काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही डेंग्यू झाला आहे. जयंत पाटील यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर ही माहिती आहे. काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच पक्षाच्या दैनंदिन कामाला सुरूवात करेन, असेही जयंत पाटलांनी सांगितलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रीच कँडी रूग्णालयाचा तपासणी अहवाल जयंत पाटलांनी ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे. त्यावर लिहिलं की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरूवात करेन.”

दरम्यान, अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी २९ ऑक्टोबरला दिली होती. यानंतर ८ नोव्हेंबरला आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे, असं अजित पवारांनी ‘एक्स’ अकाउंटवरून सांगितलं होतं. पण, १० नोव्हेंबरला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.

गोविंद बागेतील दिवाळी पाडव्याला अजित पवार अनुपस्थित

दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या दिवशी बारामतीतील गोविंदबाग येथे पवार कुटुंबाच्या वतीनं स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारतात. पण, यंदा अजित पवार गोविंद बागेत अनुपस्थित राहिले. “अजित पवारांना डेंग्यू झाल्याने ते आले नाहीत,” असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After deputy chief minister ajit pawar ncp maharashtra president jayant patil report dengue positive ssa