राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीचा हा सध्याच्या महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून अनेक घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक मोठ्या योजनांची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केल्या. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळीही अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अजित पवार यांनी संत तुकाराम यांच्या ओव्यांपासून सूचक उल्लेख असणाऱ्या शेरोशायरीचा उल्लेख केला. यावेळी सत्ताधारी बाकांवरून त्यांना बाकं वाजवून दाद दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवातच संत तुकाराम यांच्या ओळींनी केली...

उदंड पाहिले, उदंड ऐकिले
उदंड वर्णिले, क्षेत्रमहिमे
ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर
ऐसा विटेवर, देव कोठे
ऐसे संतजन, ऐसे हरिचे दास
ऐसा नामघोष, सांगा कोठे
तुका म्हणें, आम्हां अनाथाकारणें
पंढरी निर्माण, केली देवें

असं म्हणत आळंदी व देहू येथून पालख्यांचं प्रस्थान झाल्याचं अजित पवार म्हणाले. यावेळी लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं प्रतिदिंडी २० हजार रुपये निधी देण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी सांगितलं. ‘निर्मल वारी’साठी ३६ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचंही अजित पवार म्हणाले.

“चिरागों का कोई मजहब नहीं है”

याचप्रमाणे भाषणाच्या मध्यावर येताच अजित पवारांनी शेरोशायरीला हात घातला. शेतकऱ्यांसाठी वीजपंप उपलब्ध करून देण्याच्या संदर्भातील घोषणा करताना अजित पवारांनी सूचक शब्दांत शेरोशायरी केली. “शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरपंप या योजनेतून ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना असे पंप उपलब्ध करून देण्याचं मी जाहीर करत आहे”, अशी घोषणा अजित पवारांनी यावेळी केली. यानंतर त्यांनी ऐकवलेल्या एका शेरला सत्ताधारी बाकांवरच्या आमदारांनी जोरदार दाद दिली.

तुफानों में संभलना जानते है

अंधेरों को बदलना जानते है

चिरागों का कोई मजहब नहीं है

ये हर मेहफिल में जलना जानते है

असं अजित पवारानी म्हणताच ‘व्वा-व्वा’ म्हणत आमदारांनी दाद दिली.

“सारे जमाने को साथ लेके चलो”

यानंतर दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात विद्यमान सरकार कटिबद्ध असल्याचं सांगताना अजित पवारांनी पुन्हा एकदा एक शेर ऐकवला. याहीवेळी आमदारांनी त्यांच्या शेरला दिलखुलास दाद दिली. “दारिद्र्य निर्मूलन आणि जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विविध योजनांच्या माध्यमातून अविरतपणे सामाजिक विकासाचे प्रयत्न चालू आहेत”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हयात लेके चलो

काएनात लेके चलो

चलो तो सारे जमाने को

साथ लेकर चलो…

या त्यांच्या शेरवर सत्ताधारी बाकांप्रमाणेच विरोधी बाकांवरच्या आमदारांनीही मनमुराद दाद दिली.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर, ४६ हजार कोटींची तरतूद; अजित पवारांची मोठी घोषणा

संत तुकाराम यांच्या ओळींनीच केला भाषणाचा शेवट!

दरम्यान, अजित पवारांनी त्यांच्या भाषणाचा शेवटही संत तुकाराम यांच्याच ओळींनी केला.

निंदी कुणी मारी, वंदी कुणी पूजा करी,

मज हेही नाही, तेही नाही, वेगळा दोन्हीपासूनी

या न्यायाने केलेल्या कामाची ही पावती आहे असं मी मानतो.

तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा,

तरी माझ्या दैवा, पार नाही

“अशी तुकोबारायांच्या भाषेत प्रार्थना करून मी आपली रजा घेतो”, असं अजित पवार म्हणाले.

“मी दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करतोय”

दरम्यान, अधिवेशनाचं आजचं कामकाज संपल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना सूचक शब्दांत टोला लगावला. “मी दहाव्यांदा आज अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे आम्ही काही यात नवखे नाहीयेत. अनेक वर्षं राज्यकारभार पाहात असल्यामुळे काही निर्णय घेतल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी तेवढी क्षमता आपल्या राज्यात आहे का? तेवढा निधी आहे का? केंद्रानं राज्यांना घालून दिलेल्या नियमात गोष्टी बसतायत का? याचा विचार करून मी हा अर्थसंकल्प सादर केला आहे”, असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar budget speech shayari in maharashtra assembly monsoon session pmw
Show comments