२००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळालं होतं. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ७१ तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा असूनही त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिला होतं. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांनी पक्षाचे तेव्हाचे प्रमुख शरद पवारांवर अलीकडच्या काळात नाराजी व्यक्त केली होती. अजित पवारांच्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “२००४ च्या निवडणुकीनंतर आमच्या पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं, छगन भुजबळ किंवा इतर कुठल्या नेत्याला आम्ही मुख्यमंत्री बनवलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला असता.” शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, “शरद पवारांनी केलेलं वक्तव्य हे धादांत खोटं आहे.”

अजित पवार म्हणाले, “काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल एक वक्तव्य केलं. ते म्हणाले २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला असता तर आमचा पक्ष फुटला असता हे शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं आहे. शरद पवारांबरोबरच्या त्यावेळच्या चर्चेत मी देखील होतो. आमच्याबरोबर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अशी सगळी वरिष्ठ मंडळी होती. आम्हा सर्वांना वाटत होतं की मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच असायला हवं. त्यावेळी मी मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक नव्हतो. मी त्यावेळचं सांगतोय… मला वाटत होतं की छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला हवेत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर खऱ्या अर्थाने कोणी जर आमचा पक्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं असेल तर ते काम छगन भुजबळांनी केलं आहे. ही गोष्ट आमच्यापैकी कोणीही नाकारू शकत नाही.”

अजित पवार म्हणाले, आमच्यापैकी अनेकांना वाटत होतं की छगन भुजबळ हेच मुख्यमंत्री होतील. परंतु, शरद पवार यांनी भुजबळांना मुख्यमंत्री न करण्याचं मला माहीत असलेले कारण वेगळं आहे. त्याबद्दल मला जी बातमी मिळाली आहे… अर्थात माझी बातमी खरीच आहे… ती बातमी अशी आहे की यापूर्वी सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केल्यावर अवघ्या एका वर्षात नाईक यांनी शरद पवारांचं ऐकणं सोडून दिलं होतं. एका वर्षाच्या आतच नाईक एका ठिकाणी म्हणाले, एखादं सावज माझ्या टप्प्यात आलं की मी ते सावज लगेच टिपतो… असं बरंच काही ते बोलून गेले होते. त्यानंतर छगन भुजबळांसह आम्हा १७ नेत्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं होतं. विजयसिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला त्यावेळी कळवलं होतं की तुम्हा १७ जणांना मंत्रिमंडळातून वगळलं आहे. तिथून ही सगळी गडबड सुरू झाली होती.

हे ही वाचा >> Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, डॉक्टरांच्या अटकेनंतर काँग्रेसचा हसन मुश्रीफांवर आरोप; म्हणाले, “अपघाताच्या रात्री…”

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “२००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर तिथून पुढे जितकी वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता राहिली, तितकी वर्षे राज्यात आमचाच मुख्यमंत्री राहिला असता. आमच्यापैकी कोणताही नेता मुख्यमंत्रीपदावर बसला असता, कदाचित छगन भुजबळ मुख्यमंत्री झाले असते. त्यानंतर आर. आर. पाटील आणि इतर नेतेही मुख्यमंत्री होऊ शकले असते.”