Raj Thackeray-Uddhav Thackeray Victory Rally : हिंदी भाषा सक्तीच्या मुद्यांवरून राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलंच राजकारण तापलं होतं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या विषयांवरून आक्रमक भूमिका मांडली होती. त्यानंतर अखेर राज्य सरकारने हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द केला. त्यामुळे जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्यावतीने आज मुंबईत विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले. तसेच राज ठाकरे यांनी देखील या भाषणात बोलताना भारतीय जनता पक्षाला सूचक इशारा दिला. या मेळाव्यात व्यासपीठावर फक्त दोन्ही ठाकरे बंधू होते. या मेळाव्यात राज ठाकरे यांचं आधी भाषण झालं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण झालं. मात्र, राज ठाकरे यांचं भाषण झाल्यानंतर ते जेव्हा व्यासपीठावर जाऊन बसले तेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या पाठीवर थाप मारली आणि त्यांचं कौतुक केलं. तसेच राज ठाकरे यांच्या कानात काहीतरी कुजबुज करताच राज ठाकरे हे देखील दिलखुलास हसल्याचं पाहायला मिळालं आहे.

उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांची युती होणार का?

मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि शिवसेना (ठाकरे) युती होणार असल्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, “राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाट अण्णाजीपंतांनी दूर केला. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं.

राज ठाकरेंचेही युतीचे संकेत

मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, “सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतला असला तरी आपण सर्वांनी सावध राहायला हवं. पुढे काही गोष्टी घडतील, होतील, त्याची मला कल्पना नाही. मात्र, मला वाटतं की ही मराठीसाठीची आपली ही एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारावं अशी आशा, अपेक्षा व इच्छा मी व्यक्त करतो.”

‘आम्हा दोघांना एकत्र आणणं केवळ फडणवीसांना जमलं’

“मी मागे माझ्या मुलाखतीत म्हटलं की कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा माझ्यासाठी महाराष्ट्र व मराठी माणूस मोठा आहे. त्या वक्तव्यापासून राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, एक गोष्ट खरी, जे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जमलं नाही, राज्यातील कुठल्याही नेत्याला, व्यक्तीला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं. आम्हा दोघांना एकत्र आणणं फडणवीसांना जमलं”, असं राज ठाकरे या मेळाव्यात म्हणाले आहेत.