Ajit Pawar On India-Pakistan Asia Cup Match 2025 : आशिया चषक २०२५ स्पर्धेत आज दुबई येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा समाना होणार आहे. या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी संघाबरोबर समाना खेळू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळातून देखील या सामन्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या जात आहे. विरोधकांकडून यावरून बीसीसीआय आणि भारतीय जनता पक्षावर टीका केली जात आहे. इतकेच नाही तर शिवसेना (ठाकरे गट) आज याविरोधात आंदोलन देखील करणार आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी विरोधक विरोध करण्याचे निमित्त शोधत असल्याचे म्हटले आहे. “खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावं की न बघावं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीना काही भूमिका घेण्याचं निमित्त विरोधक पाहात असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आवाहन आहे,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अजित पवार मॅच पाहाणार?

तुम्ही मॅच बघणार आहात का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता अजित पवार म्हणाले की, “मला जमणार नाही, माझे ९-१० वाजेपर्यंत कार्यक्रम आहेत. तुमचा आग्रह आहे तर सगळं झाल्यावर वेळ असेल तर बघेन,” असे उत्तर अजित पवारांनी दिले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या जखमा भरल्या नसताना आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे, असा सवाल उपस्थित केला. भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानशी रविवारी होणारा क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यामुळे आता पाकिस्तान बरोबर होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालावा, असे ठाकरे यांनी नमूद केले. पाकिस्तान बरोबर होत असलेल्या क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझे कुंकू, माझा देश’ ,हे आंदोलन रविवारी केले जाणार आहे.

किती वाजता पाहता येईल सामना?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा हाय व्होल्टेज सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या हाती असणार आहे. तर पाकिस्तानची धुरा सलमान अली आगाच्या हाती असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७:३० वाजता होईल. जो संघ हा सामना जिंकेल त्या संघाला सुपर ४ मध्ये जाण्याची संधी मिळणार आहे.