अहिल्यानगर : जिल्ह्यात होणाऱ्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुती दुभंगल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवगाव, पाथर्डी, राहुरी, श्रीगोंदा, जामखेड व कोपरगाव या सहा नगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीमधील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत. त्याचबरोबर राहुरी व देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन स्थानिक आघाडीच्या माध्यमातून भाजप विरुद्ध लढणार आहे. त्यामुळे केवळ नेवासा, संगमनेर, राहाता, शिर्डी या चारच नगरपालिकांमध्ये महायुतीमधील घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. श्रीरामपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व भाजप एकत्र आले तेथे शिवसेना (एकनाथ शिंदे) मात्र स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जाणार असल्याचे महायुतीचे नेते सांगत असताना प्रत्यक्षात मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर स्थानिक पातळीवर राजकीय परिस्थितीनुसार महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी स्वतंत्र निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नेत्यांच्या निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित राहिले, मात्र कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत महाुयतीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पालिका निवडणूक दुरंगी होण्याऐवजी आता तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगर दक्षिणमधील पाचही नगरपालिकांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. सहाजिक राष्ट्रवादी अजित पवार गट देखील भाजपच्या विरोधात उमेदवार देणार असून सक्षमपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. नगर दक्षिणमध्ये शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा व राहुरी या पाच नगरपरिषदांमध्ये इच्छुकांच्या मुलाखतींचा सोपस्कार पूर्ण करून इच्छुकांची यादी प्रदेश कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. त्यातून उमेदवार निश्चित करून त्यांचे एबी फॉर्मदेखील पक्षाच्या जिल्हाध्यक्ष व संबंधित पक्ष निरीक्षकांपर्यंत पोहोच झाले आहेत. त्यामुळे या पाचही नगरपालिकांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँगेस (अजित पवार) आमने-सामने लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेवगाव व पाथर्डीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व आमदार शिवाजीराव गर्जे हे तर भाजपचे नेतृत्व आमदार मोनिका राजळे करीत आहेत. श्रीगोंदा पालिकेत भाजपचे नेतृत्व आमदार विक्रम पाचपुते करीत असून विरोधात माजी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नाहाटा सर्व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेतृत्व करीत आहेत. जामखेडमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीला बाजूला ठेवले आहे.

उत्तर जिल्ह्यातील नेवासे, संगमनेर, राहाता, शिर्डी या चार नगरपरिषदांमध्ये महायुती होणार आहे. अर्थात त्या ठिकाणी पर्याय नाही. नेवासेमध्ये माजीमंत्री शंकरराव गडाख यांनी क्रांतिकारी शेतकरी या स्थानिक पातळीवरील पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी भाजप व राष्ट्रवादीला बरोबर घेतले आहे. तीच परिस्थिती संगमनेरमध्ये आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात आमदार अमोल खताळ यांनी महायुतीची मोट बांधणी आहे. राहाता व शिर्डी नगरपरिषदेमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व असल्याने सहाजिकच या दोन्ही ठिकाणी महायुतीच्या घटक पक्षांना पर्याय नाही. मात्र श्रीरामपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे. भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट या ठिकाणी एकत्र आले आहेत. भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे तर राष्ट्रवादीकडून अनुराधा आदिक व लहू कानडे हे नेतृत्व करीत आहेत. तर शिंदे गटाचे नेतृत्व माजी खासदार सदाशिव लोखंडे, प्रकाश चित्ते, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे करीत आहे. कोपरगाव पालिकेमध्ये भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) आमने-सामने लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार आशुतोष काळे व भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनीही निवडणुकीत स्बळावर लढण्याचे जाहीर करून नगराध्यक्षासह प्रभागनिहाय उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे या ठिकाणी महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे.

तनपुरे काका-पुतण्याचे समीकरण

राहुरी व देवळाली प्रवरा पालिका निवडणुकीत मात्र वेगळे राजकीय समीकरण होत आहे. तेथे राष्ट्रवादी अजित पवार गट व राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले असून स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून ते भाजपच्या विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे व शरद पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे एकत्र येणार आहेत. त्यामुळे भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्याविरोधात ही आघाडी राहणार आहे.