अकोले : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात पुन्हा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सोमवारी सायंकाळी भंडारदरा धरणातून १३ हजार ४१८ क्युसेक तर निळवंडे धरणातून १५ हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू होता. यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ सुरू आहे. आवश्यकता भासल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भंडारदराच्या पाणलोटात मागील आठवड्यात दोनतीन दिवस मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यानंतर या दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणात ‘ओव्हर फ्लो’चे पाणी सोडण्यात येत होते. दोनतीन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरत गेला. त्यामुळे धरणातून सुरू असणारा विसर्ग ही कमी होत गेला. घाटघर ३५ मिमी, रतनवाडी २७ मिमी, पंजरे ३२ मिमी व भंडारदरा २८ अशा कमी पावसाची नोंद झाली. मात्र आज सकाळपासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला.

दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट क्षमतेने भंडारदरा धरण काठोकाठ भरल्यामुळे धरणात नव्याने येणारे सर्व पाणी सोडून द्यावे लागते. पाण्याची आवक वाढल्यामुळे सायंकाळी भंडारदरा विसर्ग वाढवून १३ हजार ४१८ क्युसेक करण्यात आला होता. त्यासाठी भंडारदरा सांडव्याची दारे पुन्हा वर उचलण्यात आली. सांडव्यातून १२ हजार ५९८ क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून ८२० क्युसेक पाणी प्रवरा नदीपात्रात पडत होते.

भंडारदरामधून मोठ्या प्रमाणात निळवंडे धरणात पाणी येत असल्यामुळे निळवंडे विसर्गही १५ हजार क्युसेक करण्यात आला. याशिवाय निळवंडेच्या कालव्यातून ५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. निळवंडे विसर्गमुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात दिवसभर पाऊस सुरू होता. भंडारदरा येथे आज दिवसभराच्या बारा तासात ४५ मिमी पावसाची नोंद झाली.

अगस्ती सेतू पुलासाठी इशारा

निळवंडे धरणातून जेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते तेव्हा अकोले येथील अगस्ती सेतू पुलावर पाणी येथे. त्यामुळे नगरपंचायतीच्या वतीने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला जातो. मात्र काहीजण पुलावरील पाणी थोडे कमी होताच बॅरिकेट्स बाजूला करून पुलावरून प्रवास करतात. अशा लोकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.