “…तर CM शिंदेंना मंत्रालयात…”; ३ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NCP आक्रमक

“या महिलाविरोधी नेत्यांकडून सुप्रियाबद्दल आणि पर्यायाने सर्व महिलांबद्दल वादग्रस्त विधाने सुरुच आहे. पुरुषार्थ सांगणारे हे लोक त्यांच्या वर्तुवणुकीमुळे आणि क्षमतेमुळे उघडे पडले आहेत,” असं सदानंद सुळेंनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे त्यांनी अन्य दोन ट्वीट केले आहेत.

“आधी स्वयंपाकघरात जा किंवा इतर कुठेतरी असं म्हटलं गेलं आणि आता कॅबिनेटमध्ये असलेल्या मंत्र्याने केलेलं हे विधान केलं आहे. ही लोक स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणतात आणि हे नव्या पुढारलेल्या सरकारचे नेते आहेत,” असा उपहासात्मक टोलाही सदानंद सुळेंनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
काही महिन्यांपूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांनी केलेल्या टीकेचा संदर्भ या ‘किचनमध्ये जा’चा उल्लेख असणाऱ्या ट्वीटला आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्यातील सरकारने काय केलं असं विचारताना सुप्रिया यांनी मध्य प्रदेशाचा संदर्भ दिला होता. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क केला पण त्यांनी दिल्लीत जाऊन काय केले हे आम्हाला सांगितले नाही असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यावरुनच दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत प्रतिक्रिया दिली होती.

नक्की वाचा >> Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तार यांना रोहित पवारांचा इशारा

“तुम्ही राजकारणामध्ये कशासाठी राहता, घरी जा आणि स्वयंपाक करा. तुम्ही खासदार आहात ना. एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची हे तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा. शोध घ्या आणि आरक्षण द्या,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच ‘‘तुम्हाला मसण माहिती आहे ना’’, अशी विचारणाही पाटील यांनी यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींना केली होती. यावरुनही मोठा वाद निर्माण झाला होता. सत्तार यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया यांचे पती सदानंद यांना या टीकेचीही आठवण झाली.

तिसऱ्या ट्वीटमध्ये सुप्रियांना पाठिंबा…
तिसऱ्या ट्वीटमध्ये सदानंद यांनी, “स्वत:बद्दल सोडून त्यांना इतरांबद्दल आणि महिलांबद्दल काहीही वाटत नाही. तू चांगलं काम करत राहा. सुप्रिया तुला अधिक शक्ती मिळो. अशा नेत्यांची विचारसणी उघडी पाडणारी महिलाच खरं नेतृत्व असते,” असं म्हणत पत्नी सुप्रिया यांच्या आपण पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंचा उल्लेख करत अमोल कोल्हे म्हणाले, “या हीन भाषेचा व नीच…”

सत्तारांविरोधात कारवाईचे आदेश
सत्तार यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीसंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माहिती दिली आहे. “राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे,” असं चाकणकर यांनी ट्वीटवरुन म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abdul sattar abuse supriya sule husband sadanand shared video to slam shinde group minister scsg