आगामी पालिका निवडणुका तसेच विधानसभा निवडणूक लक्षात घेता पक्षविस्तारासाठी ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे राज्यभार दौरा करत आहेत. ते आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येथे एका सभेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी शिंदे गट, भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली. तसेच नाशिकच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी ब्ल्यू प्रिंटचा उल्लेख करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर त्यांचे नाव न घेता निशाणा साधला.
हेही वाचा >> शिवाजी महाराजांवरील विधानावर ठाम, मग पक्षाचा पाठिंबा का नाही? आव्हाड यांनी दिलं स्पष्टीकरण; म्हणाले “मी एका…”
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“मी नाशिकमध्ये येत-जात असतो. मागील अनेक वर्षांपासून मी या शहरात येतो. माझ्या आजोबांसोबत, वडिलांसोबत मी आलेलो आहे. नाशिक हे माझं आवडतं शहर आहे. नाशिक आणि कोल्हापूर ही दोन शहरं हिरवीगार राहिलेले आहेत. ही शहरं चांगली प्रगत, शांत आणि हिरवीगार राहिलेली आहेत. मात्र मला एक भीती वाटत आहे की मागील १० वर्षांमध्ये नाशिक शहर प्रगतीच्या बाबतीत कुठेतरही हरवलेले होते. अगोदर ब्ल्यू प्रिंट आली, ती कुठे गेली समजली नाही. नंतर नाशिक शहराला कोणीतरी दत्तक घेतले. त्या योजनेचे काय झाले,” अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली.
हेही वाचा >> आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं, दिलं आणखी एक खुलं आव्हान; म्हणाले, “मी तुमच्यासमोर…”
मात्र संधी मिळाली तर…
“मला एका गोष्टीचे वाईट वाटते की एका चांगल्या शहराची दहा वर्षे वाया घालवली. ज्यांना ज्यांना नाशिकवर प्रेम आहे ते माझ्यासोबत मंचावर आणि माझ्या समोर बसलेले आहेत. माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट वगैरे आहे, असे मी काहीही सांगणार नाही. मी काही दत्तक घेतोय असेही सांगणार नाही. तेवढा मी मोठा नाही. मात्र संधी मिळाली तर नाशिकचं सोनं करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा येत राहीन,” असेही आदित्य ठाकरे म्हणाले.