छत्रपती संभाजीनगरमध्ये जे घडलं ती एका समाजातली अंतर्गत दंगल होती. ते दोन वेगवेगळ्या समाजांमध्ये झालेलं प्रकरण नाही, त्यामुळे त्या घटनेला वेगळा रंग देऊ नका, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी पक्षातील नेते, विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांचे कान टोचले आहेत. राम नवमीच्या दिवशी रात्री २ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दंगल उसळली होती. येथील अनेक भागात वाहनांची जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेला धार्मिक दंगलीचा रंग देण्याचा प्रयत्न अनेक नेत्यांकडून आणि माध्यमांकडून होत आहे. या सर्वांना अजित पवारांनी आज चांगलंच सुनावलं

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार म्हणाले, संभाजीनगरात जे घडलं ती अंतर्गत बाब आहे. ती दोन समाजांमधील दंगल नव्हती. पोलिसांनी ती परिस्थिती आटोक्यात आणण्याचं काम केलं आहे. मी तिथल्या पोलिसांशी सातत्याने संपर्कात आहे. पोलिसांनी सांगितलंय की, परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आहे. त्यामुळे कुठलंही कारण नसताना त्या घटनेला वेगळं रूप देऊ नका. आम्ही विरोधी पक्षांनी आणि तुम्ही माध्यमांनी देखील या घटनेला वेगळा रंग देणं चुकीचं आहे. कारण ते आपसातलं भांडण होतं. त्या घटनेला वेगळी प्रसिद्धी देण्यात आली कारण ते छत्रपती संभाीजनगर होतं.

विरोधी पक्षनेते म्हणाले की, मी तिथल्या परिस्थितीची पोलिसांकडून माहिती घेतली. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण आणि स्थानिक काँग्रेस नेत्यांशी देखील बोललो आहे. परिस्थिती आता सुधारली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar says chhatrapati sambhaji nagar ruckus was not communal riots asc