नांदेड : भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित आणि जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रात ‘एकमेव’ असलेल्या भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे दोन लाख टन ऊस गेल्या हंगामामध्ये बाहेरच्या कारखान्यांनी नेल्यानंतर आगामी गाळप हंगामामध्ये याच कारखान्याच्या क्षेत्रात उसाला आणखी एक स्पर्धक वाटेकरी निर्माण होत आहे.साखर कारखानदारीच्या क्षेत्रात खासगी मालकशाहीचे कारखाने बलदंड होत चालले असताना, या स्पर्धेमध्ये गेल्या काही वर्षांत ‘भाऊराव चव्हाण’च्या मर्यादा स्पष्ट झाल्या. गतवर्षी एका खासगी कारखान्याने ‘भाऊराव चव्हाण’च्या क्षेत्रातील ऊस न्यायला सुरुवात केल्यानंतर या सहकारी कारखान्याने नंतर आपला ऊसदर वाढविला. पण, हंगामादरम्यान तब्बल दोन लाख टन ऊस बाहेर गेल्यामुळे चव्हाण कारखान्याचे साखर उत्पादन घटले.
चव्हाण कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना लोहा तालुक्यातील ‘ट्वेन्टी वन’सह इतर कारखान्यांचे पर्याय निर्माण झालेले असतानाच मुदखेड तालुक्यामध्ये दादाराव ढगे या कंत्राटदार व्यावसायिकाचा मोठा गूळ पावडर व खांडसरी प्रकल्प उभा राहत असून, या प्रकल्पस्थळी अलीकडे झालेल्या कार्यक्रमास खासदार अशोक चव्हाण यांच्या राजकीय विरोधकांची उपस्थिती लक्षणीय होती. त्या सर्वांनीच दादाराव यांच्या धाडसाला ‘दाद’ दिली. ढगे हे पूर्वी काँग्रेस पक्षामध्ये होते. आता त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरील कार्यक्रमास आमदार चिखलीकर यांची कन्या प्रणिता देवरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, शिरीष देशमुख गोरठेकर, सुभाष किन्हाळकर, बबन बारसे, प्रताप देशमुख बारडकर, संदीपकुमार देशमुख बारडकर, श्यामराव टेकाळे यांच्यासह भोकर मतदारसंघातील अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा (मगरे) येथे वरील गूळ पावडरनिर्मिती प्रकल्पाची उभारणी होत आहे. ढगे यांनी २० एकर जागेत या प्रकल्पाचे नियोजन करताना प्रतिदिन २५०० टन ऊस गाळप क्षमतेचे उद्दिष्ट ठरवले आहे. मुदखेड व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांच्या उसाला चांगला दर मिळावा, या हेतूने प्रकल्प उभारला जात असल्याचे त्यांनी वरील कार्यक्रमात जाहीर केले.
वरील प्रकल्पाची उभारणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाऊराव चव्हाण कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, आमच्या कार्यक्षेत्रात गूळ पावडर उत्पादनाचा नवा मोठा प्रकल्प उभा राहत असेल, तर पुढील हंगामात आमच्या कारखान्यावर त्याचा नक्कीच परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
पाच-सहा वर्षांपासून मुदखेड परिसरात फिरत असताना प्रस्थापितांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण केल्याचे दिसून आले. पण नव्या गूळ पावडर कारखान्यामुळे शेतकऱ्यांना चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. दादाराव ढगे यांच्या हिमतीला दाद दिली पाहिजे.प्रणीता देवरे-चिखलीकर