Maharashtra Deputy CM Ajit Pawar Controversy : पुण्यात मुलाच्या जमीन खरेदी व्यवहाराचा घोटाळा माध्यमांमध्ये झळकल्याने अखेर उपमुख्यमंत्री अजित पवारांना माघार घ्यावी लागली. पार्थ पवार यांच्या कंपनीने जमीन खरेदीचा केलेला व्यवहार रद्द करण्यात येत असल्याची घोषणा अखेर अजितदादांना करावी लागली. ‘आपला या जमीन खरेदीशी दुरान्वये संबध नाही’, ‘तीन-चार महिन्यांपूर्वी माझ्या कानावर काही तरी आले होते’ नंतर ‘मला याची काही माहिती नव्हती’ असे विविध खुलासे अजित पवारांनी केले असले तरी मुलाच्या जमीन घोटाळ्याचा शिक्का कायमचा अजित पवारांना कायमचा चिकटण्याची लक्षणे आहेत.
सिंचन घोटाळ्यातून आता कुठेसे बाहेर पडत असताना पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदीमुळे अजित पवार पुन्हा अडचणीत आले आहेत. या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे अजित पवार वारंवार सांगत असले तरी, त्यांच्या मुलासाठी सरकारी यंत्रणा इतकी कशी झुकते, हा औत्सुक्याचा प्रश्न आहे. महार वतनाची ही जमीन खरे तर विकता येत नाही. त्यातच आयटी पार्क विकसित करणार असे दाखवून मुद्रांक शुल्कात सवलतही मिळवण्यात आली. सरकारी यंत्रणेने ज्या पद्धतीने कृती केली त्यावरून या प्रकरणात ‘वरून दबाव’ होता, हेही स्पष्ट होते. केंद्र सरकारी यंत्रणेला ही जागा रिकामी करण्यासाठी नोटीस देण्यापर्यंत राज्यातील यंत्रणांची मजल गेली होती.
महाराष्ट्राच्या सत्ताकारणात बॅ. ए. आर. अंतुले यांना सिमेंट घोटाळा, अशोक चव्हाण यांना ‘आदर्श’ घोटाळा, शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांना मुलीच्या गुणात वाढ करण्याच्या प्रकरणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांनंतर अजित पवारांनी राजीनामा दिला होता. आणखी एक उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांना हवाई सुंदरीशी गैरवर्तन केल्यावरून राजीनामा द्यावा लागला होता. गैरव्यवहार किंवा गैरवर्तनामुळे मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याची राज्यात उदाहरणे आहेत.
Ajit Pawar Controversy : काय होता सिंचन घोटाळा ?
राज्यात २००६ नंतर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्यांचे सत्र सुरू झाले. विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल या विचाराने सिंचनावर विशेष भर देण्यात आला. सिंचनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करण्यात येऊ लागली. केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून निधी मंजूर झाला. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी विदर्भाचा दौरा केल्यावर विशेष पॅकेज जाहीर केले होते. जेणेकरून विदर्भात सिंचनाचे क्षेत्र वाढावे व शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळावे हा त्यामागचा उद्देश होता.
सिंचनावर सात-आठ वर्षांत सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च करूनही सिंचनाच्या क्षेत्रात फक्त १ टक्के वाढ झाल्याचा मुद्दा माजी आमदार बी. टी. देशमुख यांनी २०१२ मध्ये मांडला होता. त्यावर विरोधकांनी आरोपांची राळ उठवली. तेव्हा अजित पवार हे जलसंपदामंत्री होते. साहजिकच अंगुलीनिर्देश अजित पवारांच्या दिशेने झाले. सुमारे ७० हजार कोटी खर्च करूनही सिंचनाचे क्षेत्र वाढले नाही मग पैसे गेले कुठे, असा सवाल करण्यात आला. अजित पवारांना आरोप होऊ लागले. जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वादातून कागदपत्रांना पाय पुटले. कारण विदर्भ सिंचन मंडळाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना मंजूरीचे जादा अधिकार प्राप्त झाल्याने मंत्रालयातील वरिष्ठांमध्ये साहजिकच प्रतिक्रिया उमटली. अजित पवारांवर पैसे हडप केल्याचा गंभीर आरोप झाला होता. या आरोपांवर दररोज खुलासा करण्याची वेळ आल्याने संतप्त झालेल्या अजित पवारांनी अचानक एक दिवस राजीनाम्याची घोषणा केली.
घोटाळ्याच्या आरोपांतून सहीसलामत बाहेर पडल्याशिवाय मंत्रिमंडळात परतणार नाही, असे अजितदादांनी जाहीर केले होते. पण ७२ दिवसांनी ते पुन्हा मंत्रिमंडळात परतले. २३ नोव्हेंबरच्या पहाटेच्या त्या गाजलेल्या शपथविधीनंतर अजित पवारांना फडणवीस सरकारने सिंचन घोटाळ्यात अभय दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या समस्त नेतेमंडळींनी सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांवर गंभीर स्वरुपाचेआरोप केले. अगदी ‘तुरुंगात चक्की पिसण्यासाठी पाठविण्याची’ भाषा केली. त्याच भाजपने अजित पवारांना बरोबर घेतले.
Ajit Pawar Controversy : वादग्रस्त विधानांची सवय
अजित पवार हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध. अनेकदा वादगस्त विधानांमुळे ते वादात सापडतात. ‘धरणात पाणी नाही तर तेथे येऊन लघूशंका करू का’, असा प्रश्न त्यांनी आंदोलनकर्त्यांना विचारला होता. ‘रात्रीच्या भारनियमनामुळे लोकसंख्या वाढते’ अशा बेताल विधानांमुळे ते अडचणीत आले होते. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता निवृत्त व्हा, असा सल्ला काका शरद पवारांना दिल्यानेही अजित पवारांवर टीका झाली होती.
Ajit Pawar Controversy : जमीन खरेदीचा नवा घोटाळा
सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांची पार बदनामी झाली. सिंचन घोटाळ्याचा ठपका त्यांना कायमचा चिकटला. ‘सिंचनाचे पाणी कुठे मुरले’, असा सवाल आजही अजित पवारांना उद्देशून केला जातो. पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेला जमीन खरेदीचा व्यवहार वादग्रस्त ठरला आहे. या व्यवहाराता एक रुपया कोणाला देण्यात आलेला नाही, असा दावा अजित पवारांनी केला. मुलाचा हा वादग्रस्त जमीन खरेदी व्यवहार अजित पवारांना कायमचा सतावणार आहे. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची घोडदौड सुरू झाली होती पण पार्थच्या जमीन खरेदी घोटाळ्यामुळे अजित पवारांना कायमचा त्रासदायक ठरणार आहे.
