Ajit Pawar On CM Devendra Fadnavis Maratha reservation manoj jarange protest in Mumbai : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. जरांगे यांच्याकडून आझाद मैदानावर आंदोलन केले जात असून त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. यादरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या हलचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबात सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. तसेच यावेळी त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाकी पडल्याचे दिसत असलल्याच्या प्रश्नालाही उत्तर दिले.

राज्य सरकारला इशारा देताना मनोज जरांगे म्हणाले की राज्यात जर अस्थितरता निर्माण झाली तर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, तसेच ही परिस्थिती अधिक चिघळू देऊ नका असे आवाहनही त्यांनी सरकारला केले होते. यावर अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात. लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. आम्ही त्यामधून मार्ग काढण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून, हे कसं सामोपचाराने मिटेल, उपोषण संपेल हा प्रयत्न राज्य सरकारचा सुरू आहे,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री एकाकी पडलेत?

मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समर्थकांसह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले जात आहे. यादरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाकी पडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, असा प्रश्न पुण्यात आलेल्या अजित पवारांना माध्यम प्रतिनिधींनी विचारला. या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, “असं काही चित्र नाहीये. कालच आम्ही मुंबईमध्ये होतो. आज एक दिवस पुण्याला आलो आहे, उद्याही मुंबईला जाणार आहे, काही अडचण?” असं उत्तर अजित पवारांनी दिले.